मुद्दा – कोरोनामुळे मिळालेला पॉज

1502

>>पुरुषोत्तम कृ. आठलेकर

कोरोना या संसर्गजन्य या रोगाने aआपला देश नव्हे तर संपूर्ण जग थांबले आहे. त्यामुळे अनेक देशांत लॉक डाऊन घोषित करण्यात आले. साहजिकच सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू वगळता सुरक्षित अंतर ठेवून घरी बसणे हा एकमेव रामबाण उपाय उरला आहे. पहिल्या लॉक डाऊनचे 21 दिवस पूर्ण झाले आहेत. एकूण परिस्थिती पाहता केंद्र सरकारने लॉक डाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवला आहे. येणारे प्रत्येक संकट हे आपल्याला काही तरी शिकवत असते आणि त्यातूनच आपला आत्मविश्वास वाढत असतो. अर्थात दैनदिन घावपळीचे आपले आयुष्य अशा पद्धतीने एकदम थांबणे ही कल्पनाच खरं तर करता येत नाही. मात्र हा अनुभव आपण सगळेच आज घेत आहोत. त्यामुळे कोरोनाचे हे संकट आपल्या लक्षात राहणार हे नक्कीच. संपूर्ण देश थांबणे, व्यवहार थांबणे, कारखाने, कार्यालये बंद राहणे, रस्त्यांवर फिरायला बंदी असणे अशा प्रकारच्या गोष्टी यापूर्वी कधीही घडल्या नाहीत. अगदी युद्ध काळातही असे सर्वत्रच घडते असे नाही. त्यामुळे कोरोनाचा हा ‘पॉज’ इतिहासात नेंदवला जाईल. अगदी आठवते ते म्हणजे प्लेग या रोगानेसुद्धा थैमान घातले होते. परंतु कोविड -19 या रोगाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत असल्याने जगातील बहुतेक देश आज लॉक डाऊन अवस्थेत आहेत. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यासाठी आपण सर्वांनी योग्य ती काळजी व खबरदारी घेणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. रोज आपली घावपळ ही घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणेच असते आणि त्याला अनुसरूनच आपली जीवनशैली झालेली आहे. परंतु उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आपली नेहमीची धावपळ थांबून एक मोठा पॉज मिळाला आहे. आता रिकाम्या वेळेत काय करावयाचे, यापेक्षा मी यावेळेत काय काय करू शकतो. हा विचार मनात आणला आणि त्याप्रमाणे रोज सकाळी उठल्यावर देवांना नमस्कार केल्यानंतर पुढचा दिवस सुरू करायचा. अशावेळी आठवतात ते स्वातंत्र्यवीर सावरकार. कारण या महान स्वातंत्र्यवीरांनी प्रतिकूल परिस्थितीत अनेक यातना, त्रास सहन करून एका छोटय़ा खोलीत कठोर शिक्षा भोगून दहा वर्षे देशसेवेसाठी अर्पण केली. मग आपण आपल्या घरात अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपत मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग का नाही करू शकत? असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला केल्यास प्रत्येकाची सकारात्मकता वाढेल. नकारात्मक दृष्टिकोन कमी होईल. देशातील प्रत्येक नागरिकाने मिळालेला हा पॉज सत्कारणी लावावा. यादृष्टीने वाचन, लिखाण यावर लक्ष केंद्रीत करावे. सगळेच घरात असल्यामुळे एकमेकांमधील संवाद वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाची मते, विचार यांची देवाण-घेवाणही होत आहे. नेहमीच्या धावपळी जीवनात बऱयाच वेळेला आपल्यातील छोटय़ा छोटय़ा सवयी एकमेकांना माहिती नसतात. पण आता वेळ मिळाल्यामुळे आपण त्या समजून घेऊ शकतो. हासुद्धा एक चांगला बदल कोरोनामुळे झालेला अनुभवास मिळत आहे. वेळेचे नियोजन मनाशी पक्के केले तर रिकामा वेळसुद्धा कमी पडतो. दुसरीकडे घरातील सर्व कामे एकमेकांनी वाटून घेतल्याचेही आढळून येत आहे. एक प्रकारचे हे उत्तम कौटुंबिक टीमवर्कच झाले आहे. त्यातून संपूर्ण कुटुंबाला एक वेगळेच समाधान मिळत आहे. आज आपल्याकडे अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध पर्याय आहेत. कोरोनामुळे आयुष्यात मिळालेला हा पॉज एक संधी म्हणून घ्याला हवा. त्याचा वापर सकारात्मकता वाढवून आपल्यातला नकारात्मक दृष्टिकोन कमी करण्यासाठी करावा.
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या