
>> निलय वैद्य
न्यायालयातील प्रत्येक खटल्यावर कथा, कादंबरी, नाटक, सिनेमा, मालिका लिहिली जाऊ शकते. ते खरं आहे. जगातील प्रत्येक लहान थोर लेखकाला न्यायालयीन झगडय़ांचं आकर्षण वाटत आलंय. आपल्याकडच्या विशेषतः मराठी लेखक-नाटककारांना या न्यायालयीन नाटय़ाचं कुतूहल काही कमी नाही. आचार्य अत्रे, मधुसूदन कालेलकर, विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, अजित दळवी, प्रशांत दळवी, सुरेश खरे, जयवंत दळवी, अशोक समेळ, अशोक पाटोळे, सई परांजपे, अनिल बर्वे, चं. प्र. देशपांडे या मराठीतल्या महत्त्वाच्या नाटककारांनी मोठय़ा आवडीने न्यायालयीन नाटय़ांचा वापर आपापल्या नाटकात केलेला दिसून येतो.
ही प्रस्तावना करण्याचं कारण म्हणजे डॉ. मधुरा कोरान्नेलिखित ‘न्यायालय आणि मराठी नाटक’ हे नवं कोरं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. मराठी नाटकातील न्यायालय हा कुटिल विषय घेऊन एकशे सहासष्ट पृष्ठांचं देखणं पुस्तक मधुरा यांनी लिहिलंय. यासाठी त्यांचं कौतुक करणं आवश्यक आहे. कारण विषय वेगळा आहे. तसंच विशेष अभ्यासाची यासाठी आवश्यकता आहे.
‘न्यायालय आणि मराठी नाटक’ हे पुस्तक पाच भागांत विभागलेलं आहे. 1) न्याय – न्यायदर्शन म्हणजे काय? 2) न्यायनिर्णय, न्याय व्यवस्था, चाणक्यनीती, न्याय आणि जीवनमूल्ये 3) न्यायालय आणि नाटक 4) कोर्ट मार्शल आणि नाटक 5) न्यायालयाशी संबंधित नाटके असे पाच विभाग आहेत. नाटक आणि न्यायालयीन संदर्भ स्पष्ट करताना मधुरा यांनी आचार्य अत्रेंच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकापासून सुरुवात केली आहे. हे नाटक 1962 साली माधव काझी या गाजलेल्या खटल्यावर आधारलेलं आहे. ‘तो मी…’ ही कलाकृती आचार्य अत्रेंचं कुशल लेखन आणि प्रभाकर पणशीकरांचा झंझावाती अभिनय यामुळे मराठी मनावर कायमस्वरूपी कोरलं गेलं. या नाटकातले प्रसंग, महत्त्वाचे संवाद, व्यक्तिरेखांच्या छटा मधुरा यांनी टिपल्या आहेत.
त्यानंतरचं नाटक आहे मधुसूदन कालेलकरलिखित ‘अपराध मीच केला.’ नानावटी खून खटल्यावर हे नाटक बेतलेलं आहे. नौदलातला अधिकारी आपल्या पत्नीच्या मैत्रिणीच्या भावाचा खून करतो. कारण तो बोटीवर असताना त्याची पत्नी आणि मैत्रिणीचा भाऊ यांच्यातलं प्रकरण चांगलंच तापतं. प्रेम ऊतू जातं. हे उघड झाल्यावर खुनाची घटना घडते. हे ‘अपराध मीच केला’चं कथानक.
सुरेश खरेलिखित ‘स्वर जुळता-गीत तुटे’ या नाटकावरचा लेख मधुरा यांनी ‘अपराध’नंतर लिहिला आहे. या नाटकानंतर आचार्य अत्रेलिखित ‘उद्याचा संसार’ आणि ‘डॉक्टर लागू- डॉक्टर’, विजय तेंडुलकरलिखित ‘शांतता कोर्ट चालू आहे’, रत्नाकर मतकरीलिखित ‘निखारे’, अजित दळवीलिखित ‘समाज स्वास्थ्य’… अशी एकापेक्षा एक सरस नाटकं मधुरा यांनी निवडली आहेत.
या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे मधुरा यांनी निवडलेल्या एकाही नाटकाचे प्रयोग सध्या सुरू नाहीत. एखाद दुसऱया नाटकाचा अपवाद वगळता तशी शक्यताही नाही. सध्या पुनरुज्जीवित नाटकांची लाट आहे. त्यामुळे काही गाजलेली नाटकं पुन्हा रंगभूमीवर येऊ शकतात, पण तो अपवाद ठरेल. त्यामुळे मधुरा यांचं पुस्तक वाचावं, मग नाटक पाहावं किंवा आधी नाटक पाहून नंतर पुस्तक वाचावं ही सोय ‘न्यायालय आणि मराठी नाटक’ या पुस्तकाच्या बाबतीत शक्य नाही. त्यामुळे सर्वसामान्य नाटय़रसिकाला या पुस्तकाचा आस्वाद घेणं कठीण आहे.
पुण्याच्या ‘स्नेहवर्धन’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची मांडणी नीटनेटकी आहे. मुखपृष्ठ संतोष धोंगडे यांचं आहे. यात त्यांनी प्रामुख्याने काळय़ा-करडय़ा रंगाचा वापर केलाय. नाटकाची पार्श्वभूमी अधोरेखित करण्यासाठी लालसर रंगाचा पडदा आणि स्पॉट लाईट दाखवला आहे. तरी मुखपृष्ठात काही जान आहे, असं वाटत नाही.
न्यायालय आणि मराठी नाटक
लेखिका – डॉ. मधुरा कोरान्ने
प्रकाशक – स्नेहवर्धन, पुणे
पृष्ठ- 166 मूल्य – 200 रुपये




























































