
>>प्रसाद ताम्हनकर
जगभरातील संशोधक, विज्ञानवादी, प्राणीप्रेमी आणि इतरही बऱ्याचयाच शाखांमधील तज्ञ एका बातमीने अस्वस्थ आहेत; आणि ती बातमी म्हणजे, ‘चायना सध्या प्रयोगशाळेत निर्माण करता येऊ शकणाऱया ‘सुपरसोल्जर’ प्रयोगावरती पुन्हा एकदा काम करू लागला आहे. सध्याच्याच नव्हे, तर कदाचित गेल्या पिढीतील अनेक लोकांना ही ‘सुपरसोल्जर’ कल्पना काय आहे याची कल्पना नक्की नसेल; आणि मुख्य म्हणजे, सध्याच्या आधुनिक काळात या विषयावर एवढे चर्चामंथन का चालू आहे याची कल्पनादेखील नसेल. ‘सुपरसोल्जर’ असे सैनिकी नाव असले तरी हा प्रयोग म्हणजे मानव आणि जनावर; मुख्यतः मानव आणि वानर यांच्या संकरातून असा एक जीव निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत, जो अत्यंत ताकदवान असेल. कुठल्याही परिस्थितीत, हवामानात, जमिनीवर अथवा समुद्रात सहजपणे तग धरून राहू शकेल आणि मुख्य म्हणजे त्याला भूक अथवा तहान अशा गरजादेखील नसतील. तर, हा असा एक बलशाली जीव बनवण्याच्या दृष्टीने चायनामध्ये पुन्हा प्रयत्न सुरू झाल्याच्या बातम्या जोर पकडत आहेत आणि त्यामुळेच त्या मीडिया आणि सोशल मीडियावर सगळीकडे चर्चेत आहेत.
अर्थात, असा जीव हा सैनिक म्हणून नव्हे, तर शेतीची अवजड कामे करण्यासाठी, खोल समुद्रात संशोधन करण्यासाठी, कडय़ा-कपारीत बोगदे खोदण्यासाठी वापरण्यात येईल असे शास्त्र्ाज्ञ पूर्वीदेखील सांगत होते आणि आतादेखील त्यांचे सांगणे हेच असेल. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, पूर्वी म्हणजे? आधीदेखील असे प्रयोग झाले आहेत? तर हो… गेल्या शतकापासून असे प्रयत्न सातत्याने चालू आहेत. 1990 मध्ये सार्वजनिक करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार रशियाचा हुकूमशहा स्टॅलिन याने ‘एप-मॅन’ अर्थात मानव आणि वानर यांच्या संकरापासून एक असा जीव बनवण्यासाठी शास्त्र्ाज्ञांना सर्वतोपरी मदत केली होती, जो कोणत्याही हवामानात तग धरू शकेल आणि अशा जिवांची एक सैन्याची पलटणच बनवता येईल, जी युद्धात अत्यंत उपयोगी सिद्ध होईल. 1980 मध्ये समोर आलेल्या एका अहवालानुसार चायनाने 1967 मध्ये मानव आणि वानर यांच्या बीजाचे एकत्रीकरण करण्याचा एक प्रयत्न केला होता. त्याला ‘क्रॉसब्रिडिंग’ असे नाव देण्यात आले होते. तो प्रयत्न अयशस्वी ठरला होता, मात्र आता पुन्हा एकदा तोच प्रयोग नव्याने सुरू करण्यासाठी चायना प्रयत्नशील असल्याचे समोर येत आहे.
1970 साली अशाच एका चिंपाझीने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. सर्कसमध्ये काम करणारा हा ‘ऑलिव्हर’ नावाचा चिंपाझी मानव आणि वानर यांचे हायब्रिड असल्याच्या अफवा वेगाने पसरलेल्या होत्या. सामान्य वानरापेक्षा अधिक बुद्धिवान असलेल्या आणि अंगावर अत्यंत कमी केस असलेल्या या चिंपाझीला तेव्हा ‘ह्यूमनजी’ शोधाचा प्रतीक ठरवले गेले. मात्र पुढे वेगवेगळय़ा तपासण्यांमध्ये तो एक सामान्य वानर असल्याचे निष्पन्न झाले. 2019 साली अमेरिकेच्या ‘साल्ट इन्स्टिटय़ूट फॉर बायॉलॉजिकल स्टडीज’च्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या एका प्रयोगाला अभूतपूर्व असे यश मिळाले होते. या टीमने आपण मानव आणि वानर यांच्या संकरातून एक ‘हायब्रिड’ जीव विकसित केल्याच्या दावा केला होता. मात्र हा दावा करण्यात आलेला ‘हायब्रिड जीव’ फक्त 19 दिवस जिवंत राहू शकला आणि या प्रयोगाची चर्चा पूर्ण थंडावली गेली. मात्र आता चायनाच्या या नव्या प्रयोगाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जुन्या प्रयोगांच्या आठवणी ताज्या होत आहेत हे विशेष!
– [email protected]





























































