रस्ते अपघातांना लगाम कसा घालणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी 

रस्ते अपघातांवर चर्चा करण्यासाठी राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची त्रैमासिक बैठक अलीकडेच सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांवर व सुरक्षा उपायांवर चर्चा झाली. बैठकीच्या निमित्ताने राज्यातील रस्ते अपघातांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप..

पोलादपूरच्या आंबेनळी घाटातील भीषण अपघातानंतर राज्यातील रस्ते अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार रस्ते अपघातात महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रात एकीकडे महामार्गाचे जाळे वाढत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गानंतर आता मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग तयार होत आहे. त्यामुळे द्रुतगती महामार्गावर अमर्याद वेगाने मोटारी चालवणाऱ्यांवर अंकुश आणण्याची गरज आहे. त्याचे पडसाद राज्य रस्ते सुरक्षा परिषदेच्या बैठकीत उमटले.

सह्याद्री अतिथीगृहावरील त्रैमासिक बैठकीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वेगमर्यादेवर बंधने आणण्याचे महत्त्व अधोरेखित केले. समृद्धी महामार्गावर ताशी 150 कि.मी. वेगाची मर्यादा ठेवण्याची गरज नाही असे स्पष्ट मत रावते यांनी व्यक्त केले. या बैठकीत परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस, राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. त्यांच्या उपस्थितीतच रस्ते अपघातांच्या कारणांची सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रात वाहनांच्या संख्येत वाढ होत असतानाच अपघातांचे प्रमाणही चिंताजनक आहे. 2016च्या तुलनेत 2017 मध्ये अपघातांची संख्या कमी झाली असली तरीही ते प्रमाण देशपातळीवर हे प्रमाण मोठय़ा स्तरावर आहे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, पण समित्या नेमण्यापेक्षा वाहन चालकाच्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे.

कायदे, नियम कडक करून काही फायदे होत नाहीत. उलट नियम तोडण्याकडेच अनेकांचा कल असतो. त्याची प्रचीती मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करताना येते. या मार्गावरील अगदी डावीकडची मार्गिका(लेन) अवजड वाहनांसाठी तर उजवीकडील मार्गिका हलक्या वाहनांसाठी राखून ठेवली आहे, पण द्रुतगती मार्गावर नेमके उलटे चित्र बघायला मिळते. अवजड मालवाहू ट्रक- ट्रेलर उजव्या मार्गिकेतून चालवतात. या मार्गावर ओव्हरटेक करण्याचे प्रमाणही प्रचंड आहे. वेग मर्यादा ओलांडल्याने व लेनची शिस्त न पाळल्याने अपघातांचे प्रमाण प्रचंड आहे. द्रुतगती मार्गावर अवजड वाहने उजव्या लेनमधून जाऊ नयेत म्हणून हाईट बॅरिकेड लावण्यात आले होते. म्हणजे ठरावीक उंचीवर आडवे लोखंडी बार लावले होते, पण हाईट बँरियरवरच ट्रक आदळले. त्यामुळे हा प्रयोगही अयशस्वी झाला. आता द्रुतगती मार्गावर स्पीडगन लावल्या आहे. वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावण्यात येत आहे, पण त्यात सातत्य असण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण 29 टक्के तर गंभीर अपघातात 24 टक्के व्यक्ती जखमी होतात. यंदाच्या वर्षात जानेवारी ते मार्च महिन्यात राज्यात 9 हजार 243 अपघात झाले. त्यात 3 हजार 361 जणांचा मृत्यू झाला. राज्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण अधिक आहे. राज्यात 2017 मध्ये 35 हजार 853 अपघात झाले, त्यात 12 हजार 264 जणांचा मृत्यू झाला, तर 20 हजार 465 जण जखमी झाले.

पण केवळ महामार्गावरच नव्हे, तर शहरातल्या व ग्रामीण भागातल्याम रस्त्यांवरही अपघातांचे प्रमाण मोठे आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण अधिक असल्याची आकडेवारी आहे. जानेवारी ते मार्च 2018 या कालावधीतील आकडेवारीनुसार शहरी भागातील अपघातांचे प्रमाण 27 टक्के असून मृत्यूचे प्रमाण 17 टक्के आहे, तर ग्रामीण भागातील अपघातांचे प्रमाण 73 टक्के असून मृत्यूचे प्रमाण 83 टक्के आहे. मोटारींच्या अपघातांपेक्षा दुचाकीवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण व पादचाऱ्यांच्या अपघातांचे प्रमाण अतिशय चिंताजनक आहे. पादचारी, सायकलस्वार व दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रमाण 66 टक्के आहे. त्यात 25 ते 45 वयोगटातील युवकांची संख्या अधिक आहे. हल्लीच्या काळात अतिशय आधुनिक व वेगवान मोटारसायकली रस्त्यावर आल्या आहेत. वेगावर स्वार होण्याच्या नादात युवा पिढीच्या मोटरसायकलला अपघात होतो. मोटरसायकल ट्रिपल सीट व हेल्मेटशिवाय चालवण्याचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत हेल्मेट वापरण्याचे प्रमाण अधिक आहे, पण राज्याच्या इतर भागात तर हेल्मेटशिवाय मोटारसाकल चालवताना सर्रास दिसतात. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वेगाला लगाम घालण्याची गरज आहे, पण महामार्गावर लिहिलेल्या ‘मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक’ या संदेशाकडे दुर्लक्ष केल्यानेच अपघातांना आमंत्रण मिळते.

– मोटारींचे प्रखर हेडलाईटही अपघातांना आमंत्रण देतात. कारण चालकाच्या समोरील काचेमध्ये दोष असल्यास अपघातांची शक्यता वाढते. हल्ली मोटारींना प्रखर झोताचे हेडलाईटस् लावतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस चालकाचे डोळे दिपतात. हल्ली परदेशी बनावटीच्याच नव्हे, तर देशी आधुनिक मोटारींना सफेत प्रकाशझोताचे एलईडी दिवे किंवा हँलोजनचे हेडलाईट लावतात. चालकाच्या समोरील मोटारीची काच सदोष असेल तर समोरील प्रकाशझोत दुपटीने प्रकाशमान होतो. लाईटच्या प्रखर किरणांमुळे रात्री वाहन चालकाला समोरचे दृश्यच दिसत नाही. यावर उपाय म्हणून वसंत कडू या मराठी युवकाने नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करत मोटारींच्या काचांची दृश्यमानता व आयुष्य वाढवण्यासाठी तयार केलेल्या कार्बन अँड क्रोम या तंत्रज्ञानाचे सादरीकरण सह्याद्रीवरील बैठकीत केले. या तंत्रज्ञानाने वाहनाच्या काचेची दृष्यमानता 40 ते 60 टक्क्यांनी वाढते. हॅलोजन हेडलाईटचा प्रकाश चाळीस टक्क्यांनी कमी होतो असा दावा करण्यात आला. त्यामुळे चालकाचे डोळे दिपून जात नाही. नवी मुंबई महानगरपालिकेने 47 बसना कार्बन अँड क्रोम बसवण्यासाठी कंत्राट दिले आहे. एसटीच्या शिवशाही व शिवनेरी बसच्या काचांवर हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रस्ताव मागवला आहे. आरटीओनेही प्रस्ताव मागवला आहे. अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन महामार्गावरील अपघातांना आळा घालता येईल.

राज्यातील वाहन, अपघातांची आकडेवारी –

– महाराष्ट्रातील वाहनांची संख्या (मार्च 2018) – तीन कोटी 28 लाख.
– लायसन्सधारकांची संख्या – तीन कोटी 40 लाख.
– राज्यातील रस्त्यांची लांबी – तीन लाख तीन हजार 359 कि.मी.
– राष्ट्रीय महामार्ग कि.मी.- 12 हजार 275 कि.मी.
– राज्य महामार्ग कि.मी. – 3 हजार 861 कि.मी.
– देशस्तरावरील अपघातात महाराष्ट्र तिसऱया स्थानी.
– राज्यातील अपघातग्रस्त ठिकाणे – 1हजार 324.
– रस्ते अपघातातील जखमींचे प्रमाण – 54 टक्के.
– अपघातातील मृत्युमुखींचे प्रमाण – 29 टक्के.
– 2016च्या तुलनेत 2017 वर्षांत घट.
– अपघातांसाठी 80 टक्के मानवी चुका कारणीभूत.
– ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण अधिक
– शहरी भागात अपघातांचे प्रमाण 27 टक्के
– ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण 73 टक्के.

– [email protected]