ब्रेन चिपला परवानगी 

>> प्रसाद ताम्हणकर

मानवी मेंदूला संगणकाशी जोडणे हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क याचे स्वप्न आहे. त्यासाठी त्याचे न्यूरालिंक या त्याच्या कंपनीच्या माध्यमातून विविध प्रयोग चालू आहेत. हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले जात आहेत. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए)  या प्रयोगाची मानवावर चाचणी घेण्याची परवानगी आपल्याला मिळाली असल्याचा दावा आता न्यूरालिंकने केला आहे. न्यूरालिंकने यापूर्वीदेखील एकदा एफडीएकडून मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चिपच्या सुरक्षिततेबद्दल शंका असल्यामुळे त्यावेळी अशी परवानगी नाकारण्यात आली होती. हा लेख लिहीपर्यंत तरी एफडीएकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. 

न्यूरालिंकचे स्वप्न असलेल्या या चिपद्वारे लोकांच्या दृष्टी आणि चालण्याशी संबंधित असलेल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी मदत मिळणार आहे. त्याचबरोबर या चिप्सच्या मदतीने इतरही अनेक आजारांवर उपचार करणे शक्य होणार आहे, अगदी लठ्ठपणाच्या समस्येवरदेखील उपचार करणे शक्य होईल असा दावा न्यूरालिंकतर्फे करण्यात आलेला आहे. अंधत्व आणि पक्षाघात अशा रोगांवरच्या उपचारांसोबत या चिपच्या मदतीने दिव्यांग व्यक्तींना मोबाइल आणि संगणक हाताळणे अत्यंत सुलभ होईल असादेखील न्यूरालिंकला विश्वास आहे.

न्यूरालिंकचे हे नवीन तंत्रज्ञान मेंदूला संगणक किंवा अन्य उपकरणाशी जोडण्यासाठी वापरण्यात येईल. ही चिप मेंदूला जोडल्यानंतर ही चिप मेंदूचे इलेक्ट्रिकल सिग्नल रेकॉर्ड करेल आणि लगेच त्यावर काम करायला सुरुवात करेल आणि त्या सिग्नल्सना ती ब्लूटूथच्या मदतीने संगणक किंवा इतर जे डिव्हाईस तिच्याशी जोडलेले असतील त्यांच्या विशिष्ट अॅपवर त्यांना पाठवेल. जे लोक मोबाइल वापरण्यासाठी आपल्या हातांचा वापर करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर असे लोक ब्लूटूथ माऊसद्वारे आणि चिपच्या मदतीने संगणकाचा वापर करणे, त्याला विविध आज्ञा देणे यांसारखी कामे करून सहजपणे संगणकाचादेखील वापर करू शकतील. उदा. एखादी पॅरेलिसेस झालेली व्यक्ती केवळ आपल्या मेंदूद्वारे आज्ञा देऊन संगणकाच्या माऊसला हलवू शकणार आहे, त्याला योग्य जागी नेऊन क्लिकदेखील करू शकणार आहे.

या चिपच्या सुयोग्य वापरासाठी न्यूरालिंकने एक विशिष्ट अॅप बनवले आहे आणि या चिपला चार्ज करण्याची गरज असल्याने एक वायरलेस चार्जरदेखील बनवला आहे. मानवी मेंदूतून संगणकाचा कीबोर्ड आणि माऊससाठी येणाऱया आज्ञांचे योग्य पालन करणे या अॅपमुळे सुलभ होणार आहे, तर न्यूरालिंकने तयार केलेला चार्जर कॉम्पॅक्ट इंडक्टिंग चार्जर प्रकारातला असून तो चिपच्या बॅटरी वायरलेस पद्धतीने जोडता येणे शक्य होणार आहे. शारीरिक व्याधींनी ग्रस्त असलेले रुग्ण या तंत्रज्ञानाच्या मदतीने फोटोग्राफीसारखी कलादेखील जोपासू शकतात असा कंपनीचा दावा आहे.

योगायोगाचा भाग म्हणजे न्यूरालिंकने चाचण्यांना परवानगी मिळाली असल्याचे जाहीर केले असताना आता स्वित्झर्लंडमधील एका अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीने इलेक्ट्रॉनिक इम्प्लॅण्टनंतर चालणे सुरू केले असल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नेदरलँडचा रहिवासी असलेला 40 वर्षीय गर्ट जॅन ओस्कन हा 12 वर्षांपूर्वी सायकलवरून पडला आणि त्या अपघातानंतर तो पुन्हा चालू शकला नाही. विविध उपचारांनंतर आता त्याच्या मेंदूत इलेक्ट्रॉनिक इम्प्लॅण्ट बसवण्यात आले आहे. या इम्प्लॅण्टच्या मदतीने तो आता त्याच्या पायांना पाय हलवण्याच्या आणि चालण्याच्या आज्ञा सहजतेने ट्रान्समिट करू शकते. मुख्य म्हणजे त्याच्या पाठीच्या कण्यामध्येदेखील इलेक्ट्रॉनिक इम्प्लॅण्ट ठेवण्यात आले आहे.

2016 मध्ये न्यूरालिंकची स्थापना झाल्यापासून हे तंत्रज्ञान चर्चेत आहे. या तंत्रज्ञानाविषयी संशोधकांच्यादेखील मतमतांतरे आहेत. मानवी मेंदू हा अत्यंत नाजूक आणि संवेदनशील अवयव असल्याने त्याला हाताळताना अत्यंत काळजीपूर्वक आणि दक्षतेने काम करणे गरजेचे आहे याबद्दल मात्र त्यांच्यात कोणतेही दुमत नाही. कंपनीनेदेखील चिपच्या सुरक्षिततेबद्दल आणि विश्वासार्हतेबद्दल वारंवार खात्री दिलेली आहे. मात्र या चिपचा मानवावर प्रयोग करण्यापूर्वी अधिक विस्तारपूर्वक आणि व्यापक चाचण्यांची आवश्यकता असल्याचे संशोधकांच्या एका गटाचे ठाम मत आहे.