आपला माणूस – अध्यापक संशोधक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रदीप म्हात्रे

केशवसुत स्मारक, मालगुंड, (जि. रत्नागिरी) येथे शनिवारपासून (18 जानेवारी) सुरू झालेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या चोपन्नाव्या मराठी विज्ञान अधिवेशनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ व विज्ञान शिक्षणतज्ञ प्रा. हेमचंद्र प्रधान हे भूषवीत आहेत. हा एकप्रकारे विज्ञान संशोधन आणि विज्ञान शिक्षण या दोन्ही क्षेत्रात मुलभूत काम करणाऱया अध्यापक संशोधकाचा गौरव आहे.

प्रा. डॉ. हेमचंद्र चिंतामणी प्रधान. भौतिकशास्त्र, अणुभौतिकशास्त्र आणि गणितातील संशोधकापासून विज्ञान संशोधन, अध्यापन, लेखन आणि नियतकालिकांचे संपादन अशा विविधांगी क्षेत्रातील एक मान्यताप्राप्त नाव. मराठी विज्ञान परिषदेच्या मालगुंड (जिल्हा रत्नागिरी) येथे सुरू असलेल्या मराठी विज्ञान अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा मान प्रा. प्रधान यांना यावेळी मिळाला आहे. 30 जून 1946 रोजी मुंबईत जन्मलेल्या प्रा. हेमचंद्र चिंतामणी प्रधान यांचे शालेय शिक्षण ठाण्यात झाले. 1961च्या शालांत परीक्षेत ते बोर्डात सर्वप्रथम आले. त्यानंतर भौतिकशास्त्र विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी. आणि एम.एस्सी. परीक्षेत विद्यापीठातही सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला. किंबहुना, त्यांनी प्रथम क्रमांक कधी सोडलाच नाही. पुढे अमेरिकेतील ‘एमआयटी’तून (मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) सैद्धांतिक अणुभौतिकशास्त्रात त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. त्यानंतर अमेरिकेतील मॅक्मास्टर आणि विस्कॉन्सिन या विद्यापीठात त्यांनी तीन वर्षे अध्यापन आणि संशोधन केल्यावर अध्यापनाची आवड जोपासता यावी म्हणून हिंदुस्थानात परतणे पसंत केले. 1978 ते 1988 या कालावधीत रामनारायण रुईया महाविद्यालयात आणि नंतर रिजनल इन्स्टमेंटेशन सेंटर या मुंबई विद्यापीठाच्या संस्थांमध्ये भौतिकशास्त्राचे अध्यापन केले. काळाची पावले ओळखत त्यांनी रुईया महाविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन विभाग त्या काळी सुरू करून विद्यार्थ्यांच्या मदतीने चालवला. 1988 साली त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा भाग असलेल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात अध्यापन आणि संशोधन सुरू केले. अणुकेंद्रकाची संरचना व त्यांच्या ऊर्जा पातळ्या, अणुकेंद्रकीय अभिक्रिया, भौतिकशास्त्र्ा, गणित व विज्ञान शिक्षण हे त्यांच्या संशोधनाचे विषय होत. त्यावेळी त्यांना प्रा. भा. मा. उदगावकर आणि प्रा. वि. गो. कुलकर्णी यांच्यासारख्या गुरुतुल्य व्यक्तींचा मार्गदर्शनपर सहवास लाभला. याच कालावधीत म्हणजे ऐंशी आणि नव्वदीच्या दशकात केंद्राची गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ प्रामुख्याने झाली. 1994 ते 2008 या कालावधीत प्रा. अरविंद कुमार केंद्राच्या संचालकपदी असताना विद्यार्थ्यांचे प्रज्ञा संवर्धन, विज्ञान आणि गणित शिक्षकांचे प्रशिक्षण, क्रमिक आणि सहक्रमिक साहित्यनिर्मिती आणि विज्ञान प्रसार अशा सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांचा पुढाकारात्मक सहभाग राहिला. ऑलिम्पियाड आणि संशोधन यासाठी मनुष्यबळ विकास यासारख्या बाबींमध्ये मुख्य भूमिका बजावत असताना त्यांच्यातील नेतृत्वगुणाची चुणूक दिसून आली. होमी भाभा केंद्रात त्यांनी उच्च माध्यमिक स्तरावरच्या जागतिक गुणवत्तेच्या प्रयोगशाळा तयार केल्या, ज्याचा वापर करून हिंदुस्थानी विद्यार्थी ऑलिम्पियाडमध्ये चमकू लागले. ती घौडदौड आजही कायम आहे. 1998 ते 2008 या दहा वर्षांच्या कालावधीत त्यांनी ‘अधिष्ठाता’ म्हणून काम पाहिले. 2008 ते 2011 साली निवृत्त होईपर्यंत ते केंद्र संचालक होते. याच काळात ते विज्ञान ऑलिम्पियाडच्या राष्ट्रीय सुकाणू समितीचे कार्याध्यक्ष होते. निवृत्तीनंतरची सहा वर्षे त्याच संस्थेत राजा रामण्णा फेलो आणि मुंबई विद्यापीठाच्या मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्रात (सीबीएस) त्यांनी अध्यापन केले. विज्ञान आणि गणित विषयातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय शालेय क्रमिक पुस्तके आणि मुक्त विद्यापीठीय क्रमिक पुस्तके अशा चाळीसहून अधिक पुस्तकांचे लेखन, सहलेखन व संपादन केले. त्यांचे अभ्यासक्रम ठरवण्यातही त्यांचा सहभाग आहे. विज्ञानातील निरीक्षण आणि प्रयोग यांचे स्थान, विज्ञानाचा इतिहास व तत्त्वज्ञान, वैज्ञानिक वृत्ती, गणिताचे सौंदर्य, विज्ञान-गणितातील संशोधनाच्या वेगवेगळ्या संधी हे त्यांच्या लेखन-व्याख्यानाचे प्रमुख विषय आहेत. विज्ञान आणि गणित शिक्षणावरील रचनावादी विचार मांडणीवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वर्तमानपत्रातील आणि अन्य प्रासंगिक लिखाणावर आधारित त्यांची ‘विज्ञान शिक्षण नव्या वाटा’ (महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त) आणि ‘विज्ञान- तंत्रज्ञानः स्वरूप आणि पैलू’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिका मासिकात परिभाषा आणि विज्ञान अध्यापन, पाठय़पुस्तकातील विज्ञानाच्या भाषा, परिभाषेची आवश्यकता, विज्ञानाद्वारे होणारे भाषा संवर्धन आदी विषयांवर अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे. मराठी विश्वकोश मंडळाचे सदस्य, कुमार विश्वकोशाच्या जीवसृष्टी आणि पर्यावरण खंडाचे प्रमुख समन्वयक म्हणून काम केले असून ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’ व ‘शिक्षणवेध’ या नियतकालिकांचे संपादक मंडळ सदस्य होते. प्रा. प्रधान यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या उपाध्यक्षपदासह भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्यातील एनसीएसटीसी, एनसीएसएम, विज्ञान केंद्रे, एनसीईआरटी, मुक्त विद्यापीठे, मुंबई, एसएनडीटी, मराठवाडा अशा अनेक विद्यापीठांचे तथा ग्राममंगल, श्री एकवीरा शिक्षण संस्था आदी शैक्षणिक संस्थांचे सल्लागारपद भूषविले आहे.

– [email protected]