प्रासंगिक – भेटण्या विठ्ठला, वीट सोडून ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

आषाढी वारी म्हटली की, महाराष्ट्रातील भागवतांमध्ये म्हणजे विठ्ठल भक्तांमध्ये चैतन्य संचारते. ज्येष्ठाचे वेध लागले की, चाहूल लागते ती आषाढी वारीची. तसे पाहता तमाम मनुष्य प्राण्याला कधी ना कधी पंढरीला जाण्याची इच्छा असते. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा तिथे ।। हा अनुभव येण्यासाठी मनात त्या परब्रह्माविषयी प्रेम हवे. असे असले तरी साहित्यिकांनादेखील पंढरपूरच्या पांडुरंगाची ओढ असतेच की. त्याच्या भेटीसाठी त्यांचाही जीव तळमळतो. अगदी नास्तिक माणसालादेखील ते सावळे परब्रह्म पाहून आनंदच होतो. संतांनीदेखील त्या विठ्ठलाशी अभंग आणि ओव्यांतून म्हणजे कवितेतूनच संवाद साधला. अनेक कवींनी त्या विठ्ठलाचे रूपवर्णन केले आहे. याला गझलकार कसे अपवाद असतील. त्यांनीही आपापल्या परीने त्या परब्रह्माचे वर्णन म्हणा, त्याच्यावरील राग म्हणा आपल्या गझलेतून अथवा काही शेरांतून व्यक्त केला आहे. हा विठ्ठल इतका कसा निष्ठूर झाला आहे, त्याला जराही कणव येत नाही का, आपले भक्त रक्त आटेपर्यंत पायी चालत पंढरीला येतात, परंतु त्यांचे कष्ट पाहूनही त्या दयाघनाला उमाळा दाटून येत नाही ही खंत उर्मिलामाई व्यक्त करतात.

ज्येष्ठ गझलकारा आणि गझलगुरू उर्मिलामाई बांदिवडेकर यांचा हा शेर ऐकून विठ्ठलालादेखील उमाळा फुटावा, त्या आर्त स्वरात आळवतात,

किती नाम घ्यावे नि वारीस जावे।
कसा विठ्ठलाला फुटेना उमाळा।।

जन्मभरीच्या श्वासाइतके मोजियले हरिनाम. तुझी आळवणी करताना भक्त काही कसर सोडत नाहीत. ते अखंड हरिनामात दंग असतात. पायी वारीदेखील करतात. त्यावेळी त्यांनी आपला संसाराचा मोह दूर ठेवलेला असतो. त्यांची काही दुःखे, वेदना, व्यथा, विवंचना विठ्ठलाने न सांगताच दूर केल्या पाहिजेत. शेवटी भक्त कुठल्या तरी कामनेने, इच्छापूर्तीसाठी अगदी सांगून काही मागत नसला तरी सर्वज्ञ असलेल्या विठ्ठलाला करुणेचे उमाळा का फुटत नाही, अशी चिंता माई व्यक्त करतात.

जिंतूर येथील ज्येष्ठ गझलकार रत्नाकर जोशी यांनी आपण निष्ठावंत भक्त असूनही देवाला दया का येत नाही, असा सवाल समस्त वारकऱयांच्या आणि भक्तांच्या वतीने थेट विठ्ठलालाच केला आहे. अरे विठ्ठला, तू दीनांचा दयाळू आणि भक्तांचा कनवाळू असा तुझा लौकिक असताना दीन दुःखितांनी टाहो फोडूनदेखील तुला काहीच का दया येत नाही? अखेर तू पत्थराची मूर्ती आहेस की काय, तुला दुबळय़ांचा कळवळा येत नाही का? जनसामान्यांवर अतोनात अत्याचार होत असताना, अस्मानी दुष्काळ घाला घालत असताना आणि सगळय़ा विहिरींचे पाझर आटलेले असताना तुझा दयेचा पाझरदेखील आटला की काय, असे परखडपणे ते विठ्ठलाला पुढील शेरात विचारतात, ते म्हणतात,

चुकवली नाही कधी जन्मात वारी
विठ्ठला केंव्हा तुला फुटणार पाझर

तुला आळवून आमची छाती फुटते, आमचे हृदय विदीर्ण होते. जन्मभरात कधी वारी चुकवली नाही, अपवाद कोविडच्या महामारीचा, परंतु तू आमची किती परीक्षा पाहतोस, कनवाळू हे आपले ब्रीदही तू विसरलास काय, अशी तक्रार करून तुला केव्हा पाझर फुटणार, हे तरी सांग, असे निक्षून विचारतात.

वारीसाठी दिंडय़ा पताकांचे भार घेऊन जातात, त्या विठ्ठलाला आर्ततेने साद घालतात, त्याने त्वरेने धावून यावे, एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते.

तुळजापूरचा तरुण गझलकार धनाजी जाधव म्हणतो की,

हाक देतो तुला, आज धावून ये,
भेटण्या विठ्ठला, वीट सोडून ये !