साय-फाय – एलियन्सशी भेट होणार का?

>> प्रसाद ताम्हनकर

आपल्या सौरमंडलात नसलेल्या आणि प्रचंड दूर असलेल्या या सहा बटू ग्रहांवर जीवसृष्टी असण्याची सर्वात जास्त शक्यता शास्त्र्ाज्ञ कायम व्यक्त करत असतात. या ग्रहांचा विशेष अभ्यास देखील त्यासाठी सुरू आहे. या बटू ग्रहांना सुपर अर्थ किंवा मिनी नेपच्यून म्हणून देखील ओळखले जाते. ‘हबल ऑप्टिकल टेलिस्कोप’च्या मदतीने या ग्रहांचा शोध घेणे, त्यांचे निरिक्षण करणे सहजसाध्य होत असले, तरी या ग्रहांवरील वातावरणाचा अभ्यास करणे दुरापास्त होते, हे आता नासाच्या या नव्या ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने सोपे होणार आहे.

मानवी इतिहासापासून ते मानवाच्या लिखित, मौखिक साहित्यात सगळ्यात रंजक विषय कोणता असेल, तर तो म्हणजे परग्रहवासी होय. या विषयाला वाहिलेल्या करोडो कथा, कादंबऱया आणि चित्रपट आपल्याला याचीच साक्ष देत असतात. परग्रहवासी खरंच अस्तित्वात आहेत का? ते कसे दिसतात? ते आपल्यापेक्षा प्रगत आहेत का मागासलेले आहेत? त्यांच्यापासून मानवाला कितपत धोका आहे? असे अनेक प्रश्न आपल्याला कायमच पडत असतात. आता या परग्रहवासीयांच्या शोधाला लवकरच एक नवी दिशा मिळणार आहे. आजवर जगभरातले अवकाश शास्त्र्ाज्ञ आणि अभ्यासक ‘हबल ऑप्टिकल टेलिस्कोप’ आणि इतर मर्यादित साधनांच्या मदतीने इतर ग्रहांवरील जीवनाचा शोध घेण्याचा शर्थीने प्रयत्न करीत होते. मात्र आता लवकरच नासा ही अवकाशविज्ञान शास्त्र्ाातील आघाडीची संस्था ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST)’ या आपल्या नव्या उपकरणाला लाँच करण्याच्या तयारीत आहे. अवकाश विज्ञानातला हा आजवरचा सगळ्यात शक्तीशाली असा टेलिस्कोप असणार आहे. या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत हा आपल्या कामाला सुरुवात करेल, असा अंदाज आहे. इन्फ्रारेड डिव्हाईसवाला हा टेलिस्कोप कार्यरत होताच केवळ काही चकरांमध्येच अवकाशातील सहा बटू ग्रहांच्या अभ्यासपूर्ण करेल अशी चर्चा आहे. इंटरनेटवर कार्यरत असलेल्या एका ‘खगोल अभ्यासक ग्रुपमध्ये’ करण्यात आलेल्या दाव्यानुसार एकदा कार्यरत झाल्यानंतर अवघ्या 60 तासांत हा ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप इतर ग्रहांवरील जीवनाविषयी काही ठोस पुरावे मिळवण्यात यशस्वी ठरू शकेल.

परग्रहवासीयांच्या शोधाला नवी दिशा मिळत असतानाच, आता परग्रहावर वस्ती करण्याच्या दृष्टीने देखील एक सकारात्मक पाऊल पडले आहे. मंगळ ग्रहावर अनेक खडतर आव्हानांचा सामना करत आपल्या हॅलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण केल्यानंतर आता, नासाच्या पर्सिवियरेंस रोव्हरने श्वास घेण्यासाठी योग्य अशा ऑक्सिजनची निर्मिती मंगळावर करण्यात यश मिळवले आहे. या ऑक्सिजन निर्मितीला अत्यंत महत्त्वाचे यश अशासाठी देखील मानण्यात येत आहे की, या ऑक्सिजनची निर्मिती ही कार्बन डाय ऑक्साईड या वायूचे रुपांतर करून करण्यात आली आहे. कोणत्याही इतर ग्रहावर अशी निर्मिती करण्यात पहिल्यांदाच यश आले असल्याचे नासा तर्फे नमूद करण्यात आले आहे. पर्सिवियरेंस रोव्हरने ‘मॉक्सी’ नामक एका उपकरणाच्या मदतीने मंगळ ग्रहाच्या वायुमंडळातून कार्बन डाय ऑक्साईड वायू गोळा केला आणि मग त्याचे ऑक्सिजनमध्ये यशस्वी रूपांतर केले. ‘मार्स ऑक्सिजन इन सीटू रिसोर्स यूटिलाइजेशन (Mars Oxygen In-Situ Resource Utilization Experiment – MOXIE)’ असे या उपकरणाचे पूर्ण नाव आहे.‘मॅकेनिकल ट्री’ म्हणून देखील ओळखले जाणारे हे उपकरण कार्बन डाय ऑक्साईडच्या मॉलेक्युलच्या विघटनासाठी वीज आणि रसायनांचा वापर करते आणि जोडीला कार्बन मोनॉक्साईडसारखे बाय-प्रॉडक्ट देखील तयार करते. आपल्या पहिल्या प्रयत्नात ‘मॉक्सी’ने 5 ग्रॅम ऑक्सिजन तयार करण्यात यश मिळवले. एखाद्या अंतराळवीराला दहा मिनिटे श्वास घेण्यासाठी हा ऑक्सिजन मुबलक होईल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या