रंगवाचा…समृद्ध करणारा अनुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पवन खेबुडकर

केवळ नाटक या विषयाला वाहिलेलं आणि या विषयाला विविध अंगांनी स्पर्श करणारं ‘रंगवाचा’ हे त्रैमासिक कणकवलीतील वामन पंडित यांच्या पुढाकाराने प्रसिद्ध होते. रंगभूमी म्हणजे नेमकं काय, याचं सर्वंकष उत्तर देणारं हे एकमेव नियतकालिक आहे.

तुम्ही नाट्य रसिक असा अथवा रंगकर्मी. मात्र अद्यापही तुम्हाला ‘रंगवाचा’ हे काय प्रकरण आहे हे माहीत नसेल तर तुम्ही आजपर्यंत फार मोठ्या आनंदाला मुकला आहात आणि तेही थोडीथोडकी नव्हे, तर पाच वर्षे! त्याचं कारण असं आहे की, तुम्ही आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या नाट्यविषयक घडामोडींविषयी जाणून घ्यायला उत्सुक नेहमीच असता. आपल्याबरोबरच आपल्या राज्यात, हिंदुस्थानातल्या इतर राज्यांत किंवा अगदी परदेशातही तिथल्या रंगभूमीवर काय काय घडतं आहे याची आपल्याला माहिती व्हावी, ते जाणून घेता यावं, असं आपल्याला वाटत असतं. मात्र हे सगळे कुठे मिळणार? हे सगळंच एकत्र, एकाच ठिकाणी देण्याचं काम गेली पाच वर्षे एका त्रैमासिकाच्या माध्यमातून अव्याहतपणे चालू आहे आणि या त्रैमासिकाचं नाव आहे ‘रंगवाचा’.

आपली कोकणची भूमी ही कलाकारांची भूमी आहे. कोकणाने आजवर आपल्याला अनेक लेखक, कवी, नाटककार दिले. आजवर अनेक नाट्यसंस्था इथं रुजल्या, वाढल्या. त्यापैकी एक नावाजलेली संस्था म्हणजे कणकवलीची वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान. गेली चार दशके ही संस्था संगीत स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक नाटकांचा महोत्सव, नाट्य वाचन स्पर्धा, नाट्य, संगीतविषयक प्रशिक्षण शिबिरे, व्याख्याने इ.चे सातत्याने यशस्वी आयोजन करत आली आहे. याच संस्थेत स्थापनेपासून काम करत असलेले वामन पंडित यांच्या प्रेरणेने आणि खरं तर या नाट्यवेड्या रंगकर्मीच्या आग्रहाने आणि सततच्या पाठपुराव्याने आचरेकर प्रतिष्ठानच्या वतीने ‘रंगवाचा’ सुरू झाला. वामन पंडित यांनी अशा नियतकालिकाचा इतका ध्यास घेतला होती की, या झपाटलेल्या माणसानं त्यांना मिळालेल्या काही पुरस्कारांची रक्कम याकामी संस्थेकडे सुपूर्द केली आणि मासिक शक्य नसेल तर किमान त्रैमासिक सुरू करू असे ठरवून ‘रंगवाचा’ सुरू केले व स्वतः संपादकपदाची जबाबदारीही स्वीकारली.

‘रंगवाचा’ फेब्रुवारी 2017 ला सुरू झाला, पण नेहमीप्रमाणेच त्याला अपेक्षित प्रतिसाद खुद्द रंगकर्मींकडूनच मिळत नव्हता. त्याकरिता पंडितांनी वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. वेगवेगळ्या शहरात/गावात काही नाट्यविषयक महत्त्वाची घडामोड घडत असल्याचे हेरून त्या ठिकाणी जाऊन ‘रंगवाचा’चे काही अंक प्रकाशित केले. पहिला अंक पुण्यात कै. कंवालम पणीक्कर नाट्य महोत्सवात प्रकाशित केला. दुसरा गो. ब. देवल स्मृतिप्रित्यर्थ मराठी नाट्य परिषदेने मुंबई येथे आयोजित केलेल्या कलावंत मेळाव्यात आणि त्याच बरोबरीने मडगाव, गोवा येथील पंचमवेद नाट्य महोत्सवात अशा दोन ठिकाणांहून प्रकाशित केला तर तिसरा अंक नाशिक येथे प्रकाशित करण्यात आला.

या फेब्रुवारीत ‘रंगवाचा’ला 5 वर्षे पूर्ण होत आहेत. हळूहळू वाचकांची संख्या वाढते आहे. मात्र अजूनही तो अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावा असे आवर्जून म्हणावेसे वाटते. ‘रंगवाचा’मध्ये थिएटरविषयी नेमकं काय आहे याचं उत्तर शोधताना ‘रंगवाचा’च्या अंतरंगात पाहायला हवं. ‘रंगवाचा’मधली सदरंच खूप बोलकी आहेत.

रंगप्रयोग, हिंदुस्थानी रंगभूमीवरील घडामोडी मांडणारं रंगभारती, पाश्चात्त्य रंगभूमीविषयक रंगधरती, रंगधारा, रंगसंवाद, बालरंगभूमीला वाहिलेलं सदर कोवळे रंग, नाट्यविषयक घडामोडींचं रंगवृत्त, अशा विविध विषयांना ‘रंगवाचा’नं स्पर्श केला आहे या पाच वर्षांतले हे सर्व अंक म्हणजे एक संग्राह्य अमूल्य दस्तावेज झाला आहे.

लेखकांची मांदियाळी-
रंगवाचाला खरे समृद्ध केले आहे रंगभूमीवर अनेक वर्षे कार्यरत असलेल्या असंख्य कलाकारांच्या लेखांनी. त्यांच्या अनुभवांनी. वामन पंडितांनी या सर्वांना लिहितं केलं आणि त्यांनीही आपलं योगदान रंगवाचाला दिलं. या लेखकांच्या यादीवर एक नजर टाकली तरी आपल्याला याचं मोल लक्षात येईल. रंगवाच्याच्या लेखकात अगदी नसिरूद्दीन शहा, अमोल पालेकर, रामू रामनाथन्, ज्योती सुभाष, कमलाकर सोनटक्के, प्रतिमा कुलकर्णी, माधव वझे, राजीव नाईक, कमलाकर नाडकर्णी, अरुण खोपकर, अनंत भावे, जयंत पवार, विजय तापस, चं. प्र. देशपांडे, अवधुत पालेकर, नीरजा, विवेक लागू, लता रवींद्र, गणेश मतकरी, प्रेमानंद गज्वी, आशुतोष पोतदार, चंद्रशेखर फणसळकर, डॉ. शरद भुथाडिया, अनिरुद्ध खुटवड, हिमांशू स्मार्त असे नाटय़ क्षेत्राला भरीव योगदान दिलेले रंगकर्मी भेटतात. शिवाय अतुल पेठे, शफाअत खान, अनिल फराकटे, मेधा सिधये, अविनाश कोल्हे, मनस्विनी-लता-रवींद्र हे नियमित लेखक काही सदरांच्या लेखनाची बरीच मोठी जबाबदारी पेलतात.

रंगवाचाचे विशेषांक
रंगवाचाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विशेषांक. दुसऱ्या वर्षापासून शक्यतो शेवटचा चौथा अंक हा विशेषांक म्हणून प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली. पहिला विशेषांक हा विल्यम शेक्सपिअरच्या गाजलेल्या हॅम्लेट या कलाकृतीला वाहिलेला. अनेक नामवंतांच्या अभ्यासपूर्ण लेखांनी पूर्ण असा हा विशेषांक आहे. तिसऱ्या वर्षातील अंकाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील नामांकित 18 दिग्दर्शकांनी लिहिलेली त्यांची स्वगतं. जवळपास 36 एक दिग्दर्शकांना पत्ररूपानं एक प्रश्नावली पाठवून एकूण त्यांची दिग्दर्शकीय भूमिका समजून घेण्याचा हा एक अभिनव प्रयोग होता. ज्याला 18 दिग्दर्शकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

चौथ्या वर्षीच्या दिवाळी अंकात महान नाट्यकर्मी इब्राहिम अल्काझी यांच्या आठवणींना उजाळा देणारे विशेष लेख होते. अल्काझी स्मृतीमध्ये महाराष्ट्रासह हिंदुस्थानातील त्यांच्या शिष्यांनी, रंगकर्मींनी त्यांच्या दिग्दर्शनातले विविध पैलू सांगून जणू त्यांना वाहिलेली ही आदरांजलीच. यातीलच दुसऱ्या पडझड आणि उभारी या विभागात कोरोनाच्या महासंकटाने जगाला आणि पर्यायाने रंगभूमीला ज्या कठीण प्रसंगांना सामना करावा लागला. त्या अनुषंगाने विविध देशातील रंगभूमी-त्यावर आलेली संकटे व त्यावर उपाय शोधून विविध रंगकर्मींनी केलेले प्रयत्न याचा धांडोळा या विभागात मराठी रंगभूमीवरील मान्यवरांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने घेतला आहे.

पाचव्या वर्षी रंगवाचाने दोन विशेषांक प्रकाशित केले. त्यापैकी पहिला म्हणजे एकांकिका विशेषांक. यावर्षी नाथ पै एकांकिका लेखन स्पर्धा दोन गटात (शालेय व खुला) घेतल्या गेल्या. तसेच प्रतिथयश लेखकांना त्यांच्या एकांकिका देण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांनीही अतिशय उत्तम प्रतिसाद दिला व जवळपास 30 नव्या एकांकिकांनी सजलेला हा विशेषांक अतिशय संग्राह्य असा झाला.

यावर्षी दिवाळी अंकाच्या निमित्ताने निघालेला विशेषांक म्हणजे मान्यवरांच्या लेखांची अक्षरशः मेजवानी आहे. या अंकात पन्नासहून अधिक विविध विषयांना स्पर्श केलेल्या लेखांतून मान्यवरांचे विचार, त्यांचे अनुभव याचं दर्शन या अंकात होतं. रंगवाचाचं गेली पाच वर्षे चाललेलं काम खूप विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने चालल्याचे दिसून येते. वामन पंडित व आचरेकर प्रतिष्ठान यांचं खूप मोलाचं योगदान या सगळ्याच्या मागे आहे. सतिश आळेकर, कमलाकर नाडकर्णी आणि अतुल पेठे यांचे सल्लागार मंडळ आणि पंडितांच्या रंगकर्मींना लिहितं करण्याच्या हातोटीमुळं रंगवाचाला आज एका समाधानकारक उंचीवर नेण्यात हे सारे यशस्वी झाले आहेत. आजवर प्रसिद्ध झालेले रंगवाचाचे 20 अंक हा रंगभूमीचा इतिहास आणि वर्तमान यांचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. तो प्रत्येक नाटय़रसिक आणि रंगकर्मींच्या संग्रही असायला हवा. रंगवाचाचे वर्गणीदार व्हायचे असेल तर जरूर संपर्क करा. पंडित आणि रंगवाचा दोघे तुम्हाला निराश करणार नाहीत.

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कार्यकारी अध्यक्ष, वामन पंडित – 9422054744