मंथन – सातपुड्याच्या कुशीतील दिवाळी!

>> अॅड. प्रतीक राजूरकर

शहरातील झगमगाटापासून दूर असलेल्या दुर्गम, अतिदुर्गम भागांतसुद्धा दीपावलीचा सण तितकाच आनंदाच्या, उत्साहाच्या प्रकाशाने दिपवून टाकणारा आहे. सातपुडय़ाच्या पुशीत गोंड, कोरपू व गवळी समाजाची संख्या लक्षणीय आहे. प्रत्येक समाजाला अनेक शतकांची मोठी परंपरा आहे. वनक्षेत्रात वास्तव्यास असणारे हे समुदाय शहरांच्या तुलनेत सोयीसुविधा कमी असूनही सण उत्सव साजरे करताना आनंद, उत्साहात पुठलाही कमीपणा येऊ देत नाहीत. उत्सवात आनंदाची उधळण, संगीत, पूजन, खेळ इत्यादी कार्यक्रमांतून त्यांची दीपावली साजरी होत असते.

गोंड समाजाला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अनेक शतके गोंड समाजाने स्वतःच्या पराक्रम शौर्यावर मध्य हिंदुस्थानात आपले साम्राज्य उभे केले. मध्य हिंदुस्थानात गोंड साम्राज्याचे प्रतीक असलेले गडकिल्ले त्याची साक्ष देणारे आहेत. हिंदुस्थानातल्या एका विशाल प्राचीन संस्कृतीचे गोंड समाज प्रतिनिधित्व करतो.

वनक्षेत्रात वास्तव्यास असणारा कोरपू समाजात होळीचे महत्त्व अधिक आहे. गेल्या काही वर्षांत कोरपू समाजातसुद्धा मोठय़ा उत्साहात दीपावली साजरी केली जाते आहे. हिंदुस्थानात समरसतेच्या रोवलेल्या बीजांचे आज सामाजिक व सांस्कृतिक वटवृक्षात झालेले रूपांतर निश्चितच आनंददायी आहे. महिला मोठय़ा प्रमाणात चांदीचे दागिने परिधान करून दीपावलीच्या उत्सवात सहभागी होतात. गोंड, कोरपू समाजात सोन्याचे अलंकार सहसा दिसत नाहीत. सुवर्णालंकार चांदीच्या तुलनेत महाग असल्याने सोन्याच्या अलकारांना चांदीचा पर्याय स्वीकारल्याचे दिसते. आर्थिक कारणास्तव गेल्या काही वर्षांत चांदीसदृश जर्मन धातूचे अलंकार पर्याय म्हणून परिधान केले जातात.

अश्विन अमावस्येला घरात तोरण व दीप प्रज्वलित करून लक्ष्मीपूजनाने गोंड समाजाच्या दीपावली उत्सवाला सुरुवात होते. कार्तिक पंचमीपर्यंत दीपावलीचा आनंदोत्सव सुरू असतो. घरोघरी लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. पुटुंबातील महिला गोड पुरी, डाळभाजीचा नैवेद्य करून वाढतात. कार्तिक प्रतिपदेला गाय, म्हैस, बैल यांना एकत्र करून ढोरकी ( ढोरं चराईला नेणारा) आपल्या पशुधनाला वस्त्रालंकार घालून सजवतात. प्रतिपदेला सकाळी समाजातील लहान मुलंमुली हे या पशुधनासमवेत खेळतात. त्यानंतर गावात एकत्रितपणे पशुधनाची पूजा केली जाते. गावातील प्रत्येक गोठय़ात वाजत गाजत जाऊन महिला, पुरुष, बालके पशुधनाप्रति आपली कृतज्ञता प्रदर्शित करतात. गोंड समाजात प्राचीन काळापासून पशुधनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावातील सगळे रहिवासी एकत्रितपणे दीपावलीचा सण साजरा करताना पशुधन व लहान मुलांची विशेष काळजी घेतात. गोंड समाजात पोटच्या मुलाबाळांइतकेच पशुधनाचे महत्त्व असल्याची प्रचीती देणारा हा प्रसंग.

गवळी समाजात मोठय़ा संख्येने पशुधन आहे. लक्ष्मी, पशुधनाची विधिवत पूजा केली जाते. पशुधनाला सजवून 50-100 ढोरांना स्वछंदपणे मोकळे सोडून त्यांच्यासमवेत पालकसुद्धा धावतात. भगवान श्रीकृष्णाचे उपासक असलेल्या गवळी समाजाची परंपरागत गोपालक समाज म्हणून मान्यता आहे. कोरपू समाजाचा उदरनिर्वाह हा मुख्यतः वनक्षेत्रात शेती व्यवसाय, मजुरी, कष्टकरी यावर चालतो. गोंड समाज गुराखी, स्वतःचे पशुधन, मजुरी यावर उदरनिर्वाह करतो. मेळघाटात गोंड समाज हा पशुधन चराईची मजुरी करतो. एका ढोरामागे कमाल 50 रुपये प्रतिमहिना व एकवेळचे भोजन पशुधनाच्या मालकांकडून प्राप्त होते.

गोंड समाज प्रतिपदेपासून पाच दिवस दिवाळीचा मनमुराद आनंद लुटतो. गाय, बैल, म्हशींच्या गळ्यात रुमाल, कापड बांधून पाच दिवस ते मालकाच्या हवाली करून उत्साहात सण साजरा करतात. तीन-चार गावांतील समूह नवीन वस्त्रs, जोडे परिधान करतात. समूहातील काही व्यक्ती तोंडावर लिंबू टोचून घेतात. मेळघाटात शुक्रवार व बुधवार बाजाराचा दिवस असतो. दीपावलीच्या काळात बाजाराच्या दिवशी गोंड समाजाचा समूह बांबूची बासरी, म्हशीच्या शिंगांचा पोंगा तयार करतात. पायात घुंगरू, डोक्यावर मोरपिसांचा वासुदेवासारखा मुपुट परिधान करून बाजारात वाजत गाजत फिरतात. या बाजारपेठा घुंगरू बाजार म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा नाच, गोंडी भाषेतील गीतं, दोहे ऐकण्यास, बघण्यासाठी मोठी गर्दी उसळते. गोंड समाजात तंत्रमंत्र विद्येची मोठी परंपरा आहे. या मिरवणुकीत जादूचे प्रयोग बघण्यासाठी लहानग्यांची उत्सुकता शिगेला जाते. मेळघाटातील लहान मुले गजगोटी, गचपुंडीत बारूद भरून ती पह्डायचे, आता ती कालबाह्य झाल्याने हल्ली फटाक्यांची आतषबाजी अधिक प्रमाणात आढळते. गोंड समाजाचे नृत्य, जादूचे प्रयोग, गीतं, वाद्यांच्या चालीवरील सुमधुर गीताने मंत्रमुग्ध होऊन बाजारपेठेतील दुकानदार, प्रतिष्ठत नागरिक बक्षीस देण्याची परंपरा आहे. या पद्धतीला मेळघाटात ‘फगवा’ असे संबोधले जाते. बाजार नसेल त्या दिवशी गोंड समाजाचा समूह गावोगावी फिरून आपले कलाकाwशल्य प्रदर्शित करतात. पंचमीपर्यंत हा उत्साह कायम असतो. दीपावली काळात भरणाऱया बाजारात कोरपू समाजाच्या तरुण मुला-मुलींमध्ये आपले जोडीदार निवडण्याचीसुद्धा पद्धत आहे.
आयुष्यात कुठलीही महत्त्वाकांक्षा न ठेवता वनक्षेत्रातील समुदाय आहे त्या परिस्थितीत उत्सव, आनंद, सण साजरे करत असतो. नागरी वस्तीपासून दूर असूनही त्यांनी जोपासलेली संस्कृती अभिमानास्पद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या