रंगनाटय़ – संस्कृती बदलाची वादळी पाने…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राज चिंचणकर

दोन भिन्न संस्कृतीतला फरक दर्शवत हिंदुस्थानी संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारे नाटक.

अमेरिकेत वास्तव्यास असलेली हिंदुस्थानातली एक पिढी आणि पूर्णत अमेरिकन बनलेली त्यांची पुढची पिढी या वाटेवर मुख्यत्वे ‘अमेरिकन अल्बम’ हे नाटक मार्पामण करते. या नाटकाचे शीर्षक अगदी थेट बोलते, पण या शीर्षकाची दुसरी बाजू असल्यागत, हिंदुस्थानी संस्कृती यात वावरलेली आहे. परिणामी हा अल्बम संस्कृती बदलाच्या वादळी पानांचे अस्तित्व कायम ठेवत हिंदुस्थानी संस्कृतीचे महत्त्व प्रामुख्याने अधोरेखित करतो.

काही हिंदुस्थानी कुटुंबे अमेरिकेत वास्तव्यास असली तरी त्यांची नाळ इथल्या मातीशी घट्ट जुळलेली असते. या उलट या मंडळींची पुढची पिढी मात्र हिंदुस्थानी संस्कृतीबद्दल केवळ ऐकून असते. याचे प्रतिबिंब म्हणावे असे ‘अमेरिकन अल्बम’ या नाटकातले कानेटकर कुटुंब, गेली अनेक वर्षे अमेरिकेच्या शिकागो शहरात स्थायिक झालेले आहे. हरिहर, त्यांची पत्नी नीलिमा, त्यांची मुलगी हनी आणि नीलिमाचा भाऊ निशिगंध असा हा परिवार आहे. हरिहर यांनी शिकागोत स्वतचा व्यवसाय उभारला आहे. त्यांची मुलगी हनी ही पूर्णत अमेरिकन आहे. निशिगंध हा हरिहरच्याच सोबतीने त्यांच्या व्यवसायात आहे. याअनुषंगाने एकूणच नातेसंबंध, भावनिक आंदोलने यांचा पट मांडणारे हे नाटय़ लेखक राजन मोहाडीकर यांच्या लेखणीतून उतरले आहे.

हिंदुस्थान व अमेरिका या देशांच्या संस्कृतीतला फरक स्पष्ट करत, त्यायोगे मानवी स्वभावधर्माची गुणवैशिष्टय़े त्यांनी संहितेत मांडली आहेत. त्याप्रमाणे कधी हलकेफुलके, तर कधी वादळी ठरणारे यातले नाटय़ केवळ या संस्कृतींची पानेच उलटत नाही तर मानवी भावभावनांच्या हिंदोळय़ावर ते झुलत राहते. नाटय़ाचे हे झुलणे दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी रंगमंचावर अधिक आशयघन केले आहे. दिग्दर्शनासह नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना आणि वेशभूषा अशी ‘सबकुछ’ कामगिरी त्यांनी या नाटकासाठी केली आहे. या सगळय़ा एकजिनसीपणातून या नाटकाचे ‘सांगणे’ पुरुषोत्तम बेर्डे यांनी ‘या हृदयीचे त्या हृदयी’ नेऊन पोहोचवले आहे.

नाटकातले प्रमुख पात्र म्हणजे हरिहर हे शिकागोत स्थायिक आहेत, तर त्यांचे आई-वडील मात्र मुंबईत आहेत. हरिहर यांच्या बाबतीत घडणाऱया कौटुंबिक घडामोडींसह त्यांच्या वडिलांना उपचारासाठी अमेरिकेत आणण्याचा निर्णय असो किंवा त्यांची मुलगी हिंदुस्थानात जाण्यास निघते तेव्हा त्यांना होणारा आनंद असो किंवा वडिलांच्या निधनानंतर अमेरिकेतल्या घरात श्रीमद् भगवद्गीतेच्या अध्यायांचे पठण असो, या सगळय़ातून त्यांचे स्वदेशाशी असलेले ऋणानुबंध ठळकपणे स्पष्ट होतात. प्रत्यक्षात अमेरिकन संस्कृतीचा परिचय असलेले दीपक करंजीकर यांनी हरिहर ही भूमिका रंगवली असून यातले नाटय़ या गुणी रंगकर्मीने उत्कटतेने पेश केले आहे. ही भूमिका कदाचित त्यांच्यासाठीच लिहिली गेली असावी इतकी सरस कामगिरी त्यांनी या भूमिकेद्वारे केली आहे. एक मोठा उद्योजक ते संवेदनशील पिता अशी अभिनयाची रेंज त्यांनी रंगमंचावर ठाशीवपणे मांडली आहे.

नीलिमाचे पारडे मात्र अमेरिकन संस्कृतीकडे जास्त झुकलेले आहे. तिचे वागणे त्याच थाटाचे असले तरी काही प्रसंगांतून तिच्या मनाच्या कोपऱयात हिंदुस्थानी संस्कृती कुठेतरी सजीव असल्याचे स्पष्ट होत राहते. नीलिमाच्या भूमिकेत भाग्यश्री देसाई फिट्ट शोभून दिसल्या आहेत. त्यांनी पकडलेला अमेरिकन भाषेचा लहेजा तसेच त्यांचा रंगमंचावरचा वावर या पात्राला अलगद त्या विश्वात नेऊन ठेवण्याचे काम करतो. हनी मात्र पूर्णत अमेरिकन संस्कृतीला शरण गेली असल्याने तिला हिंदुस्थानी संस्कृतीबद्दल, तिथल्या माणसांबद्दल अजिबात आपुलकी नाही. अमृता पटवर्धन हिने आधुनिकता आणि सहजता याचा उत्तम मेळ घालत ही भूमिका वठवली असून त्यातून तिची मानसिक आंदोलने ठोसपणे पोहोचवण्याचे कार्य तिने केले आहे. तिच्या विचारांचा कायापालट झाल्यानंतर ती ज्या पद्धतीने पेश होते, त्यातून हिंदुस्थानी संस्कृतीचे महत्त्व दृगोच्चर होण्यात तिची भूमिका महत्त्वाची ठरते.

निशिगंध हे अतिशय लव्हेबल असे पात्र आशुतोष नेर्लेकर यांनी तितक्याच तन्मयतेने नाटकात उभे केले आहे. हरिहरला सदैव साथ देणारा, हनीच्या दोलायमान अवस्थेत तिला समजून घेणारा तसेच त्याच्यावर गैरसमजातून आरोप झाल्यानंतरही संयतपणे एकंदर स्थिती हाताळणारा, असे विविध रंग आशुतोष नेर्लेकर यांनी या भूमिकेत प्रभावीपणे दृगोच्चर केले आहेत. नाटकातला प्रसंगी निर्माण होणारा ताण हलका करण्याचे काम मेघा फडणवीस या पात्राने केले असून ही भूमिका मोनिका जोशी यांनी शुद्ध मराठी भाषेच्या लेपनात गोड रंगवली आहे.

अमेरिकेतल्या घराचे नेत्रसुखद नेपथ्य, पात्रांच्या वेशभूषेतली नजाकत, उठावदार प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीत यामुळे नाटकाचे ‘दिसणे’ आकर्षक झाले आहे. या सगळय़ाला दृकश्राव्य माध्यमाचीही साथ आहे. ‘रसिकमोहिनी’ व ‘एफ.एफ.टी.जी.’ या संस्थांनी हे नाटक रंगभूमीवर आणले असून नेहमीची रंगमंचीय चौकट मोडत या अल्बमची पाने आकर्षकरीत्या सजवण्याचे काम केले आहे.
 [email protected]