दखल – निसर्गाशी मुक्त संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेघना साने 

 

कवी हा तहानलेला असतो. तहान असते निसर्गाची, भावभावनांची. त्याला निसर्गात सामावून जाण्याची ओढ असते. ही ओढ त्याला स्वस्त बसू देत नाही, तर त्यातून निर्मिती घडवते. कवयित्री हेमांगी अरविंद नेरकर यांच्या कवितेतून ए      क जाणवते की, त्यांना कोंडलेला सूर मोकळा होऊ द्यायचा आहे.

माझ्या गळय़ात आहे सूर कोंडलेला 

होण्यास मोकळा हे वरदान छान आहे   

आपल्या मनात निर्माण होत असणाऱया अनेक भावभावनांना, विचारांना साकार करत त्यांनी आपली कविता पुढे नेली आहे. आयुष्य हा एक प्रवास आहे आणि पुढे कैलास पर्वत गाठायचे आहे म्हणून ‘संचित’ या कवितेत त्या म्हणतात, हा प्रवास करताना जिवाचे चार सोबती असावेत. सारी माया, मोह बाजूला ठेवून हा प्रवास करायला हवा. प्रेम ही गोष्ट दृश्य स्वरूपात कुठे दिसते? ती तर भावना आहे, पण कवयित्रीने याचा शोध लावला आहे.

समोरच्याचे अश्रू आपल्याही डोळय़ांत झेपावतात 

समोरच्याचं स्मित आपल्याही चेहऱयावर पसरतं 

कवयित्रीला हेही माहीत आहे की, जगात चिरंतन काय असेल, तर ते प्रेम आहे. ‘विकास’ या कवितेत त्या म्हणतात की, विकासाच्या पुढे काय? सांगाल काही?

विकसित फुलांच्या पाकळय़ा गळून जाणार आहेत. हेच तर प्रारब्ध आहे. म्हणून जगत असताना प्रेम महत्त्वाचे आहे.

आभाळा तू उधळ शांत पांढरा रंग 

सागरा तू आण उधाण शांत निळय़ा लहरींचं  

कवयित्रीचा निसर्गाशी किती मुक्त संवाद सुरू आहे पहा.  ठिकठिकाणी निसर्गाची भाषा यात दिसतेच. कधी  आभाळात काळा ढगांचा सोहळा दिसतो, तर कधी फुलवेलीत गंध उधळलेला दिसतो. घुबडांच्या पंखांमध्ये वाऱयाचे झाड झुलताना दिसते, कधी ‘दिन दिन हिरवळ झाले’ अशी सुंदर रचना तिला सुचते, पण या सगळय़ात तिच्या मनात मूल्यांचा ठेवा कायम आहे.