कोविड महामारीची दिशा कोणती?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. एन. के. मेहरा

कोरोनाचा ओमायक्रोन व्हेरिएंट सध्या 89 देशांमधील लोकांना अगदी सौम्य स्वरूपाचा संसर्गग्रस्त करीत असला तरी लसीकरणाने मिळालेली किंवा पूर्वी कोरोना झाल्यामुळे तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती भेदण्याची या व्हेरिएंटची क्षमता हा चिंतेचा विषय बनला आहे. ओमायक्रोनच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहिल्यास, वेगवेगळ्या लोकसंख्येवर त्याचा वेगवेगळा परिणाम दिसून येतो. इम्पीरियल कॉलेजच्या अध्ययनातून असे दिसून आले आहे की, ओमायक्रोनचा पुन्हा संसर्ग होण्याचा धोका डेल्टाच्या तुलनेत 5.4 टक्के अधिक आहे.

गेल्या आठवडय़ात दक्षिण आफ्रिकेच्या बाहेर अनेक देशांमध्ये ओमायक्रोनचे रुग्ण वेगाने वाढताना दिसले. या कारणामुळे निकटच्या भविष्यात जागतिक स्तरावर कोरोनाची एक मोठी लाट येईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. त्याहून महत्त्वाची बाब अशी की, या व्हेरिएंटमध्ये असलेला उच्च संसर्ग दर पाहून सर्वसामान्य लोकांची अशी धारणा झाली आहे की, कदाचित नव्या वर्षाची सुरुवातही अशुभ असू शकेल. परिणामी, महामारी अखेर संपणार तरी कधी, हा प्रश्न वारंवार विचारला जातो. डेल्टा हा कोरोनाचा जगभरात सर्वाधिक चर्चेत राहिलेला व्हेरिएन्ट असला तरी ओमायक्रोनचा प्रसार बराच वेगाने होत आहे आणि लवकरच डेल्टा व्हेरिएन्टपेक्षा अधिक प्रसार झालेला हा व्हेरिएन्ट ठरेल. रिसेप्टर बाइंडिंग डोमेनमध्ये (विषाणूचा असा हिस्सा, जो त्याला पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि संसर्गाचा फैलाव करण्यासाठी शरीराचा रिसेप्टर भेदण्यास मदत करतो) आणि फ्यूरिन क्लीवेज साइटच्या जवळ होणाऱ्या अत्याधिक म्यूटेशनमुळे ओमायक्रोन हा प्रचंड वेगाने पसरू शकतो, असा कयास लावला जात आहे. अशा वेळी प्रश्न पडतो की, ओमायक्रोन जर इतक्या वेगाने पसरतो आहे तर त्याची लक्षणे इतकी सौम्य कशी? दोन अध्ययनांनी या प्रश्नावर प्रकाशझोत टाकण्याचे काम केले आहे.

मानवी फुप्फुसांच्या उतींचा उपयोग करून हाँगकाँगच्या संशोधकांच्या टीमने काही प्रयोग केले आणि नंतर असे सांगितले की, ओमायक्रोन व्हेरिएन्ट माणसाच्या श्वसनलिकेत (ब्राँकस) मूळ सार्स कोव-2 विषाणूच्या आणि डेल्टा व्हेरिएन्टपेक्षा कितीतरी पट अधिक वेगाने पसरतो. याच कारणामुळे तो अधिक वेगाने संसर्गाचा प्रसार करतो. परंतु दुसरीकडे, फुप्फुसांच्या उतींमध्ये मूळ वुहानच्या स्ट्रेनच्या तुलनेत त्याची सुमारे 10 पट कमी वाढ होते. त्यामुळे आजाराचे गांभीर्य कमी होऊ शकते. दुसरे अध्ययन ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात करण्यात आले. तेथील संशोधकांना असे आढळून आले की, प्रयोगशाळेत तयार केलेल्या फुप्फुसांच्या पेशींमध्ये प्रवेश करण्याची ओमायक्रोनची क्षमता खूपच अधिक होती; परंतु फुप्फुसांच्या पेशी नष्ट करण्याची त्याची कुवत मात्र खूपच कमी होती. आरोग्य विज्ञान असे सांगते की, जर फुप्फुसाच्या पेशी विषाणूमुळे अधिक संसर्गग्रस्त झाल्या, तर आजार गंभीर स्वरूपाचा असतो. म्हणूनच फुप्फुसाच्या पेशींना तुलनात्मकदृष्टय़ा कमी प्रभावित करीत असल्यामुळे ओमायक्रोन आपल्याला सौम्य आजार देतो.

याच प्रकारची आकडेवारी दक्षिण आफ्रिकेतूनही समोर आली आहे. तेथेही लस घेतलेल्या लोकांमध्ये संसर्ग दिसून येत आहे. तिथे गेल्या आठवडय़ात कोविडच्या रुग्णसंख्येत 255 टक्क्यांची वाढ दिसून आली आणि टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट (चाचण्या केलेल्या लोकांमध्ये नवीन रुग्णांचा दर) 30 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अर्थात, बऱ्याच लोकांना अगदी सौम्य लक्षणे होती आणि केवळ 1.7 टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डेल्टाच्या बाबतीत एवढय़ाच कालावधीत हा दर 19 टक्के एवढा होता. पूर्ण लसीकरण केलेल्या लोकांमध्ये ओमायक्रोनमुळे गंभीर आजार होण्याचा धोका कमी आहे. अर्थात, लसनिर्मात्या कंपन्यांनी अनेक दावे करूनसुद्धा ओमायक्रोनच्या विरोधात कोणतीही लस प्रभावी असल्याचे सिद्ध करणारे पुरावे आतापर्यंत मिळालेले नाहीत.

या सर्व बाबतीत हिंदुस्थानातील स्थिती खूपच चांगली आहे. येथे 94 कोटी प्रौढ लोकसंख्येपैकी 64 टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर 28 टक्के लोकांनी कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनची एक लस घेतली आहे. तरीसुद्धा सुमारे 10.8 कोटी प्रौढ असे आहेत, ज्यांचे लसीकरण 22 डिसेंबरपर्यंत झालेले नव्हते. ही संख्या लहान नाही. आपल्याला जास्तीत जास्त प्रौढ लोकसंख्येच्या पूर्ण लसीकरणावर भर द्यावा लागणार आहे. बूस्टर डोससाठी सध्या आपण प्रतीक्षा करू शकतो. ओमायक्रोनच्या वाढत्या धोक्याबाबत घाबरण्याची गरज बिलकूल नाही. कारण हिंदुस्थानात ओमायक्रोनच्या रुग्णांची संख्या कमी आहे. आपण भविष्यासाठी बूस्टर डोस राखून ठेवणेच शहाणपणाचे ठरेल. कारण कदाचित येणाऱ्या काळात असे व्हेरिएन्ट निर्माण होऊ शकतात, जे अधिक वेगाने संसर्ग पसरविणारे आणि अधिक घातक आजार देणारेही असू शकतात. डेल्टा हा असाच विषाणू आहे. अर्थातच, ओमायक्रोनसारख्या हलकी लक्षणे देणाऱ्या आणि वेगाने पसरणाऱ्या व्हेरिएन्टचे खरे तर स्वागतच करायला हवे. कोविड कधी संपणार या प्रश्नाचे उत्तर कुणालाच ठाऊक नसताना ओमायक्रोनसारखे काही व्हेरिएन्ट पॅन्डेमिकचे म्हणजे जागतिक संसर्गाचे रूपांतर एन्डेमिकमध्ये म्हणजे स्थानिक संसर्गात करण्यास साह्यभूत ठरू शकतात.

तरीसुद्धा संसर्गाचा प्रसार रोखणे आणि व्यापक धोका संपुष्टात आणणे महत्त्वपूर्ण आहे. असे करणे अशासाठीही आवश्यक आहे, कारण हा व्हेरिएन्ट भले कमी रोगजनक असला तरी त्याच्या उच्च संसर्गक्षमतेमुळे सामुदायिक रोगप्रतिकार शक्तीवर दबाव वाढू शकतो. आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड मोठी असल्यामुळे लोकसंख्येचा छोटा हिस्सा जरी गंभीररीत्या आजारी पडला तरी रुग्णालयांवर अनावश्यक बोजा पडू शकतो. हिंदुस्थान हा योग आणि ध्यानधारणेवर विश्वास असणारा देश आहे. 21 डिसेंबरला पीएनएएसमध्ये प्रकाशित अमेरिकी संशोधकांचे एक संशोधन असे सांगते की, कमकुवत झालेली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यात योग आणि ध्यानधारणा केल्यामुळे मदत मिळू शकते. याचा अर्थ असा की, योग आणि ध्यानधारणेसह गर्दी टाळण्यासारखे उपाय योजल्यास आणि पूर्ण लसीकरण झाल्यास आपण नव्या व्हेरिएन्टना पराभूत करू शकतो आणि हीच योग्य रणनीती ठरेल.

कोरोनाचा ओमायक्रोन व्हेरिएन्ट सध्या 89 देशांमधील लोकांना अगदी सौम्य स्वरूपाचा संसर्गग्रस्त करीत असला तरी लसीकरणाने मिळालेली किंवा पूर्वी कोरोना झाल्यामुळे तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती भेदण्याची या व्हेरिएन्टची क्षमता हा चिंतेचा विषय बनला आहे. ओमायक्रोनच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहिल्यास, वेगवेगळ्या लोकसंख्येवर त्याचा वेगवेगळा परिणाम दिसून येतो. उदाहरणार्थ ब्रिटनमध्ये 80 ते 90 हजार रुग्ण दिसून आले आहेत; मात्र तेथील 70 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे आणि 40 टक्के लोकांना तर बूस्टर डोसही देण्यात आला आहे. इम्पीरियल कॉलेजच्या अध्ययनातून असे दिसून आले आहे की, ओमायक्रोनचा पुन्हा संसर्ग होण्याचा धोका डेल्टाच्या तुलनेत 5.4 टक्के अधिक आहे. याचा अर्थ असा की, नवा विषाणू पूर्वी झालेल्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या किंवा लसीकरणाने दिलेल्या रोगप्रतिकार शक्तीस चकवा देऊ शकतो. सार्वजनिक आरोग्यासाठी हाच मोठा धोका आहे
(लेखक इम्युनॉलॉजिस्ट आहेत.)