
>> मेधा पालकर
अभिजात, संगीत रंगभूमी आणि लोकसंगीताचे ज्येष्ठ अभ्यासक रामचंद्र विठ्ठलराव पागे यांचे नुकतेच निधन झाले. रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे यांचे रामचंद्र पागे हे ज्येष्ठ पुत्र. गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांच्या जन्मस्थानाचा शोध घेऊन त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
वझेबुवा पुण्यतिथी सांगीतिक कार्यक्रमाचे संकल्पक ते होते. एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील रिअल बँकेत रामचंद्र पागे नोकरीला होते. लहानपणापासून संगीताची आवड असलेल्या पागे यांनी बाई सुंदराबाई यांच्या आवाजातील लावणीपासून ते अभिजात संगीत, ठुमरी, गजल, दादरा, टप्पा अशा विविध गायनप्रकारांच्या नामवंत कलाकारांच्या आवाजातील ध्वनिमुद्रिकांचे संकलन त्यांनी केले होते. मास्टर कृष्णराव, पं. ओंकरनाथ ठाकूर यांच्यापासून विविध शंभर कलाकारांनी गायलेल्या ‘वंदे मातरम्’च्या ध्वनिमुद्रिका त्यांच्या संग्रही होत्या. संगीताची जाण वाढावी या उद्देशातून त्यांनी विविध कार्यक्रमांची निर्मिती केली होती.नोकरीमध्ये बदली झाल्यानंतर गोव्यातील वझरे या गावात गायनाचार्य पं. रामकृष्णबुवा वझे यांच्या जन्मस्थळाचा शोध त्यांनी घेतला होता. गावातील लोकांशी बोलून आणि भालचंद्र पेंढारकर यांच्यासमवेत वझेबुवांचा एक छोटा पुतळा बसवला आणि वझेबुवांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम केला. तेव्हापासून दरवर्षी तो पुण्यतिथीचा कार्यक्रम तेथे साजरी होतो, अशी माहिती पागे यांचे स्नेही आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी दिली. जुन्या काळातील पदवीधर आणि मराठी, इंग्रजी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व, प्रचंड वाचन आणि कुठल्याही विषयाच्या मुळापर्यंत जाऊन अभ्यास करायची सवय, यामुळे पुणे भारत गायन समाजाच्या दातार बंधूंना पागे यांच्याविषयी आदर होता. जुन्या काळातील पदवीधर आणि मराठी, इंग्रजी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व, प्रचंड वाचन आणि कुठल्याही विषयाच्या मुळापर्यंत जाऊन अभ्यास करायची सवय यामुळे दातारांना काकांबद्दल आदरही होता. दातार नेहमी म्हणायचे की, ‘आम्ही फक्त कारकून. पागे खरे अभ्यासक.’ रामचंद्र पागे यांनी निर्मिलेले कार्यक्रम म्हणजे ‘सौभद्र‘चे संगीत, ‘मानापमान’ नाटकाच्या संगीताची वाटचाल, ‘मल्हार’दर्शन, संगीतकार वसंत देसाई, वैदिक संगीत, वझेबुवांची शिष्यपरंपरा हे सांगता येतील.































































