निसर्गवेडे!

276

>> नमिता वारणकर

कोणताही स्वार्थ न बाळगता निसर्गाची जपणूक करायची मग निसर्गही भरभरून कोणालातरी रोजगार देतो.

अकलुजमधील एक माणूस गेली पस्तीस वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो. मुंबई, पुण्याला कार्यक्रमानिमित्त जाताना साठवलेल्या सीताफळाच्या पिशवीभर बिया सोबत घेतो आणि वाटेतल्या दरीत, घाटात फेकून देतो. त्याच घाटांवर सीताफळाची विक्री करणारे बरेच जण दिसतात. याच माणसाने त्यांची विचारपूस केली असता त्याला ‘ही झाडं दरीत उगवलीत. आम्ही फळं गोळा करतो आणि विकतो. शेकडो गरीब कुटुंबं यावर चालतात.’, अशी माहिती त्याला मिळाली. त्या विक्रेत्याकडे गहिवरल्या डोळ्याने पाहत तो पुन्हा बिया गोळा करून घाटात फेकण्यासाठी निघाला.

सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील माध्यमिक शाळेतील एक निवृत्त शिक्षक आणि निसर्गप्रेमी ‘वसंत काळे’! … त्यांना लहानपणापासूनच वडिलांकडून निसर्गरक्षणाचा वसा मिळाला… बालपण खेडय़ात गेलं त्यामुळे निसर्गाची ओढ होतीच, मात्र सध्या होणाऱया प्रचंड वृक्षतोडीमुळे ओसाड झालेला भूभाग पुन्हा हिरवाईने नटावा याकरिता ते ‘बीजलाडू’ म्हणजेच ‘सीडबॉल’तयार करून मातीत पेरण्याचा वैशिष्टय़पूर्ण उपक्रम राबवत आहेत, sहे निसर्गवेडे इतरांना अंतर्मुख करतात. त्यांचा वसा जोपासण्याची आज गरज आहे.

पडेल गावचे वसंत काळे नाणारमधील माध्यमिक शाळेत शिकवत होते. या गावापासून अडीच तासांच्या अंतरावर भरपूर वनसंपदा होती. त्यामुळे जंगलाचा बराच परिचय झाला. जवळजवळ 36 वर्षे ते जंगलात दिवसरात्र फिरत आहेत. तिथे त्यांना बऱयाच नवनवीन वनस्पतींची ओळख झाला पण आता काळाच्या ओघात नवीन बागबायतीमुळे नैसर्गिक जंगलांचा ऱहास झाला. मोठमोठी झाडं, वृक्ष, जंगलं हे सगळं नष्ट होऊन हापूस कलमाच्या बागा झाल्या, काही ठिकाणी रिसॉर्ट उभे राहिले…कातळं, डोंगरही फोडले गेले…जंगलांचा भाग ओसाड झाला…हा भूभाग पुन्हा बहरावा, तेथे नवीन वृक्षांची लागवड व्हावी या हेतूने त्यांना ‘बिजलाडू’, ‘पर्जन्यपाणी साठवा’, ‘रंगपंखांची दुनिया’ अशा निसर्गरक्षणाच्या अनोख्या संकल्पना सुचल्या. विशेष म्हणजे हे सर्व उपक्रम ते विनामूल्य राबवतात. यावर्षी त्यांनी साडेचार हजार सीडबॉल विविध ठिकाणी मातीत पेरले आहेत.

या उपक्रमांविषयी ते सांगतात, ‘निसर्ग मला खूप आवडतो. त्याचा ऱहास होताना मला खूप यातना होतात. त्यासाठी निसर्गापर्यंत पोहोचण्याचा हा छोटासा प्रयत्न’!

काही झाडांच्या शेंगा जमिनीवर पडतात. कोणतंही झाडं बी पेरण्याचंच काम करतं असतं. या शेंगा कृमी, किटक, पशु खातात. तसेच काही शेंगातील दाणेही ते खातात. एकेका झाडावर दोन-दोन पोतं शेंगा, बिया मिळू शकतात. त्यासाठी सतत नाणार दशक्रोशी सागाव, कुंभवडे, तारळ, साखरगोटे, विजयदुर्ग पडेल, तिर्लोट, नाडण, वाघोचर, जामसंडे अशी गावं ते दिवसरात्र पायी फिरतात.

बीजलाडू (सीडबॉल)
आपटा, आवळा, ऐन, काजू, चिंच, बकुळी, बेहळे, जांभूळ अशा जंगली झाडांच्या बिया गोमय, माती, जिवामृत, पंचामृत मिश्रणात घोळवून त्याचे लाडू तयार करायचे. ते शेणखत आणि मातीत घोळवून ते उन्हात सुकवायचे. पाऊस सुरू झाल्यावर ओसाड माळरानावर किंवा डोंगरावर हे बीजलाडू टाकले जातात. हे बीजलाडू व्यवस्थित सुकवावे लागतात. नाहीतर त्यांना बुरशी येऊ शकते. शिवाय ते तडकता कामा नये. हे सीडबॉल मातीत मिसळतात किंवा कुंडीत रुजत घातले तरी चालतात.

रंगपंखांची दुनिया
या उपक्रमाविषयी ते माहिती देतात की, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे पावसाळी फुलांचे महिने आहेत. यावेळी वेगवेगळ्या रानफुलांनी रान फुललेलं असतं. त्याचं वैशिष्टय़ असं की, प्रत्येक नक्षत्राला रान उगवतं आणि प्रत्येकवेळी ते वेगवेगळ्या फुलांनी बहरलेलं असतं. शिवाय प्रत्येक ऋतुतली फुलं वेगवेगळी असतात. त्यांनी शोधलेल्या अशा रानफुलांची माहितीही ते फेसबुक, व्हॉटऍपमार्फत विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींपर्यंत पोहोचवतात.

जंगलातला अनोखा अनुभव!
रात्रीचं जंगल बघणं ही फार मजा असते. अशावेळी आकाशातले ग्रहगोलही बघता येतात. यावेळी तेथे वेगवेगळ्या गमतीजमती दिसतात. अशावेळी रात्रविकासी फुलं बघायला मिळतात. ती सकाळी कोमेजतात. तसेच संध्याकाळी फुलणारी सायंविकासी आणि पहाटे फुलणारी प्रातःविकासी फुलं जंगलात बघायला मिळतात. यामध्ये काही रात्रविकासी कमळंही आहेत, तर काही सायंविकासीही आहेत. यामध्ये छोटी लांडगी, रानदोडकी, आळंब्यांचे काही प्रकार यांचा समावेश आहे.

निसर्गरक्षणाचा वसा जपण्यासाठी…
निसर्ग जपणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आता निसर्गाचा ऱहास भराभर होत चाललाय. जंगलांची अमानुष कत्तल, डोंगर मशिनने पोखरून ओसाड प्रदेश तयार करणे, त्या जागी हॉलीडे होम्स तयार करणं, कातळाला सुरुंग लावणं असे प्रकार वेगाने होत आहेत. त्यामानाने निसर्ग जपण्याचं काम मुंगीच्या गतीने सुरू आहे. तसेच आजही काही ठिकाणी पुराणकाळापासूनची जंगलं आहेत. ज्यांना कुदळीचा स्पर्श झालेला. त्यांचं संवर्धन आपोआप होतंच आहे, मात्र जिथे होत नाही तिथे कठोर शासन केलं पाहिजे, असं मला वाटतं. पशु-पक्षी निसर्गसंवर्धन करतात. ते निसर्गाचा नाश करत नाहीत. मानव मात्र ते नष्ट करतो. तेव्हा वाईट वाटतं, असं त्याचं मत आहे.

z [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या