लेख – गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती

>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात महाराष्ट्रातील शाहीरांचा फार मोठा वाटा होता; किंबहुना आचार्य अत्रे यांनी त्या वेळी स्पष्ट केले होते की- आमच्या हजारो सभा आणि शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गव्हाणकर यांचा एक पोवाडा एकसमान आहे! संयुक्त महाराष्ट्रातील नेत्यांनी तेव्हा संपूर्ण राज्यभर रान पेटविले होते. त्यात जनजागृतीचे काम प्रामुख्याने शाहीरांनी केले. स्वातंत्र्यपूर्व काळात विशिष्ट विचारसरणीचे शाहीर उदयाला आले. 1944 मध्ये बदलापूर येथे ‘लालबावटा कलापथका’ची स्थापना झाली. त्याच्याच मागेपुढे राष्ट्रसेवा दलाचे कलापथकही निर्माण झाले. खाडीलकर, नानिवडेकर आदी शाहीर हिंदुराष्ट्र प्रेरणेने प्रभावित झालेले होते, तर दुसरीकडे शाहीर कृष्णराव साबळे यांनी सानेगुरुजी, कर्मवीर भाऊराव पाटील, नाना पाटील, संत गाडगे महाराज अशा विभूतींच्या प्रेरणेतून स्वातंत्र्यपूर्व काळात शाहिरी कवने सुरू केली होती. ‘स्वराज्य मिळवायचं औंदा’ अशी शाहिरी ललकारी ग. दि. माडगुळकर, शाहीर शंकरराव निकम या शाहीरांनी दिली होती. साहजिकच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शाहीरांच्या जनजागृतीचा प्रभाव कायम राहिला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तर या शाहीरांचे योगदान अतिशय मोलाचे होते. शाहीर आत्माराम पाटील यांनी ‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल काsंबडं झाकून धरा’ असा संयुक्त महाराष्ट्राचा गोंधळ रचला आणि तो शाहीर अमर शेख यांनी शिवाजी पार्कवर गायला. ‘जनतेच्या सत्तेची ज्योत जागती, गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती’ अशी ललकारी अमर शेख यांनी दिली. एवढंच नव्हे तर, ‘जागा मराठा आम जमाना बदलेगा’ म्हणत देशाच्या राजधानीत शाहीर अमर शेख यांचा बुलंद आवाज घुमला. शैलेंद्रची गाणी आणि अमर शेख यांचा आवाज असे समीकरण तेव्हा अगदी जुळून आले होते.

केवळ संयुक्त महाराष्ट्र नव्हे तर, गोवा मुक्तिसंग्रामातदेखील शाहीरांची बुलंद तोफ पोर्तुगीजांच्या विरुद्ध धडाडली. ‘स्वातंत्र्याच्या भाजी भाकरीत सापडती रे अजून खडे, ठेचून काढा मत्त पोर्तुगीज मुळासकट अन् चला पुढे’ या शाहीर अमर शेख यांच्या बुलंद शाहीरीने गोव्यातील पोर्तुगीजांना धडकी भरली. स्वातंत्र्यपूर्व काळात शाहीर मेळय़ांमध्ये काम करीत असत. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पोवाडे, समरगीते यांच्यासोबत शाहिरी फुलोऱयाचे कार्यक्रम शाहीर करू लागले. या कार्यक्रमाचे जनक शाहीर आत्माराम पाटील होते. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व शाहीरांचे मंडळीकरण केले आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील गाणी नि पोवाडे शाहीरांना पुरविले. सिद्राम बसाप्पा मुचाटे या खान्देशमधील शाहीराकडून शाहीर साबळे यांनी प्रेरणा घेतली. त्यांनी सानेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शाहिरीला प्रारंभ केला. शाहीरांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळय़ा विचारधारा होत्या. तरी प्रत्यक्ष संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मात्र समाजवादी शाहीर, साम्यवादी शाहीर आणि राष्ट्रीय शाहीर सहभागी झाले होते. केवळ शाहिरीच नव्हे तर, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाटय़ाचा प्रभावदेखील मोठा होता. मोरारजी देसाई यांनी तमाशावर बंदी घातली, त्याच काळात शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी तमाशाला लोकनाटय़ असे नाव दिले आणि बाज मात्र तमाशाचा ठेवला. ‘शेठजीचे इलेक्शन’, ‘मुंबईची लावणी’, ‘देशभक्त घोटाळे’ अशी लोकनाटय़े त्या काळात उदयाला आली होती आणि ती लोकप्रियदेखील झाली होती. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि त्याच काळात गिरणी कामगारांची चळवळ अशा चळवळीने महाराष्ट्र पिंजून निघाला होता.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची नाळ 1936 पासून साम्यवादी चळवळीशी जोडली गेली. शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि शाहीर गव्हाणकर या त्रिमूर्तीने शेतकरी आणि कामगार यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला. ‘नाही रे’ गटाच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्षाची चूड पेटवली. त्यासाठी पोवाडा, लोकगीते, गण, गवळण, लोकनाटय़ या लोकाविष्कारांचा माध्यम म्हणून अतिशय प्रभावी वापर केला. अण्णा भाऊंच्या घरी ढोलकी फडाच्या तमाशाची परंपरा होती. या परंपरेला त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या क्रांतिदर्शी विचारांच्या नवतेचा परीसस्पर्श घडवला. अण्णा भाऊंनी साधारणतः 1942 पासून स्फूटलेखनाला प्रारंभ केला. लोकभावनेला हात घालायचा असेल तर पोवाडा, लोकगीते, लोकनाटय़ासारख्या जनमानसावर मोहिनी घालणाऱया परंपरांचा वेध घ्यायला हवा हे अण्णाभाऊंना पक्के उमजले होते.

अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसंबंधी लिहिलेली ‘माझी मैना गावावर राहिली’ ही छक्कड अतिशय गाजली. ‘माझी मैना गावावर राहिली’ ही छक्कड संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शेतकरी, कामगार आणि पुढाऱयांची प्रेरणा ठरली. खरे म्हणजे ही छक्कड एक रूपक आहे. ती अण्णाभाऊंच्या प्रतिभेचा फुलोरा आहे. गाव-खेडय़ात राहणारी मैना आणि तिच्यासाठी झुरणारा मुंबईतला कापड गिरणीतला कामगार. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, कामगारांचे शोषण हे सर्व या छक्कडमधून प्रतीत होते. बेळगाव, कारवार, निपाणी, डांग, उंबरगाव महाराष्ट्रापासून तुटून वेगळा पडला. खरं म्हणजे हीच अण्णा भाऊंची मैना. तिची एकसंध महाराष्ट्रापासून झालेली ताटातूट ‘माझी मैना’मध्ये अण्णाभाऊंनी अतिशय ताकदीने साकारली आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत स्फुल्लिंग चेतवणाऱया या शाहिरी परंपरेचा म्हणूनच करावा तितका गौरव थोडाच आहे!

(लेखक लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत.)