
>> प्रसाद ताम्हनकर
मंगळ’ हा ग्रह कायमच मानवाच्या आकर्षणाचा बिंदू राहिला आहे. गूढ असा मंगळ ग्रह, त्याच्यावरचे काल्पनिक परजीवी, मंगळावरच्या स्वाऱ्या, मंगळावरच्या परग्रहवासीयांनी पृथ्वीवर केलेला हल्ला अशा विषयांना वाहिलेल्या शेकडो चित्रपट कलाकृती, पुस्तके जगभरात प्रचंड लोकप्रिय आहेत. सामान्य व्यक्तीबरोबरच जगभरातील विविध शाखांमध्ये कार्यरत असणाऱया शास्त्र्ाज्ञांसाठीदेखील मंगळ हा कायम आकर्षणाचा आणि संशोधनाचा विषय बनलेला आहे. आता हा मंगळ ग्रह पुन्हा एकदा त्याच्यावर होत असलेल्या भूकंपांमुळे चर्चेत आलेला आहे.
मंगळावर यापूर्वी कधी भूकंप झालेले नाहीत असे नाही. मात्र यावेळी होत असलेले भूकंप हे वारंवार होत आहेत आणि त्यांची तीव्रतादेखील पूर्वीपेक्षा जास्त आहे. पूर्वी शास्त्र्ाज्ञांना मंगळ हा एक शांत आणि असक्रिय असा ग्रह आहे असे वाटायचे. मात्र 2018 मध्ये अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’च्या ‘इनसाइट लॅंडर’ने पहिल्यांदाच मंगळावरून येत असलेले आवाज ऐकले आणि रेकॉर्ड केले. त्याचा आणि इतर डाटाचा अभ्यास करताना मंगळावरदेखील भूकंप होतात आणि तो आपल्याला वाटतो तसा निक्रिय ग्रह नाही हे शास्त्र्ाज्ञांच्या लक्षात आले. त्यानंतरच्या काळात ‘इनसाइट लॅंडर’ने शेकडो भूकंप नोंदवले.
ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे भूभौतिकशास्त्र्ाज्ञ हार्वो कालसिक यांच्या मतानुसार मंगळ पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे या भूकंपावरून स्पष्ट होत आहे. त्यांच्या मतानुसार सर्वात आधी मंगळाचे आवरण कसे आहे ते आपल्याला समजून घ्यावे लागेल. त्यानंतर या भूकंपांचे कारण आणि त्यांची वाढती वारंवारिता आणि तीव्रता आपल्याला समजून घेता येईल. कोणत्याही ग्रहाची चुंबकीय शक्ती ही त्याच्या आतून उगम पावत असते. अशा प्रकारच्या निर्माण होणाऱया चुंबकीय शक्तीला ‘डायनॅमो’ संबोधले जाते. मंगळावर चुंबकीय शक्ती अत्यंत कमी आहे.
चुंबकीय शक्ती ही ग्रहाचे सक्रिय असणे आणि त्याचे शांत असणे यातील महत्त्वाचा धागा आहे. या चुंबकीय शक्तीमुळेच ग्रह आणि त्याच्यावरचे सजीव हे अवकाशातील किरणोत्सर्गापासून बचावतात. पृथ्वीवर हे आपण रोजच बघत असतो, पण मंगळ सूर्यापासून पृथ्वीपेक्षा जास्त अंतरावर आहे आणि तिथे किरणोत्सर्गदेखील जास्त प्रमाणात आहे. चुंबकीय शक्तीशिवाय कोणत्याही ग्रहावर सजीव सृष्टीची शक्यताच नाही.
मंगळावरच्या भूकंपांना ‘मार्सक्वेक’ म्हणून ओळखले जाते. शास्त्र्ाज्ञांनी ‘नासा’ आणि ‘इनसाइट लँडर’ने गोळा केलेल्या मंगळ ग्रहाच्या माहितीवरून (डाटा) मंगळाचा आणि त्याच्यावर होत असलेल्या भूकंपांचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे. मंगळावरील पूर्वीच्या व सध्याच्या भूकंपाचे केंद्र ‘सेर्बेरस फॉसे’ नावाचे ठिकाण असल्याचे शास्त्र्ाज्ञांना त्यांच्या अभ्यासात आढळून आले आहे. हे ठिकाण अनेक हालचालींचा केंद्रबिंदू आहे, जे एक कोटी वर्षांपासून कार्यरत आहे. 2019 सालच्या मे आणि जुलैदरम्यान मंगळावर दोन मोठे भूकंप नोंदवले गेले. या दोन्ही भूकंपांचा केंद्रबिंदू ‘सेर्बेरस फॉसे’ हेच ठिकाण असल्याचेदेखील या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. नासाच्या आकडेवारीनुसार हे भूकंप रात्रीच्या वेळी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मात्र हे भूकंप का होत आहेत याबद्दल निश्चित अशी कोणतीही माहिती शास्त्र्ाज्ञांना अजून मिळू शकलेले नाही. याबद्दल अनेक मतप्रवाह असले तरी मंगळाच्या पोटात असलेल्या मॅग्माचा प्रवाह जास्त असल्याने हे भूकंप होत असावेत असे अनेकांचे मत बनत आहे. मतमतांतरे असली तरी मंगळाच्या अंतर्भागात मोठय़ा प्रमाणावर ‘घरघर’ सुरू आहे यावर सगळ्यांचे एकमत आहे.



























































