संस्कृती सोहळा – सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ

>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

रेणुका, अंबा, भवानी ही शक्तिदेवतेची रूपे होत. या शक्तिदेवतांचे संकीर्तन गोंधळाच्या रूपाने होते, तर शंकराचा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱया खंडोबाचे संकीर्तन जागरणातून होते. रेणुराई गोंधळ आणि कदमराई गोंधळ असे गोंधळाचे दोन प्रकार आहेत. हे विधिनाटय़ गणांचे दल सादर करते म्हणून त्यास गोंधळ म्हणतात. रेणुराई गोंधळ हा शारदीय नवरात्रात आणि वासंतिक नवरात्रात होतो.

रेणुका आणि तुळजाभवानी या देवतांच्या प्राचीनतेशी गोंधळाची प्राचीनता निगडित आहे. यादवकालीन आद्य मराठी वाङ्मयात गोंधळाचे उल्लेख आहेत. गोंधळाचा संबंध भूतमातेच्या महोत्सवाशी जोडला जातो.’ वरंगळ्याच्या गणपती काकतीयाचा चालुक्य राजा सोमेश्वर तृतीय (भूलोकमल्ल) याने आपल्या राजधानीत भूतमातृमहोत्सवाच्या प्रसंगी गोंधळाचा कार्यक्रम केला होता. भूतमातेच्या महोत्सवाचे उल्लेख सातव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत आहेत. ‘संगीतरत्नाकर’, ‘संगीतसमयसार’, ‘नृत्यरत्नावली ’, ‘औमापतम’, ‘भरतार्णव’ इत्यादी संगीत- नृत्यविषयक ग्रंथांत गोंधळाचा समावेश ‘गौंडली नृत्य’ या नावाने झालेला आहे. ‘गौंडली’. ‘गुंडली ’, ‘गोंडली’, ‘पुंडली ’ असे त्याचे अनेक नामपर्याय आढळतात. परशुराम हा आपला मूळपुरुष आहे, असे गोंधळी सांगतात. जमदग्नी आणि रेणुका यांच्यापासून आपली उत्पत्ती झाली आहे, अशी त्यांची धारणा असते. ‘रेणुकामाहात्म्य’ या ग्रंथात अशी कथा आहे की, परशुरामाने बेटासुर नावाच्या दैत्याचा वध केल्यानंतर त्याचे शिर तोडले. त्याच शिराच्या ब्रम्हरंध्रात त्याच्याच शिरांचे तंतू ओवले आणि ते खांद्यावर घेऊन ‘तींतृण तींतृण’ असा ध्वनी काढीत तो मातेजवळ आला. बेटासुराच्या धडाचे आणि शिराचे बनविलेले चोंडके वाजवून परशुरामाने जे पहिले मातृवंदन केले, त्यातच गोंधळाची प्रथा उगम पावली. गोंधळामध्ये चोंडके हे वाद्य मात्र वाजविले जात नाही, तर संबळ आणि तुणतुणे ही दोन वाद्ये वाजविली जातात. चोंडके हे वाद्य जोगती वाजवितात. गोंधळी हे लोकसंस्पृतीचे उपासक असून त्यांना आपण लोकपुरोहित किंवा लोकदीक्षित म्हणू शकतो. गोंधळ हा कुळधर्म-कुळाचार म्हणून मराठी लोकसंस्कृतीत लोकप्रिय होता आणि आजही आहे. भागवत संप्रदायी संतांनी आध्यात्मिक उद्बोधनासाठी गोंधळाचे रूपक घेतले.

गोंधळ हे भूतपिशाच्यांच्या नृत्याचे अनुकरण करणारे एक उपासनानृत्य आहे. स्कंदपुराणातील भूतनृत्याचे वर्णन भूमातेच्या महोत्सवात गोंडलीनृत्य झाल्याचा जायणाने केलेला उल्लेख आणि मराठी वाङ्मयात गोंधळाविषयी भूतनृत्यसूचक निर्देश यांचा एकत्र विचार करता हे स्पष्ट होते होते की, गोंधळ हे मूलतः भूमातेच्या उपासनेतील भूतपिशाच्च नृत्य आहे. वरील विवेचनासोबतच डॉ . रा. चिं. ढेरे यांनी प्रत्यक्ष मुलाखतीत गोंधळासंबंधी विवेचन केले ते असे,’आज गोंधळ हा लोकधर्मीय विधी रेणुका, तुळजाभवानी, अंबा अशा देवतांच्या उपासनेशी निगडित आहे. भूतकालाच्या गडद गाभाऱयात दिसेनाशी झाली आहे. गोंधळ्यांना आणि भुत्यांना तिची स्मृतीही उरलेली नाही. त्यांच्या नावांतून त्यांच्या मूळ उपास्याचे सूचना स्पष्ट होत असल्यामुळे आपणास विस्मृतीच्या अंधाराचा वेध घेणे ते आख्यानाचा गोंधळ सादर करतात. रेणुराई गोंधळात प्रामुख्याने स्फुट पदेच असतात. रेणुराई गोंधळ हा आरतीचा गोंधळ म्हणून ओळखला जातो. लोकसंस्पृतीचे उपासक या ग्रंथात डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी गोंधळ या विधिनाटय़ाबद्दल मूलगामी संशोधन केले आहे. वरील अनेक महत्त्वपूर्ण दाखले डॉ. ढेरे यांच्या चिंतनातून आणि अभ्यासातून आलेले आहेत.

कदमराई गोंधळ व रेणुराई गोंधळ यामध्ये गोंधळ्यांची वेशभूषा थोडय़ा फार प्रमाणात सारखीच असते. गोंधळी अंगरखा किंवा झगा व धोतर अशी वेशभूषा करतात. त्यांच्या डोक्याला पगडी किंवा पागोटे, बाराबंदी किंवा झब्बा, नारंगी किंवा लाल फेटा, गळ्यात कवडय़ांची माळ, कमरेवर लाल पट्टा अशी असते. कपाळावर उभे कुंकू, आडवे गंधार (हळद) अशी रंगभूषा असते. पूर्वरंग आणि उत्तररंग अशा दोन भागांत गोंधळ सादर होतो. शिवस्तुती, गण, देवतांना आवाहन, गौळण आणि देवीची स्फुट पदे हा पूर्वरंग. तर रामायण, महाभारत, पुराणे अथवा देवी महात्म्य यातील आख्याने यापैकी एखाद्या विषयांवर गोंधळ सादर केला जातो. याचे स्वरूप हरदासी कीर्तनासारखे असते म्हणून या गोंधळाला हरदासी गोंधळ असेही म्हणतात. नवरात्रात साडेतीन शक्तिपीठांच्या ठिकाणी गोंधळ सादर होतो. गोंधळ महर्षी राजाबापू कदम आणि राधाकृष्ण कदम यांनी गोंधळाला आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय कीर्ती प्राप्त करून दिली. या गोंधळाचे आजचे स्वरूप मात्र केवळ विधिनाटय़ न राहता लोकनृत्य म्हणून झाले आहे. कालाय तस्मै नमः

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या