
>> प्रसाद ताम्हनकर
सध्या सीमावर्ती भागात ड्रोनच्या संशयास्पद हालचाली मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. विशेषतः जम्मू-कश्मीर सीमेवर ड्रोनच्या अनेक संशयास्पद हालचाली हिंदुस्थानी सैन्याने टिपल्या आहेत आणि जोडीला काही संशयास्पद ड्रोन पाडले आहेत तसेच काही जप्तदेखील केले आहेत. चायना आणि पाकिस्तान अशा दोन देशांशी जोडल्या गेलेल्या सीमांवर तर या ड्रोनमुळे हिंदुस्थानी लष्कराची चिंता चांगलीच वाढली आहे. काही वर्षांपर्यंत आपल्या देशात सामान्य व्यक्तीला ड्रोन उडवण्यास परवानगी नव्हती, मात्र हिंदुस्थान सरकारने यास अनुमती दिल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने हे ड्रोन म्हणजे एक मोठा धोका बनत चालले आहे. जम्मूच्या ‘एयरबेस’वरती अतिरेक्यांनी नुकताच ड्रोनच्या मदतीने हल्ला चढवला होता. या हल्ल्यात लष्कराच्या दोन जवानांना किरकोळ दुखापत झाली आणि एका इमारतीचे थोडे नुकसान झाले. हे प्रकरण थोडक्यावर निभावले, मात्र या हल्ल्याची गंभीर दखल घेत आता हिंदुस्थान आपली स्वतःची ‘काऊंटर ड्रोन पॉलिसी’ बनवण्याची तयारी करत आहे.
या हल्ल्यानंतर असे ड्रोन सुरक्षा तंत्रज्ञानाला आधीच ‘डिटेक्ट’ कसे झाले नाहीत किंवा हिंदुस्थानकडे अशा प्रकारचे ड्रोनहल्ले रोखण्यासाठी नक्की काय तंत्रज्ञान उपलब्ध आहे हे प्रश्न मोठय़ा प्रमाणावर चर्चेला आले आहे. हिंदुस्थानच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (Defence Research and Development Organisation – DRDO) अधिकृतपणे याबाबत काही खुलासा केला नसला तरी एका रिपोर्टप्रमाणे DRDO ने स्वतःची अशी खास ‘काऊंटर ड्रोन टेक्नॉलॉजी’ पूर्वीच विकसित केली असून ती शत्रूच्या कोणत्याही प्रकारच्या ड्रोनला डिटेक्ट करून त्याला नष्ट करण्यासाठी सक्षम आहे. या तंत्रज्ञानाला अँटी ड्रोन डिव्हाईस’ असेदेखील म्हटले जात असून लेजर तंत्रज्ञानाच्या मदतीने हे शत्रूच्या ड्रोनला डिटेक्ट करण्यात पारंगत आहे.
DRDOनेदेखील 17 नोव्हेंबरला एकाच वेळी 25 ड्रोनचा थवा उडवून या क्षेत्रातील आपल्या ताकदीचे प्रदर्शन करून दाखवले आहे. लक्षाला अचूक हेरणे, त्याला घेरणे आणि त्याचा अचूक वेध घेणे अशा विविध कारवाया यावेळी या ड्रोन्सच्या मदतीने करून दाखवण्यात आल्या. हिदुस्थानमध्ये अशा प्रकारे ड्रोनचे प्रदर्शन याआधी गेल्या जानेवारी महिन्यात करण्यात आले होते. त्यावेळी हिंदुस्थानी लष्कराने स्वदेशी बनावटीची 75 ड्रोन्स एकाचवेळी उडवून दाखवली होती आणि त्यांच्या मदतीने विविध आक्रमक कारवाया कशा पार पाडल्या जातील याचेदेखील प्रदर्शन केले होते.
बराच काळ हिंदुस्थान हा हेरगिरीसाठी ड्रोन्सचा वापर करीत आहे. आता हिंदुस्थान आपली आक्रमण क्षमता वाढवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानावरती विशेष भर देत आहे. यासाठी हिंदुस्थान अमेरिका आणि इस्राईलसारख्या देशांशी यासंदर्भात संयुक्त कार्यक्रमदेखील राबवीत आहे. सध्या हिंदुस्थानी लष्कराकडे असलेल्या ड्रोन्सपैकी सर्वाधिक ड्रोन्स इस्राईलकडून खरेदी करण्यात आलेली आहेत. गेल्या वर्षी झालेल्या अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यात झालेल्या युद्धानंतर ड्रोन्सचे महत्त्व जगाच्या प्रामुख्याने लक्षात आले. हिंदुस्थाननेदेखील या युद्धापासून योग्य तो धडा घेत ड्रोन तंत्रज्ञानाकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या युद्धात अझरबैजानने मोठय़ा प्रमाणावर आणि कुशलतेने ड्रोन्सचा वापर करून निर्णायक विजय मिळवला होता. अझरबैजानच्या ताफ्यातील ड्रोन्स प्रामुख्याने इस्राईल आणि तुर्कस्तान बनावटीची होती. तुर्कस्तान हा पाकिस्तानचा राजनैतिक मित्र समजला जातो. त्यामुळे पाकिस्तान तुर्कस्तानशी हातमिळवणी करून ड्रोन तंत्रज्ञानात भरारी घेण्यापूर्वीच हिंदुस्थानने योग्य ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे हे उत्तम.



























































