शिवमंदिरांच्या राज्यात : सोमेश्वराचं सार्वभौम राज्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीती मेहेंदळे

कधी कधी असं वाटतं की, एखाद्या जिल्ह्यात सगळी गावं म्हणजे खरं तर एकमेकांत गुंतलेली असायला हवीत, पण तसं नसून ती एकेक स्वतंत्र सक्षम बेटं असतात. म्हणजे भौगोलिकदृष्टय़ा नव्हे. बेट म्हणजे सार्वभौम राज्य अशा अर्थी अभिप्रेत आहे. कधी त्यांना एक आख्यायिका जोडलेली असते, कधी त्यात भरपूर मंदिरं आणि कळसांची अहमहमिका लागलेली असते, तर कधी अख्खं गाव पायऱया उतरून खाली वसलेलं असतं. कधी सागरी किनारे लाभलेले, तर कधी गावाने डोंगर, घाटवाटा जवळ केलेल्या असतात. रत्नागिरी हा असा एक नमुनेदार जिल्हा आहे. मौजे रत्नागिरी सोडलं की, पश्चिमेकडे सरकताना दहाबारा किलोमीटरच्या अंतरावर आडबाजूला एक नितांत रम्य परिसर आहे. दुरून गच्च दिसणाऱया घनदाट राया, उंच ताडाची झाडं गावकुसाला फेर धरलेली. मधोमध गावात शिरणारा लाल मातीचा रस्ता. गावाच्या तिन्ही बाजूंना काजळी नदीने मिठी मारलेली. त्यामुळे गावात शिरायचं म्हणजे पूल हवाच. असा पूल ओलांडतानाच लक्षात येतं की, हे एक साजरं नेटकं गाव आहे. भगवान शंकराच्या छत्रछायेत वाढलेलं. म्हणून नावही सोमेश्वर. नावासरशी एक पावित्र्याचा, मांगल्याचा सुगंध दरवळल्याचा आभास होतो. साहजिकच आपण ते मंदिर शोधू लागतो. आता सोमेश्वराचे नवा आणि जुना सोमेश्वर असे दोन भाग झाले आहेत. नदीच्या दोन्ही बाजूस वसलेले. जुन्या सोमेश्वरात सगळी प्राचीन मंदिरं आहेत, तर नव्यात नवीन वसाहती.

प्राचीन वारसा धुंडाळताना अग्रक्रम लागतो तो सोमेश्वर मंदिराचा. ऐसपैस विस्तार आणि मोठाला प्राकार असलेलं हे एक पंधरा फूट उंच तटबंदीयुक्त सुरेख मंदिर आहे. मंदिर पूर्ण जांभ्या दगडात बांधलेलं आहे. बाराव्या-तेराव्या शतकात हे बांधलं असावं, पण जीर्णोद्धार मात्र तीनशे वर्षांपूर्वी झाल्याची नोंद सापडते. कौलारू छत आतून संपूर्ण लाकडी तुळयांनी पेललेले असून आजही भक्कम उभं आहे. सभामंडप लाकडी खांबांच्या सहाय्याने उभा असून त्यावर अप्रतिम कोरीव काम दिसतं. गाभारा मात्र दगडी खांबांचा आहे. काळभैरव, गणपती, विठ्ठलाईदेवी, रवळनाथ, भराडीदेवी अशी काही मंदिरं या परिसरात आहेत. शिवाय गावाच्या एका बाजूस असलेलं ग्रामपालेश्वर हे एका पाषाणात कोरलेलं मंदिर गावाचं ग्रामदैवत मानलं जातं.
मंदिरासमोर सहा दीपमाळा आहेत आणि हे मंदिर सोहनी, भावे, केळकर, आठवले अशा काही घराण्यांचं कुलदैवत आहे असं मानलं जातं. त्यातल्या सहा घराण्यांच्या या दीपमाळा आहेत असं गावकरी सांगतात व प्रत्येक घराण्याचे त्रिपूर एकेक दीपमाळ समजली जाते. त्रिपुरी पौर्णिमेस त्या दीपमाळा संपूर्ण लखलखत असतात.

बऱ्याच मंदिरांशी जोडलेली एक आख्यायिका इथेही ऐकिवात आहे. या सोमेश्वर गावात पूर्वी दाट जंगल होतं. तसं ते आजही आहेच. एक गाय या जंगलात येऊन शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करीत असे, पण मालकाकडे दूध देत नसे. त्याने शोध घ्यायचं ठरवलं. तिचा पाठपुरावा करत तो या जंगलात आला. प्राचीन पिंड पाहून तो अचंबित झाला. गावकऱयांना ही हकीकत त्याने वर्णन केली व अखेर गावात सोमेश्वर मंदिराची स्थापना झाली. महाशिवरात्र, माघी चतुर्थी, गोकुळाष्टमी, दासनवमी इ. उत्सव सोमेश्वर मंदिरात वाजतगाजत साजरे होतात. महाशिवरात्रीचा उत्सव दोन दिवस चालतो. पहिल्या दिवशी महापूजा व देव नवसाला पावणारा असल्याने नवस फेडण्याचे कार्यक्रम चालतात. दुसऱया दिवशी महाप्रसाद व पारणे असते, पण शिमगा (होळी) हा इथला सर्वात मोठा उत्सव असतो.

शिमग्याआधी देवाच्या मुखवटय़ाची पालखी इथल्या सगळ्या मंदिरांमधे फिरवली जाते. तसेच गावातल्या मानकऱयांकडेही ती पालखी नेण्याचा प्रघात आहे.

आणखी एक ऐतिहासिक संदर्भ सांगायचा म्हणजे, पेशवाईत एका पेशवेपत्नीचं हे माहेर असून त्याचा मान म्हणून पेशव्यांनी एक पादचारी पूल बांधून दिल्याचे समजते. तो पूल आजही ’चोळीचा पर्ह्या’ म्हणून अस्तित्वात आहे.

जवळ शेजार असलेल्या पोमेंडी या गावातलं रामेश्वर मंदिरही असंच समकालीन आहे, पण जवळ जवळ दीडशे किलोमीटर परिसरात एकही सोमेश्वराइतके मोठे मंदिर दिसत नाही अशी या मंदिराची ख्याती सर्वदूर आहे.

– [email protected]