>> शैलेश माळोद
प्रा. जॉर्ज जोसेफ. पृथ्वीचे निरीक्षण, चांद्रयान मोहीम अशा अनेक प्रकल्पांवर काम केलेले शास्त्रज्ञ.
नुकतीच हिंदुस्थानच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांची जन्मशताब्दी झाली. त्या प्रित्यर्थ हिंदुस्थान सरकारच्या अवकाश विभागाद्वारे विविध कार्यक्रमांचा समावेश असणारं जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित प्रश्नमंजूषादेखील असून उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन समस्या निराकरणासाठी करण्याबाबत डॉ. साराभाईंचा असलेला कटाक्ष प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ‘साईट’ (SITE) प्रयोग शिक्षण क्षेत्रात राबविण्यात आला. या साईट प्रयोगातूनच पुढे अहमदाबादेत आकारास आलं ते ‘स्पेस ऍप्लिकेशन सेंटर’ अर्थात ‘एसएसी’. याच एसएसीला आज अहमदाबादेत सर्व लोक इस्रो म्हणून ओळखतात. कारण ते इस्रोच्या अखत्यारीत कार्यरत आहे. प्रा. यशपालसारख्या नावाजलेल्या शास्त्र्ाज्ञ शिक्षणतज्ञांनी त्याचं संचालकपद भूषविलं होतं. याच परंपरेत पुढे जॉर्ज जोसेफ संचालक झाले. आज ते आपणा सर्वांना ज्ञात आहेत. ते सुदूर संवेदन (रिमोट सेन्सिंग) तत्रज्ञानातील त्यांच्या योगदानामुळे विशेषतः पृथ्वीचं निरीक्षण करणाऱया संवेदकांविषयीच्या कार्यासाठी.
ते हिंदुस्थानच्या चांद्र मोहिमेविषयीच्या कार्यदलाचे अध्यक्षदेखील होते. 4 ऑगस्ट 1938 रोजी जन्मलेल्या डॉ. जोसेफ यांना हिंदुस्थान सरकारने 1999 साली तिसऱया क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मभूषण’ प्रदान केला होता. अहमदाबादेत त्यांचं वास्तव्य आहे.
‘‘उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक कार्यासाठी करण्याचं डॉ. विक्रम साराभाईंचं स्वप्न होतं. त्यासाठी गुजरातेतील खेडा जिह्यात ‘खेडा एक्स्परिमेंट’ 1974 ते 77 दरम्यान राबविण्यात आला. याबाबत काम करण्याची संधी लाभलेल्या काही भाग्यवंतांपैकी मी एक आहे.’’ असं सांगत प्रा. जॉर्ज जोसेफ यांनी आपल्या चर्चेची सुरुवात केली. पुढे आपल्या बालपणाविषयी आणि शिक्षणाविषयी त्यांनी माहिती देताना सांगितलं, ‘‘माझे वडील ऍड. एम. जी. जोसेफ आणि आई ऍलीस यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर सेंट वर्चमन्स कॉलेज आणि कराईकुडी येथील अलगप्पा चेट्टियार कॉलेजात मला शिकण्यासाठी ठेवलं. हा भाग फ्रेंचांपासून स्वतंत्र होऊन हिंदुस्थानात विलीन झाला होता. त्यानंतर युनिव्हर्सिटी कॉलेज थिरुवअनंतपुरम येथे मी शिक्षण घेतलं. त्यानंतर अलुझा आणि कोट्टायम या दोन ठिकाणी मी महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काही काळ काम केलं. त्यानंतर माझी निवड भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) येथे प्रशिक्षणार्थी म्हणून झाली. माझं संशोधन करीअर 1962 साली टी.आय.एफ.आर. मुंबईला सुरू झालं. माझं संशोधनक्षेत्र वैश्विक किरणं होतं. त्या कामासाठी पुढे मला मुंबई विद्यापीठातर्फे पीएच.डी. बहाल करण्यात आली.’’
प्रा. जोसेफ यांनी विकसित केलेली नावीन्यपूर्ण डिटेक्टर प्रणाली इस्रोच्या पहिल्या आर्यभट या प्रथम उपग्रहावर बसवून अवकाशात नेण्यात आली होती. अवकाश क्षेत्राकडे ते कसे वळले हे सांगताना ते म्हणाले, ‘साराभाईंनी अणुऊर्जा विभागातून योग्य संशोधन अनुभव असणारे काही लोक इस्रोत घेतले. 1973 साली मला अहमदाबादच्या स्पेस ऍप्लिकेशन सेंटरमध्ये काम करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आणि त्याद्वारे मला सुदूर तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकसनात कार्य करण्याची विशेषतः विविध प्रकारच्या संवेदकांच्या विकासाच्या क्षेत्रात काम करण्याची संधी लाभली.’ आय.आर.एस. आणि इन्सॅट या दोन्ही प्रकारच्या उपग्रहांवरील पृथ्वी निरीक्षण करणाऱया कॅमेऱयांच्या विकसन आणि संरचनेमागे प्रा. जोसेफ हे एक प्रमुख प्रेरणास्रोत होते.
सामान्य माणसाला अवकाश तंत्रज्ञानाची फळं चाखता यावीत म्हणून त्यांनी इस्रोच्या विविध उपक्रमांत मनापासून काम करत विविध पदं भूषविली. त्यामधील उल्लेखनीय होतं ते चांद्रयान मोहिमेबाबतचं. प्रा. जोसेफ यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समित्यांवर कार्य केलंय. 1996 ते 2000 या काळात ते फोटोग्रॅमेट्री आणि रिमोट सेन्सिंगबाबतच्या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांनी काम केलं. तसंच संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या आणि डेहराडूनला स्थित असलेल्या सेंटर फॉर सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी एज्युकेशन इन एशिया ऍण्ड पॅसिफिक एवढं लांबलचक नाव असलेल्या संस्थेचे ते 2006 पासून तीन वर्षे संचालक होते.
युवकांनी अवकाश कार्यक्रमाद्वारे लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी काम करायला हवं, असं आग्रही प्रतिपादन प्रा. जॉर्ज जोसेफ करतात. त्यांनी विविध शोधनिबंध प्रकाशित केले असून त्यांना पृथ्वी विज्ञान मंत्रालयातर्फे सागर विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबतच्या योगदानाविषयी 2009 साली जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. जिओस्पॅशियल तंत्रज्ञानासाठी त्यांना 2008 साली असाच पुरस्कार प्रदान करण्यात आला. इस्रोतर्फे विशेष कार्यासाठी पुरस्कार आणि आर्यभट हा खगोलशास्त्र्ा सोसायटीतर्फे पुरस्कार 2007 साली त्यांना प्राप्त झाला. खगोलशास्त्र्ाातील सुदूर संवेदनाविषयीचं त्यांचं पुस्तक अशा प्रकारचं हिंदुस्थानी लेखकाचं प्रथम परिपूर्ण पुस्तक म्हणून गाजलं. 1998 ते 2003 या काळात ते प्रा. सतीश धवन मानद प्राध्यापकपदी त्यांनी काम करून तरुणांना प्रोत्साहित करण्याचे काम केलं. ते अद्यापही याबाबत सक्रिय आहेत.
























































