सुस्ती नको शक्ती हवी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मृदा झरेकर, म. ल. डहाणूकर कॉलेज

चित्रपट संगीत व मालिकांची शीर्षक गीते या माध्यमांतून नीलेश मोहरीर याने आपला संगीत क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे. सुमारे 100 शीर्षक गीते तसेच अनेक म्युझिक अल्बम व जिंग्लस आणि वीसहून अधिक मराठी चित्रपटांचे संगीत त्याच्या नावे आहेत. आज जाणून घेऊ या नीलेश मोहरीरच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी आणि व्यायामाच्या सवयी…

नीलेशला टेनिस व स्विमिंग फार आवडते. तो जिम वर्कआऊट करत नाही, पण हलका वर्कआऊट करतो. हेवी वेट ट्रेनिंगपेक्षा त्याचा कल स्पोर्टस्कडे जास्त आहे. नीलेश म्हणतो, कधीतरी असे वाटते की, आपल्याकडे जे बळ आहे, ते आपले काम करायला कुठेतरी कमी पडत आहे. मग आपण फिटनेसबाबत जागरूक होतो. अजून चांगले काम करायला आपल्याला शारीरिक व वैचारिक ताकद लागते व त्यासाठी फिटनेसची गरज असतेच असते.

दिवसातून तीनपेक्षा अधिक वेळा व दोनपेक्षा कमी वेळा खायचे नाही हा नीलेशचा फंडा. पोळीभाजी, आमटी, कोशिंबीर चटणी व वरणभात असा त्याचा सकस आहार नियमित असतो, पण कधीतरी पास्ता, पिझ्झा किंवा चायनीज खायलादेखील आवडते. जास्त फायबर व प्रोटिन असलेले पदार्थ खायचा प्रयत्न असतो. आईच्या हातचा साबुदाणा वडा, खव्याच्या पोळय़ा, चटणी पॅटिस, गुलाबजाम हे नीलेशचे फार आवडते पदार्थ. पनीरची प्रत्येक डिश त्याला आवडते. चहा प्रिय, पण ग्रीन टीला जास्त प्राधान्य देतो. नीलेशला पत्नीच्या हातचेही सर्वच पदार्थ आवडतात आणि पत्नीसोबत विविध ठिकाणी डाईन-आऊटला जायलादेखील खूप आवडते.

नीलेश सांगतो, ‘अति तिथे माती’…त्यामुळे झेपणार नाही इतके खाऊ नका. एक किंवा दोन घास पोट रिकामे ठेवावे. त्यामुळे काम करायला ऊर्जाही मिळते. ओशो म्हणतात त्याप्रमाणे ‘अन्नाने तुम्हाला शक्ती मिळायला पाहिजे की, सुस्ती यायला पाहिजे?’ जेवल्यानंतर काम करायला ताकत यायला पाहिजे की, झोप यायला पाहिजे? या विचारांमुळेच माझ्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडला.

नीलेशने यूटय़ूबवर ‘टेस्टी टेल्स’ या नावाने एक फूड ब्लॉग सुरू केला आहे. त्यामध्ये सेलिब्रिटी मित्रांसोबत विविध रेस्टॉरंट्स ना भेट देऊन तिथे जेवण कसे बनवतात, स्पेशालिटी काय आहे हे सगळे आपल्यापर्यंत पोहोचवले जाते.