
>> डॉ. नितीन दि. साटम
अमुक झाले पाहिजे, हे काम शासनाचे तसेच महापालिकेचे आहे. नागरिक म्हणून आपले काही कर्तव्य आहे अशा भावनेतून काही जण न कंटाळता, प्रसंगी आपल्या खिशाला कात्री लावून एक प्रकारे ‘जागल्या’ची भूमिका पार पाडतात. सामाजिक बांधीलकी ज्याच्या नसानसांत भिनलीय असा हाडाचा कार्यकर्ता स्वतःच समस्येला भिडतो. जोपर्यंत हाती घेतलेला प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत पाठपुरावा सोडत नाही. अशांपैकी सामाजिक कार्यकर्त्याचा पिंड असलेला ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक भाऊ सावंत.
शालेय जीवनातच भाऊ वृत्तपत्रीय लेखन करू लागले. आचार्य अत्रे यांच्या निधनानंतर ‘संपादकाच्या जाहीर सूचनेला प्रतिसाद, ‘आचार्य’ नावाचे मासिक निघावे, तेच अत्रेंचे खरे स्मारक होईल’ असे पत्र पाठविले होते. हे पत्र दैनिक ‘मराठा’च्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झाले. भाऊंची वृत्तपत्र लेखनाची सुरुवात 1968 सालात झाली. भाऊंनी सार्वजनिक रुग्णालयातील सायंकाळी 4 ते 6 या गैरसोयीच्या रुग्णभेटीच्या वेळेबाबत पाठपुरावा सुरू केला. वर्तमानपत्रातून पत्र प्रसिद्ध झाले, सहय़ांची मोहीम सुरू केली. खासगी रुग्णालयांना पत्रे लिहून त्यांची लेखी उत्तरे मिळविली. चाकरमान्यांच्या सोयीसाठी रुग्णभेटीची वेळ सायंकाळी 4 ते 7 असावी ही मागणी घेऊन आरोग्यमंत्री, मुंबई महापालिका यांच्या भेटी घेऊन प्रश्न मांडला. मुंबई महापालिका व सरकारी रुग्णालयात 1980 च्यादरम्यान रुग्णभेटीची वेळ सायंकाळी 4.30 ते 6.30 अशी सुरू झाली. ही भाऊंनी हाताळलेली पहिला मोठी समस्या होती. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारांच्या दर्शनी जागी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र लावून घेण्यात यशस्वी झाले.
मुंबईत भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात सन 1993 पासून भाऊंच्या प्रयत्नांनी दरवर्षी तिथीनुसार (ज्येष्ठ वद्य नवमी) राजमाता जिजाऊसाहेब यांची पुण्यतिथी साजरी होते. या दिवशी जिजामाता उद्यानात विनामूल्य प्रवेश देऊन जिजाऊंचे स्मरण केले जाते. व्हिक्टोरिया टर्मिनसचे (व्हीटी) सन 1996 मध्ये ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव झाले, परंतु प्रवासी रेल्वे तिकिटावर इंग्रजीत ‘छत्रपती’ नावात असलेली चूक सुधारून घेतली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढय़ात 107 हुतात्मे झाले. 21 नोव्हेंबर 1955 या दिवशी संयुक्त महाराष्ट्र लढय़ात प्रथम 14 हुतात्मे झाले. 21 नोव्हेंबर हा दिवस शासनाने ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिन’ म्हणून साजरा करावा अशी सूचना भाऊंनी महाराष्ट्र शासनाकडे केली होती. 25 नोव्हेंबर 2000 पासून हा दिवस शासनाच्या वतीने साजरा होतो. ‘हुतात्मा चौक’ या नावाऐवजी ‘हुतात्मा स्मारक चौक’ असे नामकरण करण्याची मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली. आता डिसेंबर 2021 मध्ये ‘हुतात्मा स्मारक चौक’ असे सुधारित नामफलक लावण्यात आले. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, आद्य पत्रकार ‘दर्पण’कार बाळशास्त्र्ााr जांभेकर यांची स्मृती जपण्यासाठी मुंबई महानगरपालिका मुख्यालय व मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या समोरील चौकाला ‘दर्पण’कार बाळशास्त्र्ााr जांभेकर यांचे नाव देण्याची मूळ सूचना भाऊ यांनी केली होती. पत्रकार संघाच्या सहकार्याने पाठपुरावा केला. सूचना मंजूर होऊन 17 मे 2005 रोजी तेव्हाचे उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या हस्ते चौकाचे नामकरण झाले. सातत्याने 54 वर्षे वृत्तपत्र लेखक, स्तंभलेखक, प्रबोधनकार ठाकरे जीवन चरित्राचे अभ्यासक, संयुक्त महाराष्ट्र लढय़ाचे अभ्यासक असलेले महादेव गोविंद ऊर्फ भाऊ सावंत हे मुंबई मराठी पत्रकार संघ या नावाजलेल्या संस्थेचे ‘सन्माननीय सहसदस्य’ आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या 75 वर्षांनिमित्त ‘टपाल पाकीट’ प्रकाशित केले जावे अशी भाऊ सावंत यांनी मांडली. पत्रकार संघाचे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी यांच्या मदतीने भाऊंनी मुख्य पोस्ट मास्तर जनरल (मुंबई) यांच्याकडे पाठपुरावा केला. टपाल तिकीट प्रस्ताव मंजूर झाला व 21 जून 2016 रोजी त्यावेळच्या लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या शुभहस्ते टपाल पाकिटाचे प्रकाशन झाले. याच कार्यक्रमात महाजन यांच्या हस्ते भाऊंचा विशेष सन्मान करण्यात आला. भायखळा येथील जिजामाता उद्यानात राजमाता जिजाऊसाहेब व बाल शिवाजीराजे यांचा पुतळा उभारण्यासाठी मुंबई महापालिकेकडे भाऊंनी 17 वर्षे पाठपुरावा केला. 18 जून 1998 रोजी पुतळय़ाचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झाले. मुंबई महापालिकेने आयोजित केलेल्या सोहळय़ात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महापालिकेचे बोधचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भाऊंचा नागरी सत्कार करण्यात आला होता. मराठी भाषा, संस्कृतीसाठी आग्रही असणाऱया भाऊ यांना उद्या 4 जून 2022 रोजी मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत ‘पत्रभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.































































