ठसा – प्रा. अनंत मनोहर

n प्रशांत गौतम

साहित्याच्या प्रांतात आपल्या शैलीदार लेखनाने प्रसिद्ध असणारे लेखक प्रा. अनंत मनोहर वयाच्या 91 व्या वर्षी चिरंतनाच्या प्रवासाला गेले. ते उत्तम दर्जाचे व्यासंगी लेखक तर होतेच, त्याचसोबत क्रीडा क्षेत्रातील जाणकार व क्रिकेट सामन्यांचे समालोचकही होते. त्यांच्या निधनाने साहित्य आणि क्रीडा क्षेत्राचीही हानी झाली आहे. साहित्याच्या प्रांतात कादंबरीकार, ललित लेखक, प्रवास वर्णनकार, चरित्र लेखक, स्फुट लेखक, नभोनाटय़ अनुवाद, एकांकिका, कुमार साहित्य, अनुवादक, कथा लेखक, रहस्यकथा लेखक, अशा कितीतरी साहित्य प्रकारांत त्यांनी दमदार मुशाफिरी केली. क्रिकेटसारख्या खेळावर त्यांनी रंजक, माहितीपूर्ण लेखन केले. प्रा. अनंत मनोहर यांच्या आयुष्याचा प्रवास असाच वैविध्यपूर्ण होता. वयाच्या 91 व्या वर्षांपर्यंत लाभलेले आयुष्य ते समृद्ध आणि संपन्न जगले. नाशिक येथे 16 मे 1930 साली जन्मलेले मनोहर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी रायगड, रत्नागिरी, धुळे जिल्हय़ात गेले. पुण्यात 1961 साली एम. ए. केले. त्याच वर्षी ते बेळगावात राणी पार्वतीदेवी महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक झाले. नंतर विभागप्रमुख झाले. कर्नाटक विद्यापीठाच्या धारवाड केंद्रात अतिथी प्राध्यापक म्हणून काम करू लागले. नंतर बेळगावच्या केंद्रात त्यांनी पंधरा वर्षे अध्यापन केले. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आखाती देश व इराणमध्ये प्रवास केला. त्यांनी आपल्या लेखनाचा प्रारंभ 1957 साली वसुधा मालिकेतील कथेपासून केला. सा. ‘सोबत’चे ते नियमित स्तंभ लेखक होते, त्याचसोबत ‘केसरी’, बेळगाव ‘तरुण भारत’ याशिवाय अन्य दैनिकांत क्रीडाविश्वावर विपुल प्रमाणात लिहीत असत. साहित्याच्या क्षेत्राप्रमाणे त्यांचे क्रिकेटवर प्रेम होते. सुनील गावसकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे पुस्तक त्यांनी लिहिले, तर सचिन तेंडुलकर यांच्या समग्र चरित्राचा त्यांनी अनुवाद केला. ‘अनुवाद ः एक उज्ज्वल करियर’ यासारखे त्यांचे पुस्तक अनुवादकांसाठी महत्त्वपूर्ण समजले जाते. क्रिकेट विश्वातील त्यांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे उत्तम समालोचन. 1992 मध्ये ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या विश्व चषक स्पर्धेतील सामन्याचे त्यांनी समालोचन करून क्रीडा रसिकांची दाद मिळवली होती. साहित्याच्या क्षेत्रात तर त्यांनी कसदार लेखनाने आपला वाचकवर्ग निर्माण केला होता. वन्य प्राणी आणि आदिवासी यांच्या संघर्षावरील ‘अरण्यकांड’, बाल अत्याचाराचा विषय नेमका आणि प्रभावी मांडणारी ‘अगतिक’ या दोन कादंबऱया सर्वात महत्त्वाच्या समजल्या जातात. त्याचप्रमाणे वाटचाल, उजाळल्या दिशा, उदास, देता किती घेशील, पहाटवारा, राब, दोन मुढी तांदूळ, कापुराच्या वाती, पैलतीर, तूच मांडिसी, तूच मोडिसी, अरण्यकांड, ज्येष्ठ, प्रतिष्ठा, वर्तुळ, लयसुक्त या कादंबऱया, रंदा, अगतिक, फिनिक्स, पाठलाग, मर्म बंधातली ठेव ही, कठपुतळी, नभ मेघांनी आक्रमिले, डाव मांडुनि, त्या नदीच्या पार वेडय़ा या रूपांतरित कादंबऱया. देवकाठी, पेरी मेसनचे भूत, कटथ्रोट, रंग सावल्या, मुक्त, बिल्वपत्र, कर्कोटक, राजदंड, घुसमट, फसगमतीच्या गोष्टी, किरीट, उत्तररंग, जॅकपॉट, चंद्र नभिचा, मुजोर, सूर्यफूल, मंत्र, हे कथासंग्रह. तसेच गलोल, गालातल्या गालात हे सदर लेखन. ललित रंग हे ललित लेखन. जिंकुनि मरणाला, अंधेर नगरी, आयाराम-गयाराम, मान हलली फाशी टळली या एकांकिका. जर्मन टारगेट, विक्रमादित्य गावसकर, युगकर्ता सचिन अशी अनंत मनोहर यांची विपुल साहित्यसंपदा सांगता येते.

‘‘सीमाभागातील मराठीवर कन्नड आणि इंग्रजीचा मोठा प्रभाव आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर असलेल्या बेळगावमध्ये कन्नड, मराठी, कोकणी, ख्रिश्चन, मुस्लिम या सर्व प्रकारची एक मिश्र संस्कृती आहे. त्याचा काही परिणाम प्रा. अनंत मनोहर यांच्या साहित्यावर झाला,’’ असे मनोहर यांच्या साहित्याच्या अभ्यासक प्रा. डॉ. आरती जाधव यांनी सांगितले. अशाच प्रकारच्या आठवणी प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे, प्रा. विनोद गायकवाड, प्रा. डॉ. संध्या देशपांडे यांनी सांगितल्या.

प्रा. अनंत मनोहर यांनी प्राथमिक शिक्षणापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत उत्तम गुणवत्ता क्रमांक संपादन केला. लहानपणापासूनच त्यांना खेळ, वाचनासोबत विविध क्षेत्रांची आवड होती. नोकरीचा प्रारंभ शिक्षकीपेशापासून झाला. उमेदवारीच्या काळात नोकरी शोधण्याच्या प्रवासात तर त्यांना एकाच वेळी पोस्ट खाते, स्कूल बोर्ड, बँक या क्षेत्राची ऑफर होती. बँकेत कारकुनाची नोकरी मिळणे शक्य असताना त्यांनी प्राधान्याने शिक्षकी पेशा निवडला. साहित्य, क्रीडा पत्रकारिता या क्षेत्रात बहुआयामी वाटचाल केली. आयुष्याच्या प्रवासात त्यांनी बहुश्रुतता जपली. त्यांच्या लेखनास व दिलेल्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीच्या पुरस्कारासह, महाराष्ट्र साहित्य परिषद, तसेच सोलापूरचा भैरू रतन दमानि पुरस्कार लाभला. कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला. नभोनाटय़ लेखन स्पर्धेत आणि कांदबरी लेखन स्पर्धेत विविध पुरस्कार प्राप्त झाले. सेवानिवृत्तीनंतरही ते बेळगावातील विविध साहित्य चळवळीत सहभागी होते. तेथील लोकमान्य वाचनालय, वाङ्मय चर्चा मंडळ अशा संस्थांशी निगडीत होते. नवीन उमद्या लेखकांच्या पाठीवर तर त्यांनी कौतुकाची थाप मारली. बेळगावच्या साहित्य क्षेत्राशी ते एकरूप झाले होते. मराठी साहित्य आपल्या लेखनाने त्यांनी समृद्ध करून या जगाचा निरोप घेतला. मराठी भाषा/ वाङ्मय संस्कृती यात संवाद साधणारा हा महत्त्वाचा दुवा होता, तोच आता निखळला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या