चारठाणा चारुक्षेत्र शिवनगरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीती मेहेंदळे

मराठवाड्याच्या जिंतूर तालुक्यातलं चारठाणा हे एकाहून एक सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांचं गाव. चारठाणा म्हणजे प्राचीन काळातली तीनशेहून अधिक यादवकालीन स्थापत्यनमुने मिरवणारी चारुक्षेत्र नागरी समजली जात असे. या मंदिर समूहाचा अनोखा वारसा आवर्जून पाहावा असा आणि ठेवा म्हणून जतन करून ठेवावा असा आहे.

पार्वती आणि लक्ष्मी या दोन मोठय़ा देवतांचं एकत्र मानलं गेलेलं रूप म्हणजे प्रभावती देवी आणि तिचं मोठं देवस्थान असलेली प्राचीन प्रभावती नगरी म्हणजे मराठवाड्यातली आजची परभणी. फारसा गवगवा ना झालेले हेमाडपंथी स्थापत्याचे शिलेदार असलेले अनेक मंदिर समूह या मराठवाड्यात आज काही सुरक्षित तर काही दुर्लक्षित आहेत. इथल्या जिंतूर या तालुक्यातलं चारठाणा हे एक असंच एकाहून एक सुंदर आणि वैशिष्टय़पूर्ण मंदिरांचं गाव. चारठाणा म्हणजे प्राचीन काळातली तीनशेहून अधिक यादवकालीन स्थापत्यनमुने मिरवणारी चारुक्षेत्र नागरी समजली जात असे.

चारठाण्यात मंदिरांमध्ये पहिला मान जातो तो नृसिंह मंदिराकडे. हे एक प्राचीन विष्णूमंदिर आहे. मात्र इथे शेषशायी विष्णूची भव्य आणि अनोखी मूर्ती देवळाच्या प्रांगणात आहे. इतर मूर्तींचे अवशेष आहेतच, पण दखल घेण्यासारखी मयुरारूढ कार्तिकेयाची थोडी आधुनिक, पण रेखीव मूर्ती मंदिरात आहे. गावाच्या पश्चिमेस वाहणारी लहान चारुशयना नदी होती जिच्या काठी आज नृसिंह तीर्थ मंदिर आहे. मंदिराच्या समोर दगडी घाट असल्याचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. या मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गाभारा अशी असून आत चक्क शिवलिंग आहे. मूळ नृसिंह मंदिर असून गाभाऱ्यात शिवपिंडी हे वैष्णव व शैव संप्रदायाच्या लाटांचे प्रातिनिधित्व म्हणता येईल. या सभामंडपाच्या उत्तर बाजूस शिलालेख कोरलेला आहे. इतिहास संशोधक शं. गो. तुळपुळे यांनी वाचलेल्या या शिलालेखानुसार हे मंदिर इ. स. 1202 मध्ये बांधले गेल्याचा ठोस पुरावा आपल्याला मिळतो. यावरून असे म्हणता येते की, चारठाण्यातली इतर प्राचीन मंदिरे ही या मंदिराला समकालीन असावीत. हा सभामंडप 16 खांबांवर पेललेला असल्यामुळे मंदिराचे 16 खांबी नृसिंह मंदिर, असेही नाव प्रचलित आहे.

गोकुळेश्वर हे इथलं सर्वात भव्य शिवमंदिर असून सर्वसाधारण तीन भागांत उभारलेले आहे. मधोमध शिवालय असून त्याच्या एका बाजूस मोठी बारव व दुसऱ्या बाजूस मंदिरासारखे स्थापत्य आहे ज्याला स्थानिक लोक मठ भाग म्हणतात. या मठ मंदिरात एक गुप्त प्रवेशद्वार असून गावात त्याला भुयार असे संबोधले जाते. हे शिवमंदिर असून या मंदिरात पूर्वी तांत्रिक शैव पंथाचा पगडा होता आणि त्यांच्या साधनेसाठी हे भुयार किंवा गुप्त प्रवेशद्वार खोदले असावे असं समजतं.

या मंदिराचं अजून एक खास आकर्षण म्हणजे इथली मोठी बारव, तिला पुष्करणी तीर्थ बारव असे म्हटले जाते. या बारवेला बऱ्याच पायऱ्या असून उत्तर दक्षिण व पश्चिम दिशांना प्रत्येकी एक प्रवेशद्वार आहे. पूर्वेकडचे प्रवेशद्वार बुजवलेले असून पूर्वी तिथल्या मूळ देवतेची देवकोष्ठात मूर्ती होती आणि तिची पूजाही होत असे असे ग्रामस्थ सांगतात. बारवेच्या पायऱ्या उतरून खाली गेल्यावर चारी बाजूंना बरेच खांब बांधलेले दिसतात. या बारवेच्या भिंतींमध्ये 27 देवकोष्ठे असून त्यात मूर्ती असाव्यात, पण आज दुर्दैवाने एकही अस्तित्वात नाही. या बारवेत पाणी भरलेले असते तेव्हा बेलाचे पान टाकल्यास ते बरोबर मधोमध जाऊन बुडते अशी दंतकथा इथे रूढ आहे. येथे जवळजवळ सगळ्याच मंदिरांमध्ये बरेच कोरीव खांब आहेत. हे येथल्या मंदिरांचं अजून एक वैशिष्टय़. या खांबांवर विविध प्रकारचे शिल्पपट कोरलेले दिसतात. गोकुळेश्वरात खांबावर एक नरपट असून त्यात शिल्पश्लेष दिसतो, म्हणजे त्या नरांचे पाय दर दोघांत सामायिक दिसतात. गोकुळेश्वराच्या शिवमंदिराला मुखमंडप असून तो चार खांबावर बांधलेला दिसतो. आत वाहन मंडप असून इथला नंदी सध्या प्रवेशद्वाराबाहेर ठेवलेला आहे. तो पूर्वी इथे असावा. त्याशेजारी एक सध्या भिंतीत सामावून घेतलेला एक शिल्पाचा भाग दिसतो. तो मूळ त्रिपुरुष मूर्तीचा वाहन भाग असावा असे जाणकार सांगतात. अशी त्रिपुरुष मूर्ती लोणार येथल्या सरोवराजवळच्या मठातही असल्याचे समजते. आत सभामंडप असून त्यात भव्य रंगशिळा आहे आणि इथल्या बऱयाच मंदिरांमध्ये अशा रंगशिळा दिसतात. सभामंडपाच्या एका बाजूस आसनकक्ष असून त्यात उंच आसने दगडात कोरलेली दिसतात. रंगशिळेच्या वरच्या बाजूला अतिभव्य वर्तुळाकृती छत असून ते आकाराने लहान होत जाणाऱ्या शिळांपासून बनवल्याचे समजते. हे छत आजही भक्कम अवस्थेत असून स्थापत्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून पाहता येईल. मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग असून त्याच्या डाव्या बाजूला अजून एक लहान गाभारा दिसतो ज्यात पूर्वी शिवपरिवारातली मूर्ती असावी. सध्या शिवप्रेमींनी शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन केलेली दिसते.

इथल्या रेणुका देवी मंदिरात भव्य सभामंडप आहे आणि त्याचे छत भव्य असून दुर्मिळ व मोठे आहे. छतावरचे अप्रतिम कोरीव काम हे या मंदिराचं वैशिष्ट्य. काशी विश्वनाथ मंदिर हे रेणुका मंदिराशेजारचं जोडमंदिर असून हे शिव मंदिर आहे. तसेच अर्धभग्न अवस्थेतलं उक्कण्डेश्वर मंदिरही आहे. या मंदिरात सप्तमातृका स्पष्ट सुंदर कोरल्या आहेत. प्रत्येकीच्या सोबत वाहनही कोरले आहे. गणपती आणि शिवमंदिर हे अजून एक इथल्या जोडमंदिराचं उदाहरण. यातल्या शिवमंदिराला दोन प्रवेशद्वारं आहेत. एक पूर्वेकडून तर दुसरं उत्तराभिमुख. देवळात भिंतीत देवकोष्ठात भव्य अशी गणपतीची मूर्ती आहे. तसेच येथलं शिवलिंगही अतिशय देखणं व विशाल आहे. या मंदिरात अनेक कथन शिल्पंही कोरलेली आहेत.

[email protected]