प्रियगंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रज्ञा पळसुले

सुक्या गवतात एक हिरवळ जरी उगवायला लागली तरी सारे रान थुई थुई नाचायला लागते तसे आपले आवडते सुगंध आसपास असले की, आपणही त्यात पुरते दरवळून जातो. आपल्यात होणारे कितीतरी छोटे-मोठे बदल आपल्यात आपोआप नवचैतन्य निर्माण करत…

आज आपण अशाच एका जादुई सुगंधाबद्दल बोलतोय.

कदाचित ही सृष्टीची निर्मिती झाल्यापासूनच तमाम सुगंधप्रेमींच्या हृदयावर मनोराज्य गाजवणारा आणि समस्त स्त्री वर्गाचा प्रिय प्रियतम मोगरा.

आ हा हा… नुसते नाव उच्चारले तरी मोगऱ्याचा मिठीचा भास होतो. माझा तर अत्यंत लाडका आणि जवळचा.

घरात कोणताही सणवार असो अथवा शुभकार्य असो मोगरा हवा म्हणजे हवाच गो बाई… याच्या नुसत्या अस्तित्वानेच घराला चार चांद लागतात.

आणि मला विचाराल तर अगदी साध्यातील साडी नेसले तरी केसांत मोगऱ्याचा पांढराशुभ्र गजरा विराजमान झाल्याखेरीज तर शृंगारच पुरा होत नाही… त्यामुळे साडी व मोगऱ्याचा गजरा हे प्राणप्रिय कॉम्बिनेशन वर्षोनुवर्षे जमले गेले आहे किंबहुना हे पारंपरिक पद्धतीने मला वारसाहक्काने मिळालेय असेही म्हणू शकतो.

मला असे नेहमी वाटते मोगऱ्याच्या फुलांत जेवढे सुगंधी सौंदर्य भरलेले आहे तेवढे कोणत्याच फुलांत नाही आणि साधी राहणी व उच्च विचारसरणी हे काय असते याचेही निसर्गातील अप्रतिम उदाहरण पेश केलेय.

घरात हळदीपुंकू असो किंवा मोठं शुभकार्य, पण मोगऱ्याच्या सुगंधाने आनंदाचे सनई चौघडे मात्र वाजतगाजत नकळतपणे आपल्या अनमोल क्षणाचा ताबा घेतातच…

साधारणपणे उन्हाळा सुरू झाला की मोगरा बहरायला

लागतो ते अगदी पावसाळा संपेपर्यंत येत राहतो.

आजकाल बाजारात मोगऱ्यासारखी दिसणारी तगरीची फुले व गजरे सर्रास मोगऱ्याच्या नावावर खपवले जातात. पण यात आपल्यालाच थोडं सावध राहून व आपली घाणेंद्रिय जागृत ठेवून व्यवहार करायला हवा. अन्यथा नाहक पैसे तर जातातच, पण घरी आल्यावर चुकीची फुले घेतल्याचा साक्षात्कार झाल्यावर उगाच नसत्या दुःखास सामोरे जावे लागते.

मोगऱ्याच्या दोन ते तीन जाती असतात. सिंगल मोगरा, डबल मोगरा व तीन पाकळ्यांचा मोगरा… पण गंमत अशी की दिसायला जरी यात हलकासा फरक असेल तरी या सर्वांचा सुगंध मात्र अगदी एकच असतो.

मोगरा अनेक अत्तरे, तेल, सौंदर्य प्रसाधने, पावडर यामध्ये टॉप नोट म्हणून वापरला जातो.

देशविदेशात याला खूप मागणीही असते…

त्यामुळे मोगऱ्याची शेती संपूर्ण देशात विविध ठिकाणी होते…

अवघ्या जगाला प्रेमात पाडणारा हा मोगरा देवांनाही फार आवडतो. त्यामुळे नवरात्रोत्सवात देवीसाठी खास वेणीही सजतेच.

आजचा मोगऱ्याचा हा दरवळ तुम्हा-आम्हाच्या आयुष्यावरही असाच राहू दे…

गंधकुपीच्या आजच्या सदरात आपण इथेच थांबू व लवकरच भेटू नवीन कुपीतील नवीन सुगंधासह.

[email protected]