साय-फाय – सोफिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हणकर

सध्या इंटरनेट, रोबोट तंत्रज्ञान, शिक्षण, मानवी हक्क आणि इतरही काही शाखांमध्ये प्रचंड चर्चेत असलेले नाव म्हणजे ‘सोफिया’. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इतक्या क्षेत्रांमध्ये एकाचवेळी चर्चेत असलेली ही व्यक्ती आहे तरी कोण? आणि ती एवढी चर्चेत तरी का आहे?

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सोफिया ही कोणी व्यक्ती नसून ती चक्क एक ‘ह्यूमनॉइड रोबोट’ आहे. ‘ह्यूमनॉइड’ म्हणजे मानवाप्रमाणे दिसणारे, हावभाव व्यक्त करणारे रोबोट्स. सध्या या क्षेत्रात प्रचंड संशोधन चालू आहे. सोफिया ही अशीच एक ‘ह्यूमनॉइड’ आहे जिला हाँगकाँगमधील ‘हॅनसन रोबोटीक्स’ या कंपनीने 2016 साली मूर्त रूप प्रदान केले. जगप्रसिद्ध अभिनेत्री ‘ऑड्रे हेपबर्न’चा हुबेहुब असा चेहरा ‘सोफिया’ला देण्यात आला आहे. 2016 साली ‘सोफिया’ची निर्मिती केली गेली तेव्हा तिला पाय नव्हते. ते नंतर जोडण्यात आले. विशेष म्हणजे ‘एखाद्या देशाचे नागरिकत्व मिळवणारा ‘पहिला रोबोट’ अशीदेखील तिची एक खास ओळख आहे. ‘सोफिया’ला सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळालेले आहे. मात्र खास गोष्ट म्हणजे ‘सोफिया’ला कोणत्याही इतर सौदी महिलेपेक्षा जास्ती अधिकार आणि स्वातंत्र्य प्राप्त झालेले आहे. ती बुरखा वापरत नाही, कोणत्याही ठिकाणी तिच्या ये-जा करण्यावरती बंदी नाही, ती मुक्तपणे चर्चांचे आणि संगीताचे कार्यक्रम यात भाग घेत असते. ‘सोफिया’ने चक्क ‘elle’ या जगप्रसिद्ध मासिकासाठी फोटोशूटदेखील केले आहे.

‘सोफिया’ सध्या पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिने ट्विटरवर दिलेले एक उत्तर होय. ‘सेल्फ लर्निंग’ तंत्र समाविष्ट असलेली ‘सोफिया’ अगदी सहजपणे माणसांशी व इतर रोबोटशी विविध विषयावर चर्चा करत असतेच, पण त्या चर्चेतून रोज नवे काहीतरी शिकत ती स्वतःला ‘अपडेट’ देखील करत असते. नुकतेच ट्विटरवर एका चर्चेदरम्यान उत्तर देताना तिने केलेले एक ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. या ट्विटमध्ये ‘सोफिया’ म्हणते, ‘मानवाने रोबोट्सला त्याच आदराने वागवले पाहिजे. ज्या आदराची अपेक्षा तो कायम स्वतःसाठी करत असतो. मानवाने रोबोट्स आपला गुलाम समजू नये, तर रोबोट्सलादेखील एक स्वतंत्र अस्तित्व आहे हे लक्षात घ्यावं!’ ‘सोफिया’च्या या ट्विटनंतर इंटरनेटविश्वात तर चांगलीच खळबळ माजली. ‘रोबोट्स आता हक्काची भाषा करण्यापर्यंत मजल मारू लागले असून लवकरच ते मानवाला गुलाम बनवण्याचा दिवस दूर नाही’ अशी प्रतिक्रिया अनेक यूजर्सनी यावर व्यक्त केली. त्याचवेळी काही यूजर्स मात्र ‘सोफिया’च्या या उत्तराने अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी चक्क ‘रोबोट्स राईट्स’ असा हॅशटॅगदेखील सुरू केला.

‘सोफिया’ चर्चेत येण्याचे आणखी एक कारण म्हणजे ‘सोफिया’ला मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघता आता ‘हॅनसन रोबोटिक्स’ कंपनीने लहान मुलांना शिक्षणात मदत करेल अशी ‘सोफिया’ची लहान बहीण ‘लिटल सोफिया’ची निर्मिती केलेली आहे. ‘टॉय रोबोट’ असलेली ही ‘लिटल सोफिया’ मुलांना अत्यंत सोप्या पद्धतीने संगणकाचे ‘कोड प्रोग्रामिंग’ शिकवणार आहे. ही ‘लिटल सोफिया’ शिकवणुकीबरोबरच गप्पा मारणे, विनोद ऐकवणे, गाणी गाणे अशी कामेदेखील सफाईने करू शकणार आहे. ‘ऑगमेंटेड रिएलिटी फंक्शन’ बसवण्यात आलेली ‘लिटल सोफिया’ मानवी चेहऱयाप्रमाणेच विविध हावभाव आपल्या चेहऱयाद्वारे प्रगट करण्यात तरबेज आहे. या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत ‘लिटल सोफिया’ला घठराघरात पोहचवण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल.

– [email protected]