
>> राहुल गोखले
मराठीत युद्धविषयक लेखन करणारे तुलनेने कमीच. त्यात ज्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल ते दिनकर विनायक तथा दि. वि. गोखले यांच्या ‘माओचे लष्करी आव्हान’, ‘पहिले महायुद्ध’, ‘युद्धनेतृत्व’ या ग्रंथांतून त्यांची प्रतिभा आणि व्यासंग यांचे सम्यक दर्शन घडते. दि. वि. यांच्यात ज्या अनेक गुणांचा समुच्चय होता, त्यातील हे लक्षवेधी गुण, बंडखोरी हा दुसरा. अर्थात ही बंडखोरी वैचारिक स्तरावर होती आणि वैयक्तिक स्नेहात त्यामुळे कधीही अंतर येत नसे. अशा बहुपेडी व्यक्तिमत्त्वाच्या दि. वि. गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षाला येत्या 25 मार्च रोजी सुरुवात होत आहे.
पत्रकार आणि युद्धविषयक व्यासंगी लेखक दि. वि. गोखले यांचे शिक्षण पुण्यात झाले आणि पु. ग. सहस्रबुद्धे यांच्यासारख्या गुरूंचे संस्कार त्यांच्यावर झाले. बहुधा त्याच संस्कारांचा परिणाम म्हणून दि. वि. यांनी ‘अभ्यासोनि प्रकटावे’ ही वृत्ती कधीही सोडली नाही. किंबहुना, पत्रकार आणि लेखक म्हणून वाचकांच्या आकलनात नेहमी भर घालत राहिले पाहिजे अशीच त्यांची धारणा होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर दि. वि. यांनी काही काळ सरकारी कार्यालयात लिपिक म्हणून आणि मग काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली खरी; पण त्यांचे मन तिथे रमणे शक्य नव्हते. तेव्हा पत्रकारितेचे आकर्षण मोठे होते आणि मुंबईला येऊन ‘नवशक्ती’ या दैनिकात ते उमेदवार म्हणून रुजू झाले. दि. वि. यांची हिंदुत्वावर आणि त्यातही सावरकरांवर अतूट निष्ठा होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून वर्षभर त्यांनी काम केले होते. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर बंदी आली आणि संघ स्वयंसेवकांनी देशभर सत्याग्रह केला. ‘नवशक्ती’ दैनिकात नोकरी करीत असलेल्या दि. वि. यांनी आपली जीवननिष्ठा प्रधान मानली आणि नोकरी सोडून ते सत्याग्रहात सामील झाले. पुढे सत्याग्रहींची सुटका झाली आणि दि. वि. पुन्हा ‘नवशक्ती’मध्ये रुजू झाले. पुढे ते त्या दैनिकाचे वृत्त संपादकदेखील झाले, परंतु कोणतीही निष्ठा ही दि. वि. यांनी आंधळेपणाने जोपासली नाही.
‘नवशक्ती’मधून दि. वि. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आले आणि त्यांच्या प्रयोगांना तेथे मोठा पैस मिळाला. पहिले वृत्त संपादक म्हणून त्यांनी अनेक कल्पना राबविल्या. खेळ आणि त्यातही हिंदुस्थानी खेळ यांचे ते खंदे पुरस्कर्ते होते. वृत्तपत्राचे शेवटचे पान हे क्रीडाविषयक बातम्यांसाठी या कल्पनेचे एका अर्थाने दि. वि. हेच जनक. बातम्या देताना अत्यंत काटेकोर असायला हवे आणि कोणतीही शंका असेल तर ती माहिती एकतर तपासून घ्यायला हवी अन्यथा बाजूला ठेवायला हवी असा त्यांचा शिरस्ता असे. स्वतः दि. वि. यांचे लेखन हे असेच गोळीबंद असे. पुढे ‘महाराष्ट्र टाइम्स’चे सहसंपादक झाल्यावर ‘धावते जग’ हे स्फुट लेखन ते करीत आणि त्यातील विषयांच्या निवडीपासून शीर्षकांपर्यंत सर्वत्र दि. वि. यांचा ठसा त्यावर उमटलेला दिसे. किंबहुना, ढिसाळपणा आणि बेंगरूळपणा यांचा दि. वि. यांना मनस्वी तिटकाराच होता. लेखनाच्या बाबतीत त्यांचा हाच कटाक्ष असे.
दि. वि. हे पत्रकार म्हणून अनेकांचे मार्गदर्शक होतेच, पण आपल्या गुणग्राहकतेमुळे अनेक सामाजिक चळवळी आणि कार्यांचे ते मार्गदर्शक झाले. मुख्य म्हणजे आपले कर्तृत्व मोठे आहे याचा बडेजाव त्यांनी कधी मिरविला नाही आणि नवोदितांना त्यामुळेच त्यांचा आधार वाटत असे. स्वतःविषयी अबोल आणि दुसऱ्या कोणी केलेल्या अगदी छोटय़ाशा कामगिरीचेदेखील तोंडभरून कौतुक हा दि. वि. यांच्या स्वभावाचा लोभस पैलू होता. त्यामुळेच वैचारिक मतभेद असलेल्यांशीदेखील त्यांचा स्नेह कधी लोपला नाही. ग्राहक हक्क संरक्षण जेव्हा एका अर्थाने बाल्यावस्थेत होते तेव्हा ग्राहक पंचायतीचे दि. वि. हे एक संस्थापक सदस्य होते. ग्रंथालीची कल्पना पसरविण्याचा प्रयत्न सुरू होता आणि पुण्यात त्यासाठी शंभरेक लेखक-साहित्यप्रेमी बैठकीसाठी जमले होते. या चळवळीत सहभागी व्हायचे तर पंचवीस रुपये द्यावे लागणार होते. मात्र त्या नवथरांवर विश्वास कोण ठेवणार? तेव्हा त्या बैठकीस उपस्थित असणारे दि. वि. यांनी ‘‘मी या मंडळींना ओळखतो, तुम्ही निःशंक यांना पैसे द्या, फार तर प्रयोगात पैसे फुकट जातील, पण हे लोक पैसे खाणार नाहीत’’ असे सांगून स्वतः प्रथम पैसे दिले अशी आठवण दिनकर गांगल यांनी लिहिली आहे.
युद्ध हा दि. वि. यांचा अत्यंत आवडीचा आणि तितकाच अभ्यासाचा विषय. 1962 साली चीनने हिंदुस्थानवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून लिहिलेली माओचे लष्करी आव्हान ही लेखमाला इतकी गाजली की, युद्धाच्या वेळी अशी लेखमाला हा मराठी वृत्तपत्रांत पुढे प्रघात बनलाच. मात्र खुद्द ‘माओचे लष्करी आव्हान’चे कौतुक स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून अनेकांनी केले. पुढे याचे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा त्यास पु. ल. देशपांडे यांची प्रस्तावना लाभली. ‘चिनी आक्रमणासंबंधी माझे प्राथमिक शिक्षण गोखल्यांच्या या लेखनामुळे झाले’ असे पु. ल. यांनी लिहिले होते. पुढे ‘पहिले महायुद्ध’ आणि ‘युद्धनेतृत्व’ ही अशीच युद्धनीतीची वस्तुनिष्ठ मांडणी करणारे, लढाया आणि लढवय्ये नेतृत्व यांचा वेध घेणारे ग्रंथ दि. वि. यांनी लिहिले आणि तेही वाचकप्रिय ठरले. ‘ललित’मध्ये ‘ठणठणपाळ’ यांनीदेखील दि. वि. यांच्या लेखनाचे कौतुक केले होते. थोर मराठी सेनानी लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात यांच्या आत्मचरित्राचा ‘माझी शिपाईगिरी’ हा त्यांचा अनुवाद गाजला आणि क्लॉसविट्झच्या महाग्रंथाचा अनुवाद आपल्या अखेरच्या आजारपणातदेखील दि. वि. यांनी जिद्दीने पूर्ण केला. हे सर्व ग्रंथ मराठी भाषेचे वैभव आहेत यात शंका नाही.
शिवसेना, ‘मार्मिक, ‘सामना’ यांच्याशी दि. वि. यांचा निकटचा संबंध होता. प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी दि. वि. यांना अतीव आदर होता आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अगदी घनिष्ठ स्नेह होता. या स्नेहापोटी आणि शिवसेनेच्या लढाऊ वृत्तीवरील प्रेमापोटी ‘सामना’ आणि ‘मार्मिक’मधून विपुल लेखन दि. वि. यांनी केले. ‘मार्मिक’मध्ये ‘मोरूचा बाप मोरूला म्हणाला’ नावाचे नर्मविनोदी सदर दि. वि. बराच काळ लिहीत असत. पुढे निवृत्तीनंतर ‘मार्मिक’मध्ये दि. वि. पाक्षिक स्तंभलेखन करीत असत.
दि. वि. यांना अडचणी-समस्या आल्या नाहीत असे नाही. मात्र त्या दुःखाला आणि वेदनांना त्यांनी आपल्या मूलतः प्रसन्न स्वभावावर वरचढ होऊ दिले नाही. एकीकडे निर्भीड आणि व्रतस्थ पत्रकारिता करताना दुसरीकडे त्यांच्या गप्पांना नर्मविनोदाचा स्पर्श असे. त्यांच्या या गप्पांना मैफलीचे स्वरूप प्राप्त होई आणि त्या संपू नयेत असे वाटे. जातील तेथे चैतन्य निर्माण करण्याची हातोटी त्यांच्यात होती. याचे कारण स्वभावतःच ते उमदे होते. त्यांच्या या उमदेपणानेच बहुधा त्यांना अजातशत्रू बनविले. आपल्याच एका लेखात त्यांनी लिहिले होते ते बहुधा त्यांच्या पत्रकारितेचेच नव्हे, तर आयुष्याचेच सार असावे. त्यांनी लिहिले होतेः ‘चाळीस वर्षांच्या वृत्तपत्रीय जीवनात हर्षाबरोबर अमर्षाचे, आनंदाबरोबर खेदाचेही प्रसंग आले. मात्र हिशेब केला तर श्रीशिल्लक आनंदाची राहते. माझ्या बव्हंश सहकाऱयांना याचे श्रेय जाते. त्यांच्याबरोबर काम करताना काळ कसा मजेत गेला. विशेष म्हणजे माझ्या ध्येयवादाबाबत तडजोड करण्याचा प्रसंग माझ्यावर आला नाही. माझ्या दृष्टीने ती सर्वाधिक समाधानाची गोष्ट!’




























































