
>> प्रो. डॉ. शशिकान्त लोखंडे
ऐतिहासिक कादंबरी इतिहासाच्या आधारे लिहिली जाते. इतिहास म्हणजे भूतकाळ. इतिहासकालीन पात्रे, स्थळे, घटना यांची उपयोजना तित असते. तीमधील व्यक्ती, विशिष्ट स्थल, काल, परिस्थितीशी बांधील असते. ऐतिहासिक कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे. इतिहास म्हणजे घडलेल्या गोष्टींची कालक्रमानुसार केलेली नोंद होय. तटस्थ व वस्तुनिष्ठ दृष्टी इतिहास लेखनात असते. तथापि ऐतिहासिक कादंबरीत इतिहासातील सगळी पात्रे, प्रसंग, घटना जशा घडल्या तशा क्रमाने येत नाहीत. इतिहास घडून गेलेल्या घटकांचे चित्रण लेखक अशा पद्धतीने करतो की त्याला वर्तमानत्व यावे. येथे भूतकाळच वर्तमानाचे रूप घेतो.
राजस्थानच्या इतिहासातील अमीरखान आणि अजितसिंह यांच्यातील संघर्षाचे चित्रण करणारी ‘वेदीवर’ ही चांगदेव काळे यांची कादंबरी वरील पार्श्वभूमीवर अनुभवता येईल. ही चरित्रात्मक, पण राजकीय तपशिलांची कादंबरी आहे. तिला बखर म्हणावे इतके तित स्वरचित कथा चित्रण चांगदेव काळे यांनी केले आहे. सुनील कर्णिक म्हणतात त्याप्रमाणे, राजस्थानच्या इतिहासातील ही लोभस लोककथा आहे. राजवाडे आणि राजदरबार आणि राजकारण हे इथे नित्याचेच. राजस्थानी भाषेचा लहेजा आणि पडदानशी आबदार वेशभूषा आणि मुस्लीम सत्ताधीश आणि मराठी खलनायक आणि गरम हवा. धनाची सुबत्ता तसेच कर्जाचे डोंगर. पक्वानं आणि दुष्काळ आणि थंडीचा कडाका आणि उन्हाळय़ाची आग. डावपेच आणि लपंडाव आणि सज्जन आणि दुर्जन. अंतर्गत कुरघोडी आणि परकी आक्रमणं पाचवीला पुजलेली. या सगळय़ातून पदोपदी डोकावणारा मनुष्य स्वभाव. अचानक राजा झालेला तरुण महाराणा भीमसिंह. त्याच्या चार राण्या आणि दोन अविवाहित बहिणी. सगळय़ात लक्षवेधक आहे ती राजकन्या कृष्णाकुंवर! तिच्या रक्तरेखेपाशी ही विराणी मूक होते. प्रस्तुत कथानक लेखकाने इतिहासाचे भान ठेवून चित्रित केले आहे. कृष्णाकुंवरचे असामान्य पराक्रम व भूमिप्रेम उत्कटपणे चितारले आहे. ‘‘वास्तव व भावना’’ यातील नाटय़ लेखकाने उत्तमरीत्या सांभाळले आहे. घटनांचा क्रम मागेपुढे होत असला तरीही कादंबरीचा परिणाम अविकृत राहतो. खरं म्हणजे जेम्स टॉड यांचे ‘अॅनल्स अॅण्ड ऑन्टिक्विटीज ऑफ राजस्थान’ हे लेखन चांगदेव यांनी डोळय़ासमोर ठेवले आहे. राजपुतान्याच्या इतिहासातील मूक राहिलेला सल कादंबरीत जखमेसारखा भळभळतो आहे हे विशेष. मराठीतील लक्षवेधी ऐतिहासिक कादंबऱ्यांची परंपरा येथे लेखकाने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. सुंदर भाषा, प्रतिके-प्रतिमा, दिलखेचक संवाद, चित्रदर्शी प्रसंग, भावनेची रसवाहकता, व्यक्तींचे सूक्ष्म पंगोरे, तपशिलाची अचूकता हे सारे गुण या कादंबरीत सांभाळले आहेत.
अजितसिंह पराभव करतो. तो नेस्तनाबूत होतो तेव्हा त्याच्या कामात शब्दांचे प्रहार होतात की, ‘‘नाही बेटा, यांना भाग्य नाही आणलं. भाग्य खुडून टाकण्याचं जहर आणलं. खुनी आहेत हे. एका नादात जिवाचा खून करीत आहेत हे. यांनी तुमच्यावर उपकार नाहीत केले. केले ते स्वतःवर. यांनी इथं येण्यापूर्वी हाती परिधान करायला हवा होता कंकणाचा चुडा. नाही तर स्वतः रिता करायला हवा होता जहराचा प्याला स्वतःच्या घशात.’’ भीमसिंहाचे आयुष्य साऱ्यांच्या वेदनेचे कारण बनते जणू ते ‘वेदीवर’ आहे. अतिशय वाचनीय, उत्कंठावर्धक, रसभरीत व रोमहर्षक वर्णनांमुळे चांगदेव काळे यांची ही ऐतिहासिक कादंबरी लालित्याचे अमृतच ठरते हे विशेष होय.
वेदीवर
लेखक : चांगदेव काळे
प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे : 447, मूल्य ः रुपये 500/-



























































