
>> प्रियदर्शिनी हिंगे
मुलींबाबत आपल्या समाजाच्या दुहेरी भूमिका दिसून येतात. एका बाजूला त्यांनी खंबीर असणं मान्य असतंच परंतु त्यांनी बंडखोर असणं मान्य नाही. मुलांनी रडता कामा नये या भूमिकेसोबत मुलींनी नाजूकच असलं पाहिजे अशा चौकटी, समाजात दिसणारी ही टोकाची वैचारिक तफावत लिंगभेदाच्या प्रश्नांना, नवीन समस्यांना जन्म देत आहे. ही वैचारिक दरी सुजाण पालक घडण्याच्या भूमिकेतही भेद निर्माण करत आहे. या घट्ट रुजलेल्या या भेदाभेदाच्या कल्पना संपुष्टात यायला हव्यात.
मुलीला मुलासारखंच वाढवलं!’
‘आमची मुलगी नाही, मुलगाच आहे तो…!’
‘मुलगी असली म्हणून काय झालं, मुलासारखीच हिमतीची आहे ती…’ ही पालकांची वाक्यं काय सांगतात? हेच ना, की मुलीच्या जन्माचा सोहळा होत असला तरी तिला ‘मुलासारखं मानणं’ ही मानसिकताही तिच्यावर अन्यायकारकच आहे…
’आई, मुली काय तलवार खेळत नाहीत का? सांग बरं लवकर.’ माझी आठ वर्षांची मुलगी शाळेतून आल्या आल्या तावातावानं मला विचारत होतीं.
‘अगं पण झालं काय?’
शेवटी मीच हार मानत तिला सांगितलं, ‘अगं, असं काही नाही, खेळणं खेळणं असतं, ज्याला वाटेल तो ते खेळू शकतो, त्यात मुलगी असली काय नि मुलगा काय, कोणीही खेळू शकतो.’
‘हो ना! ‘हेच मी त्या अलोकला सांगितलं की, मी तलवार आणली आहे तर मला म्हणतो की, ते मुलींचं खेळणं नाही! त्याला उद्या दाखवतेच…’
असंच काहीसं चित्र सगळ्या घरात असणार हे नक्की! कारण लहान वयातच खेळण्यापासून ते रंगापर्यंत अनेक गोष्टी बाजारपेठेने स्वतःच्या फायद्यासाठी वाटून घेतल्या आणि मुली आणि मुलगे यांच्यात वाटण्याही करून टाकल्या. यात सगळ्यात मोठं नुकसान कुणाचं झालं असेल तर ते मुलंमुली दोघांचंही! ज्यांची दुनियाच एकत्र आहे त्यांना सतत काही ना काही कारणानं वेगवेगळ्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न करून काय साध्य होतं? मुलींनी नाजूकच असलं पाहिजे, मुलांनी रडता कामा नये अशा काही ज्या चौकटी आजवरच्या दुभंगलेल्या विचारसरणीतून समोर आल्या त्यांनी इतकं नुकसान केलं आहे की, त्यातून मनात भरलेले गैरसमज अजून दूर होता होत नाहीयेत. हे एका टोकाचं चित्र चित्र तर दुसरं टोक भलतीकडेच चाललं आहे. गर्भलिंग निदान चाचणीला विरोध करून मुलीच्या जन्माचा कौतुकसोहळा सर्वत्र साजरा होऊ लागला. अनेक घरी मुलगी झाली याचं कोण कौतुक होऊ लागलं. शहरी समाजात तर आपल्याला एकच मुलगी हे सांगण्यातही अनेकांना अभिमान वाटू लागला. तो काहींनी स्वतःच्या प्रतिष्ठेचा विषय करणं सुरू केलं. इतकं की, मुलगा झाला तर काहींना चुटपुटल्यासारखंही वाटू लागलं.
अलीकडेच दुसऱ्या टोकाच्याही काही घटना अनुभवल्या. कराटेच्या क्लासबाहेर एक मुलगी – साधारण पाच वर्षांची असेल -जोरजोरात रडत होती. तिला क्लासला जायचं नव्हतं. पण आईनं चंगच बांधला होता. जोरजोरात रडणाऱया त्या मुलीला आईनं जबरदस्तीनं आत सोडलं आणि सोडता सोडता तिला म्हणाली, ‘तुला हे शिकलंच पाहिजे, आता नाही, तर नंतर कळेल याचं महत्त्व. मुलगी आहेस तू शिकलंच पाहिजे कराटे!’ पुढे कित्येक महिने ती मुलगी अशीच रडत रडत क्लासला येत राहिली. तिच्या आईच्या शब्दानं माझ्या मनात घरच केलं.
ती आई असं का म्हणाली असेल हे मला खरं तर कळत होतं. बलात्कार, खून, एकतर्फी प्रेमातून होणारी हिंसा यांचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की, आई आणि खास करून मुलीची आई पालक म्हणून प्रचंड अस्वस्थ आहे. ही अस्वस्थता कमी करण्यासाठी ती आई आपल्या मुलीला अगदी कोवळय़ा वयातच स्वसंरक्षणाचे धडे देऊ पाहत होती. पण तरीही ते चित्र पाहताना मला वाटलंच की, म्हणजे आपण मुलीला जन्माला येऊ देतो, त्या जन्माचा आनंद व्यक्त करतो; पण तरीही तिनं काय करावं हे शेवटी (ती मुलगी असल्यामुळे) पालकच ठरवतात. त्या मुलीची आवड-निवड, इच्छा या गोष्टीचा कुठे विचार केला जातो का? आणि तसं असेल तर हे खरंच योग्य आहे का?
शेजारची अन्वी पाचव्या इयत्तेत होती. पालकांनी हौसेनं इंग्रजी माध्यमात घातलं होतं दोघा भाऊ-बहिणीला, पण अन्वीला काही केल्या अभ्यासात गती येत नव्हती. तिला इंग्रजीतून शिकणं अवघड जातंय असं वडिलांना वाटत होतं. मातृभाषेतून शिक्षण मिळाल्यास तिला सोपं जाईल, तिचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळेल असं त्यांनी तिच्या आईला सांगितलं. ते ऐकताच आई रागानं उसळली. म्हणाली, ‘जे होईल ते होईल, पण तिला मराठी माध्यमात घालणार नाही. मुलीला मराठी माध्यमात घालणं म्हणजे मुलामुलीत भेद केल्यासारखं दिसेल.’ खरं तर अन्वीच्या आईला लहानपणी मुलगी म्हणून अनेक भेदभावांना सामोरं जावं लागलं होतं. त्याचा त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला होता की आपल्या मुलीला केवळ मुलगी आहे म्हणून तडजोड करावी लागू नये हा त्यांचा हेतू चांगला असला तरी या अतिरेकाने मुलीचं हित नक्की कशात आहे हेदेखील डोळसपणे पाहण्याची शक्ती त्या हरवून बसल्या.
एका ओळखीच्या दांपत्याला दोन मुली. सुखवस्तू घर, मुलींना सगळ्या सुखसोयी पुरवल्या जात होत्या. पण तरी अधनंमधनं कुणी विचारेच की, दोन मुलीच का तुम्हाला? या प्रश्नावर पाटील दांपत्य तोऱ्यात उत्तर देई, ‘कशाला हवाय मुलगा? जे मुलं करतात ते मुलीही करतातच की. आता त्यासाठी कशाला हवा मुलगा? आमच्या म्हातारपणी याच सांभाळतील आम्हाला मुलांसारखं. आईवडिलांचं नाव नक्कीच उज्ज्वल करतील…’ त्यांचं उत्तर वरकरणी कितीही चांगलं वाटत असलं तरीही केवळ भाऊ नाही म्हणून आईवडिलांना सांभाळण्याची जबाबदारी आपसूक मुलीवर येणार पण त्याहीपुढे मुलगा म्हणून यशस्वितेच्या ज्या-ज्या फुटपट्ट्या त्या-त्या साऱ्या लावून ते आपल्या मुलींना जोखणार, तशा अपेक्षा करणार! म्हणणार की, मुलासाठी पालक जे करत नाही, ते-ते सारं तुमच्यासाठी केलंच आम्ही! म्हणजे पालक पुन्हा मुलींवर दबाव टाकणार की, सिद्ध कर स्वतःला.
या सर्व उदाहरणांवरून एक गोष्ट लक्षात येते की, मुळात लिंगभेद हा शरीरापेक्षाही आपल्या समाजात मेंदूतच जास्त मोठा आहे. मुलगी आहे म्हणून तिरस्कार करणं जसं चुकीचं आहे तसंच मुलग्यांकडून अवाजवी अपेक्षा करणंही! मुलींना मुलांसारखंच वाढवलं, मुलगी नाही मुलगाच आहे तो आमचा, ही वाक्यं काय सांगतात? हेच ना, की आपल्या डोक्यात मुलगा असणं हे काहीतरी ग्रेट असतं, आणि त्याची कामगिरी तशीच करणं हेच मुलींकडून अपेक्षित आहे.
सोपा नाही हा तिढा…
पण तरी आपण लक्ष ठेवू आपल्याच वक्तव्यावर, कृतीवर… आणि डोक्यात घट्ट रुजलेल्या भेदाभेदाच्या कल्पनांवरही…
























































