शिवमंदिरांच्या राज्यात – आवासचं शिवसंकुल

>> नीती मेहेंदळे 

मुंबईहून येताना रेवस-मांडवाचा धक्का ओलांडून अलिबागमध्ये शिरलं की अरबी समुद्राचा किनारा सांभाळणारी काही अतिशय सुंदर गावं लागतात. आवास एक असंच टुमदार गाव. गावाच्या पंचक्रोशीत धोकावडे, सासवणे, किहीम-चोंढी, बामणसुरे, थळ, लोणारे अशी मजेदार नावांची गावं आहेत आणि या प्रत्येकाचं किमान एक असं मिळून मोठं शिवमंदिरांचं संकुल अलिबागच्या उत्तर वेशीचं रक्षण करत आहे. सासवणेचे शिल्पकार पद्मश्री करमरकरांचं शिल्पालय प्रसिद्धच आहे. पण सासवणेजवळ धोकावडेमधलं गोठेश्वराचं विशाल तळ्याकाठचं निर्जनवासी पण निसर्गसंपन्न असल्याने लक्ष वेधून घेतं. अंगणातला मुळापासून मोठाल्या फांद्यांनी अस्ताव्यस्त वाढलेला वृक्ष आणि माकडांचं अस्तित्व अधोरेखित करणारं हे शिवालय आपलं जीर्णोद्धारित प्राचिनत्व सांभाळत आहे.

आवासचं नागेश्वर हे एक आख्यायिका पोटात बाळगणारं जागृत शिवालय तसं भर वस्तीतच आहे. कोण्या नागोजी साधूने म्हणे तीर्थक्षेत्रे फिरायला आलेला असताना कनकेश्वराच्या दर्शनाआधी आवासमधे मुक्काम केला आणि इथे घडलेल्या घटनांनी तो इथलाच रहिवाशी होऊन गेला. त्या साधूच्या वास्तव्यामुळे गावाला चांगली प्रचीती आली व लोक त्याचे भक्त झाले. या साधू महाराजांनी आवासमध्येच समाधी घेतली. या साधूचे नागांशी सान्निध्य असे. इथे नागांचा आजही वास आहे असं स्थानिक सांगतात. साधूच्या समाधी दिनाच्या दुसऱया दिवशी कार्तिल शुद्ध चतुर्दशीला नागेश्वराची वार्षिक यात्रा असते, त्यात नागोबा देवाची कनकेश्वराला पालखी नेऊन आणतात. ही नागोजी साधूची इच्छा होती असं आख्यायिका सांगते. भाविक आपले मनोदय सिद्ध झाले की नागेश्वर मंदिरात घंटा बांधतात. अशा अनेक पितळी घंटा आपल्याला तिथे दिसतात.

गावात सोमेश्वराचं आणि सिद्धेश्वराचं अशी अजून दोन शिवमंदिरं आहेत. सिद्धेश्वराचं मंदिर अतिशय देखणं बांधलं आहे. या परिसरात अनेक जातीच्या तुळशी बघायला मिळतात. आवासच्या हद्दीवर अजून एक प्राचीन खंबाळेश्वराचं शिवालय सापडतं. येथेही देवळातल्या लेखात नागोजी साधूचा व त्याच्या शिष्यांचा उल्लेख सापडतो. नागेश्वर सोडल्यास ही सगळी मंदिरं मोठमोठय़ा तळ्यांकाठी बांधलेली आहेत. जवळच किहिम गावातलं भिलेश्वर असंच लक्षात राहणारं प्राचिनत्वाच्या खुणा जपणारं एक शिवालय आहे. थळ गावातलं थळेश्वर, लोणारेचं गोकुळेश्वर येथील मोठे नंदी आणि काही जुने अवशेष तिथलं पुरातत्त्व सांभाळत आहेत. याशिवाय थळची थाळबादेवी, आवासची पांडवादेवी, गुंजीसची गुंजबादेवी, कोळगावची काळंबादेवी या आणि अशा अनेक ग्रामदेवता अलिबागची उत्तर दिशेची वेस राखत आजही उभ्या आहेत.

अलिबाग आणि त्याच्या हद्दींमध्ये असे अनेक शिव अधिवास आहेत एकाहून एक सरस आणि पुरातन पण जतन केलेले. रायगड जिह्यातला हा भाग पूर्वीपासून बंदरांचा व व्यापारउदिमाचा असल्यामुळे मनुष्यवस्ती आणि योगाने मंदिरं आणि श्रद्धाही स्थानापन्न झाली.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या