
>> राहुल गोखले
मराठीत विज्ञानकथा लिहिणारे फारसे नाहीत. म्हणूनच या प्रांतात मुशाफिरी करू इच्छिणाऱयांची आवर्जून दखल घेतली पाहिजे. विज्ञानविषयक लेखन करणारे डॉ. सुनील विभुते यांचा ‘मिरॅकल’ हा संग्रह भविष्यवेधी वैज्ञानिक कल्पनांच्या आधारावर बेतलेल्या कथांचा आहे. विज्ञान-तंत्रज्ञान वेगाने प्रगती करीत आहे आणि रोजच्या आयुष्याचा तो अविभाज्य घटक बनला आहे. त्याचेच प्रतिबिंब या कथांमध्ये पडलेले दिसेल.
प्रस्तुत कथासंग्रहात सात कथा आहेत. मात्र त्या दीर्घकथा आहेत. ‘मिरॅकल’ या कथेत एका अपघातात गंभीर जखमी झालेल्या समीर देशमुख नावाच्या तरुणाला बरे करण्यात निनाद हा बायोमेडिकल अभियंता तंत्रज्ञानाची कशी मदत घेतो असा कथाभाग आहे. त्यासाठी मापो सिग्नल अनालायझर नावाचे उपकरण आणि नवे संगणकीय सॉफ्टवेअर निनाद तयार करतो, ज्यायोगे माणसाच्या मनातील विचार संगणकाच्या पीनवर दिसू शकतात. यातूनच समीर हा आपल्या प्रेयसीचा सतत विचार करतो हे निनादला समजते आणि जेव्हा रुग्ण प्रिय व्यक्तीशी असा ‘आतून’ संवाद करीत असतो तेव्हा त्याला जगण्याची प्रेरणा मिळते. तेव्हा ही ‘सुमी’ समीरसमोर आली तर तो लवकर ठणठणीत बरा होईल असा ‘शोध’ निनाद लावतो. मात्र या कथेला पुढे कलाटणी मिळते; ती मुळातूनच वाचायला हवी. ‘फॉलसेबो’ या कथेत लेखकाने विलक्षण कल्पना मांडली आहे. हा काळ 2104 सालचा आहे आणि पृथ्वीबरोबरच तीन ग्रहांवर मानवी वस्तीने पृथ्वीवासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेक भविष्यवेधी कल्पनांचा आधार घेऊन लेखकाने ही कथा सजवली आहे.
अन्य पाच कथांमध्येदेखील लेखकाने अशीच अफलातून कल्पनांची पेरणी केली आहे. बापू, मंदार आणि मयूर अशा तीन पिढय़ांतील संवादातून सुरू झालेली कथा, बापूंना जडलेला हृद्रोग, हृदय प्रत्यारोपणाची भासलेली गरज. त्याच सुमारास अंकुश नावाच्या बांधकामावर मजुरी करणारा आलेला तरुण, त्याच्या गरोदर असलेल्या पत्नीचे हृदय कमकुवत झाल्याने तिला ‘कृत्रिम काळीज’ बसवा अशी त्याने डॉ. मीनल यांना केलेली कळकळीची विनंती अशी ही ‘कार्डियो-77’ कथा पुढे सरकते.
यांत्रिक घुबडांच्या व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने दहशतवाद्यांना केलेला प्रतिकार ‘सर्जिकल स्ट्राईक’ या कथेत हुबेहूब मानवाप्रमाणे दिसणाऱया यंत्रमानवांनी ग्रामीण भागांत माणसांत सर्रास मिसळून केलेली लक्षवेधी कामगिरी ‘गुरू महाराज‘ या कथेत लेखकाने रेखाटली आहे. ‘राफेस राणी’, ‘फायर फ्लाय अॅक्शन’ या कथाही वाचनीय. या कथांचे आणखी एक ठळक वैशिष्टय़ म्हणजे तंत्रज्ञानातील अचाट प्रगतीनंतरही मानवी भावना बोथट झालेल्या नाहीत याचे लेखकाने घडविलेले लोभस दर्शन. वैज्ञानिक संकल्पना आणि ललित शैली यांचा समतोल साधून लिहिलेल्या या कथांनी लेखकाकडून भविष्यात दर्जेदार कथांची अपेक्षा वाढविली आहे.





























































