
>> राहुल रानडे
‘‘प्रिय भाई…’ हे नाटक नाही, गाण्याचा कार्यक्रम नाही, कविता वाचनाचा नाही, पत्र वाचनाचाही नाही, पण म्हणाल तर हे सगळं यात सामावलेले आहे. कवितेच्या शोधाने सुरू होणारा प्रवास रसिकांना कवितेच्या अवकाशात घेऊन जातो, आपल्या जगण्याचा, साहित्यसमृद्धिचा मागोवा घेतो.
मी नववीत किंवा दहावीत असेन. माझ्या कुटुंबीयांच्या मते संगीताची देणगी मी वरूनच घेऊन आलो होतो! कारण एकही दिवस न शिकता हार्मोनियमवर गाणी आणि राग वगैरे पण वाजवत असे. अर्थात लहानपणापासूनच मी तबला आणि शास्त्र्ााrय गायन शिकत होतो, पण हार्मोनियम मात्र न शिकताच वाजवायचो. त्या काळी घरात पुलंच्या हार्मोनियम वादनाची कॅसेट माझा मामा वारंवार लावत असे. त्या कॅसेटमधला तोडी राग माझा अत्यंत आवडीचा. मीदेखील पुलंनी वाजवलेल्या तोडी रागाची नक्कल करण्याचा प्रयत्न करीत असे. एकदा माझं वादन ऐकून कोणीतरी सुचवलं, ‘पुलंना ऐकव तुझा तोडी!’ मग काय आमची स्वारी पुलंच्या घरी 777 रूपालीवर दाखल झाली. अर्थात फोनवर रीतसर वेळ वगैरे घेऊनच.
‘‘छान फिरतात तुझी बोटं’’ माझं वादन ऐकून पुल म्हणाले. माझं वादन ऐकणारा हा अवलिया अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत का आहे, हे त्या वयात मला कळलेलं नव्हतं, पण ज्यांचं वादन ऐकून आपण शिकलो ते स्वतः कौतुक करताहेत हे मात्र फार भारी वाटत होतं. माझ्यापेक्षा माझ्या संगीताच्या वाटचालीला प्रोत्साहन देणाऱया माझ्या आईलाच माझं कोडकौतुक. ती सुखावलेली माऊली सगळय़ांना सांगत सुटली होती, “आमच्या राहुलनी खुद्द पुलंना पेटी वाजवून दाखवली हो.’’ नंतरच्या काळात थिएटर ऍकॅडमी या नाटय़संस्थेत काम करत असल्यामुळे भाई आणि सुनिताबाईंना भेटण्याचा प्रसंग वारंवार आला आणि हे जोडपं विलक्षण आहे हे तेव्हा पूर्ण कळून चुकलं. हा सगळं पाल्हाळ लावण्याचं कारण हे की, या पार्श्वभूमीवर जेव्हा ‘प्रिय भाई…’ हा कार्यक्रम मी बघितला, तेव्हा त्या दोघांच्या आठवणीने अनेकदा डोळे पाणावले. काही चुकार अश्रू गालांवर ओघळलेदेखील. प्रत्येक क्षण मनाला भिडला. अर्थात याचं संपूर्ण श्रेय कार्यक्रम सादर करणाऱया अख्ख्या चमूचं, पण सगळय़ात मोठी शाबासकीची थाप आमचे मित्रवर्य लेखक डॉ. समीर कुलकर्णी आणि दिग्दर्शक अमित वझे यांच्या पाठीवर.
एखादी कलाकृती घडून यायची असेल, त्याची भट्टी जमून यायची असेल तर इकडचं जग तिकडे झालं तरी जमून येतेच. ‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ याचंही नेमकं तेच झालं. आपल्या आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगावर डॉक्टर ‘अनुभव’ नावाच्या मासिकात 2011साली एक लेख लिहितो काय, अनेक वर्ष तो अमित वझेच्या मनात रुंजी घालतो काय आणि 2022मध्ये त्याचं रंगमंचीय सादरीकरण ‘जागर’ या संस्थेतर्फे अमित करतो काय, सगळाच सुंदर योगायोग. हा प्रयोग करायचं निश्चित झाल्यावर सुनीताबाईंची भूमिका साकारण्यासाठी मुक्ता बर्वेने होकार देणं, नेमकी तिची एक सीरियल संपून तिला तेव्हाच वेळ असणं, जयदीप वैद्य, अपर्णा केळकर, निनाद सोलापूरकर आणि मानसी वझे यांसारखे कलाकार अमितला तेव्हा मोकळे मिळणं, हे त्या विश्वनियंत्यानीच योजल्या सारखं झालं. 20 दिवसांत कार्यक्रम उभा राहिलादेखील! 11 जून 2022 या दिवशी ‘प्रिय भाई…’चा शुभारंभाचा प्रयोग पार पडला.
रूढार्थानं ‘प्रिय भाई…’ हे नाटक नाही, हा गाण्याचा कार्यक्रम नाही, कविता वाचनाचा नाही, पत्र वाचनाचाही नाही, पण म्हणाल तर हे सगळे प्रकार यात सामावलेले आहेत. एखाद्या लेखाची रंगावृत्ती करणं आणि तिचं परिणामकारक रंगमंचीय सादरीकरण करणं हे तसं खूप अवघड काम, पण अमित वझेच्या अख्ख्या संचाचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. सुजय भडकमकरची नेमकी प्रकाशयोजना, सुजीत खांबेचं ध्वनीसंयोजन, मिलिंद मुळीक यांनी वॉटर कलरनी रेखाटलेल्या चित्रांचा मागच्या पडद्यावर केलेला सुयोग्य आणि सुरेख वापर. जयदीप वैद्य, अपर्णा केळकर आणि निनाद सोलापूरकर यांनी केलेली संगीताची योजना, सगळंच केवळ अप्रतिम. ‘कौसल्येचा राम’, ‘ही कुणी छेडिली तार’, ‘शब्दावाचून कळले सारे’ ही गाणी तर एखाद्या रत्नजडित अलंकारात चपखल बसलेल्या हिऱयांसारखी संहितेत मढवली गेली आहेत.
अत्यंत पूरक पार्श्वसंगीत हवा तो परिणाम तर साधतंच, पण कधी सुरू होतं आणि कधी संपतं हे कळतदेखील नाही. ‘प्रिय भाई…’मधल्या संगीताच्या वापराबद्दल हेच म्हणता येईल. तंत्राचा बडेजाव न करता त्याचा पुरेपूर वापर या कार्यक्रमामध्ये केलेला प्रकर्षानी जाणवतो. जयदीप वैद्य आणि अपर्णा केळकर (अंजली मराठेदेखील काही प्रयोग करते) यांचं अप्रतिम गायन कानाला सुखावतं.
मुक्ता बर्वेचं रंगमंचावरचं अस्तित्व, तिची देहबोली, शब्दफेक, चष्याच्या आडून दिसणारे विलक्षण बोलके डोळे, सगळंच खिळवून ठेवणारं. रवींद्रनाथ टागोर यांची कविता शोधण्याची सुनीताबाईंची तगमग मुक्ता मूर्तिमंत उभी करते. तिच्या तोंडून पद्मा गोळे यांची ‘चाफ्याच्या झाडा’ ही कविता ऐकणं हा तर एक अद्भुत अनुभव होय. मानसी वझे आणि स्वतः अमित वझे यांचा वाचिक अभिनय थेट भिडणारा आणि सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे या अख्ख्या कार्यक्रमातली एकूण एक गोष्ट तोलून मापून केलेली आहे. ज्या नवीन पिढीला पुल आणि सुनीताबाई फारसे माहीत नसतील ती मंडळीदेखील या अद्वितीय द्वयीला मनोमन कुर्निसात करतील यात शंका नाही. थोडक्यात, अनेक विलक्षण अनुभवांची रेलचेल असलेला, ‘मस्ट सी’ किंवा ‘मस्ट एक्सपीरियन्स’ म्हणतात तसा कार्यक्रम म्हणजे, ‘जागर’चा ‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे.’
[email protected]

























































