ठसा – पं. शिवकुमार शर्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

जगद्विख्यात संतुरवादक पं. शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने संगीताचे क्षेत्रच नव्हे तर जगभरात त्यांच्या अजरामर संतुरवादनावर प्रेम करणारा रसिक श्रोताही शोकाकुल झाला आहे. शिवकुमारांची संतुर अबोल झाली आहे. हिंदुस्थानी संगीतात शिव-हरी म्हणजे शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरसीया या जोडीने तमाम रसिकांना अक्षरशः भारावून टाकले होते. संतुर आणि बासरीच्या अद्भुत जुगलबंदीने असंख्य मैफली अजरामर झाल्या असतील. ती मैफल आज शिवकुमारांच्या जाण्याने निःशब्द झाली आहे. हिंदुस्थानी संगीतात शिव-हरी जोडीने 1967 च्या सुमारास एकत्र काम करण्यास सुरुवात केली. 50-55 वर्षांची या दोघांची मैत्री, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, एकमेकांच्या कलेविषयी नितांत आदर, हे संगीत क्षेत्रातील अभ्यासक-कलावंतांनी, रसिकांनी बघितले.

पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1938 रोजी जम्मू येथे झाला. आई व वडील पं. उमदत्त शर्मा हे गायक असल्याने शिवकुमारांचे संगीत शिक्षणही वयाच्या 5 व्या वर्षीच सुरू झाले. काही काही प्रतिभावंत गायकांच्या घरात संगीताचा वारसा असतो. या घरातील मंडळीच्या रक्तातच संगीत असते. असे म्हणतात, शिवकुमार हे बालकलावंतही त्याला अपवाद नव्हते. वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी वडील उमदत्त यांनी त्यांना सूर-साधना व तबला याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. शिवकुमारांनी वयाच्या 13 व्या वर्षी संतुर शिकण्यास प्रारंभ केला. खरे तर संतुर हे वाद्य जम्मू-कश्मीरच्या लोकांच्या आवडीचे वाद्य होय, पण कठोर परिश्रम, अथक मेहनत या गुणविशेषांवर शिवकुमारांनी संतुरला आंतरराष्ट्रीय कीर्तीची लोकप्रियता मिळवून दिली. वयाच्या 85 व्या वर्षांपर्यंतचा हा सुरेल प्रवास आज थांबला. तेराव्या वर्षी त्यांनी संतुरची साधना सुरू केली आणि पुढील प्रवासात 1955 साली मुंबईत अवघ्या सतराव्या वर्षी संतुरवादनाचा पहिला प्रयोग सादर केला. या पहिल्याच पदार्पणात त्यांच्या हातातील ईश्वरदत्त जादूने रसिकांवर गारूड घातले. आपल्या संतुरवादनाच्या प्रभावाने भारावून टाकले. मंत्रमुग्ध केले आणि याच मैफलीपासून त्यांना साथसंगत लाभली ती हरीप्रसाद चौरसिया यांच्या लोकप्रिय बासरीवादनाची! याच कार्यक्रमातून शिव-हरी ही जोडी उदयास आली. संतुरवादनाला बासरीची जोड या अद्भुत रसायनातून पुढील काळात अनेक मैफली झाल्या. त्यांच्या सोबतचा प्रवास छोटय़ा शहरापासून महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर, देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत गाजला. 1967 मध्ये त्यांनी ‘कॉल ऑफ द व्हॅली’ या नावाचा अल्बम तयार केला. नंतरच्या काळात या जोडीचे अनेक अल्बम आले व हिट झाले. सिने दिग्दर्शक यश चोप्रा यांनी त्यांच्या प्रवासात लक्षणीय योगदान दिले. शिव-हरी जोडीने संगीत दिलेला ‘सिलसिला’ हा लोकप्रिय हिंदी सिनेमा आपल्याला आठवत असेल. या जोडीने एकूण आठेक चित्रपटांना संगीत दिले. (1981-सिलसिला), (1985 – फासले), (1988-विजय), (1989 – चांदनी), (1991 – लम्हे), (1993 – परंपरा), (साहिबान), (डर) या लोकप्रिय हिंदी चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. शिव-हरी जोडीचा हा सफरनामा, हिंदी सिनेरसिकांनी प्रदीर्घकाळ अनुभवला आहे. पं. शिवकुमारजी शर्मा यांनी बालपणीच तबलावादनाचे प्रशिक्षण घेतले होते. संतुरप्रमाणे त्यांनी हाही कलाप्रकार आपल्या वैशिष्टय़पूर्ण कलाकुसरतेने सजवला. ते तबलावादकही होते हे फार कमी रसिकांना माहीत आहे. ‘गाईड’ या जुन्या लोकप्रिय सिनेमात लता दीदींनी ‘मोसे छल किये जा’ हे गाणे गायले, त्यातील तबलासाथ ही शिवकुमारांची होती. एस. डी. बर्मन यांचे संगीत लाभलेला ‘गाईड’ कोण विसरू शकेल? त्यांच्या संगीतातून आलेली आणखी दोन महत्त्वाची लोकप्रिय गाणी ‘मेरे हाथो में नौ-नौ चुडिया’ आणि ‘देखा एक ख्वाब’ ही सांगता येतील. शिवकुमार यांना 1985 मध्ये अमेरिकेतील बाल्टिमोर शहराचे नागरिकत्व बहाल करण्यात आले होते. 1986 मध्ये संगीत नाटक अकादमीचा सन्मान, पद्मश्री, पद्मविभूषण अशा देशाच्या नागरी सर्वोच्च सन्मानांनी त्यांचा गौरव झाला होता. शास्त्राrय संगीतावर आधारित अल्बम ‘कॉल ऑफ द व्हॅली’, ‘सिलसिला’, ‘चांदनी’ या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनासाठी प्लॅटिनम पुरस्काराने गौरविण्यात आले. या शिव-हरी जोडीतील शिवने आता परलोकात प्रस्थान केले. त्यामुळे हिंदुस्थानी संगीतविश्वाची अपरिमित हानी झाली आहे. पं. शिवकुमार शर्मा यांची संतुर अबोल झाली आहे आणि मैफल सुन्न आहे. मात्र त्यांच्या संगीत कर्तृत्वाचा झंकार रसिकांच्या मनात कायम राहील.