
>> प्रज्ञा पळसुले
रिमझिम पावसाची सर नुकतीच पडून गेल्यानंतर वातावरणात मस्त जमा झालेला गारवा….गॅसवर ठेवलेली फक्त दुधाची वेलचीयुक्त कॉफी. आशाताईचं ‘केव्हा तरी पहाटे’ गाणं. आणि केवळ आपल्याच धुंदीत मस्त असलेली व स्वतःची एक कूस पानांत लपवून बसलेली माझ्या बागेमधील ही ‘अनंता’ची दोन फुलं. हे वैभव म्हणजे केवळ स्वर्गसुखच असतं!
या सुगंधाला तर येथील हवेचीदेखील नजर लागू नये कधीच.
मी शांतपणे तिथेच उभे राहून नजरेने संपूर्ण बाग गोंजारून घेतली. वर भरलेल्या मेघांकडे समाधानाने पाहत आनंदाचा श्वास सोडला व मनोमन वर्षाराणीचे आभार मानले. त्यानंतर जवळ जाऊन मन भरून या फुलांना हृदयपात्रात उतरवून घेतले आणि या ‘अनंता’ला मनसोक्त न्याहाळले.
इतका मंद सुगंध असूनदेखील नकळतपणे अवतीभवती थंड अशी बेधुंदी पसरली होती. आणि मी त्यात छान रममाण होत चालली होती. तेवढय़ात गॅसवर ठेवलेल्या कॉफीतील वेलची माझ्यापर्यंत पोहोचून उकळल्याची सूचना देऊन गेली. तरीही मी पटकन त्या दोन फुलातील एक फूल मोहमायेपायी तोडलेच. आताशी माझ्या बोटांमध्ये अडकलेल्या फुलाने घरातील प्रत्येक वस्तूस आपला मंगलमय परिचय देऊन टाकला होता.
मी ‘अनंता’च्या फुलाला टेबलावरील एका गुलदस्त्यात विराजमान केले. तसे तर हे ‘अनंता’चे झाड जमिनीत जास्त सुखावह असते, पण माझ्यातील निसर्गप्रेमाने गॅलरीमध्ये फक्त ‘अनंत’च नाही तर चाफा, प्राजक्त, मोगरा, केळी, गावठी गुलाबाचे झाड, सायली अशी बरीच फुलझाडे व काही भाज्यांची अशी रोपे लावून छोटीशी बाग मी सजवली होती. आहे.
टेरेस तशी बऱयापैकी मोठी असल्याने फार गर्दी अशी वाटलीच नाही. आता इतकी प्रस्तावना लिहिण्याचे कारण म्हणजे-
सुगंध.
‘अनंता’चाच नव्हे तर असे कितीतरी सुगंध रोज आपल्याभोवती दरवळत असतात. किंबहुना आपलेच जीवन त्यांच्या अवतीभवती घुटमळत असतात आणि नकळतपणे त्यांचा सकारात्मक परिणाम आपल्या मनावर व मेंदूवरही होत असतो, पण गंमत अशी की, ते आपल्याला अनेकदा समजत नसते.
मला नेहमी वाटते की, या जगामध्ये असंख्य प्रकारचे जे सुगंध आहेत त्याची सुरुवात अगदी मनुष्याच्या जन्मापासूनच होते.
या सृष्टीत असलेले जवळजवळ सगळे सुगंध आपण अनुभवू शकतो. त्याच्यासोबत जगूही शकतो. हा विचार मनात आला आणि मी चक्क शंभरहून अधिक सुगंध कागदावर उतरवून काढले. हे सर्व गंध मी माझ्या आठवणींच्या कुपीत साठवून ठेवले आहेत. या सुगंधांची वैशिष्टय़े, त्यांचे नावीन्य, त्यांच्या आपल्या जीवनात असलेले स्थान अशा अनेक ‘परिमळा’ची गंमत न्यारीच आहे. या सर्व सुगंधाची अनोखी सफर ‘गंधकुपी’ या सदरातून वाचकांना घडवून आणली जाणार आहे.
हे सुगंध शब्दांच्या अत्तरदाणीतून शिंपडताना वाचकही आठवणींच्या गंधात रमून जातील ही अपेक्षा!
























































