स्वरमानस… 21 वर्षांची सुरेल वाटचाल !

>> मानसी केळकर-तांबे, संस्थापिका, स्वरमानस 

गाणं गाण्याची अनेकांची सुप्त इच्छा असते. परंतु माझा आवाज चांगला नाही मी गाणं कसं म्हणू? असे अनेक प्रश्न मनात असतात. प्रत्येकजण गाऊ शकतो असा आत्मविश्वास हौशी गायकांमध्ये निर्माण करून प्रत्येकाला गाणं शिकण्याची आणि सादर करण्याची संधी देण्याचे काम दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्वरमानस ही संस्था गेली 21 वर्षे अविरतपणे करतेय.

गाणं गाण्यासाठी चांगल्या आवाजासोबत सूर, ताल, लय यांची माहिती असणे आवश्यक आहे. ही चौकट मोडून गाणं हे प्रत्येकासाठी आहे, कुणीही आणि कोणत्याही वयात गाणं गाऊ शकतो हा समज रूढ करण्यासाठी मानसी केळकर-तांबे यांनी 2002 साली ‘स्वरमानस’ या संस्थेची स्थापना केली. गेल्या 21 वर्षांत या संस्थेने दहा हजारांहून अधिक जणांना सुगम संगीताचे धडे दिले आहेत. यात अगदी तीन वर्षांच्या बच्चेकंपनीपासून ते 80 वर्षांच्या वृद्धांचा समावेश आहे.

मानसी केळकर-तांबे या प्रसिद्ध पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांच्या कन्या आहेत. संगीताचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. अशोक पत्की यांच्याकडे त्यांनी सुगम संगीताचे तसेच उषा देशपांडे आणि भालचंद्र टिळक यांच्याकडे हिंदुस्थानी शास्त्राrय संगीताचे धडे गिरवले आहेत. याशिवाय मानसी यांनी सत्यदेव दुबे यांच्याकडे नाटय़ाचे आणि एमईटी संस्थेतून म्युझिक थेरेपीचे प्रशिक्षण घेतले आहे. त्या नृत्य आणि अभिनय कौशल्याचा वापर करून  गाणं अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात. विद्यार्थ्यांना गाण्याचा भाव, व्हॉईस मॉडय़ुलेशन, आवाजातील चढउतारदेखील शिकवले जातात. तसेच समुपदेशनाची जोड देऊन विद्यार्थ्यांच्या मन:स्वाथ्याचीही काळजी घेतली जाते.

 ‘स्वरमानस’चा वर्धापन दिन सोहळा
3 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात होणार आहे. यानिमित्ताने ‘अंतरा’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात संस्थेचे 95 विद्यार्थी सुगम संगीत, शास्त्राrय संगीत तसेच मराठी-हिंदी गाणी सादर करतील. विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी नॉन सिंगर आहेत.

स्वरमानसचा दोन दशकांचा प्रवास खूपच आनंददायी आहे. या प्रवासात अनेक लोकांचे भरभरून प्रेम आणि आशीर्वाद मिळाले. संगीत कोणत्याही वयात शिकता येते. ‘एनीबडी पॅन सिंग’ ही एक थेरपी आहे जी सेरोटोनिन, डोपामाइन आणि एंडोर्फिनसारखे आनंदी संप्रेरक तयार करते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना जीवनातील कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यास मदत होते. संगीताचा कधीही आणि कुठेही आनंद घेता येतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत राहू शकतो.