
राजेश पोवळे
नागोठणे गावाच्या सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक जीवनात काकासाहेब माने हे एक कार्यशील, निर्भीड आणि जनहितासाठी अखंड झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. साधी राहणी, स्पष्ट विचार आणि ठाम भूमिका हीच त्यांची खरी ओळख होती. त्यांच्या निधनाने नागोठणे गावाने समाजासाठी झटणारा मार्गदर्शक गमावला आहे.
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनाप्रमुखांच्या या झंझावाती विचारांचे वारे नागोठण्यातही पोहोचले. सदानंद धोंडू माने हा तरुण त्या काळी बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झाला आणि त्यांनी नागोठण्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करण्याचा ऐतिहासिक मान मिळवला. सदानंद माने शिवसेनाप्रमुखांच्या पहिल्या फळीतील शाखेचे पहिले शाखाप्रमुख बनले. नागोठण्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवताना त्यांनी पक्ष संघटन वाढवण्याबरोबरच जनतेचे प्रश्न, अन्याय आणि अडचणी यांना वाचा पह्डण्याचे कार्य प्रामाणिकपणे केले.
त्या काळात नागोठण्यात सातत्याने खंडित होणारा विद्युत पुरवठा हा जनतेसाठी ज्वलंत प्रश्न बनला होता. या प्रश्नाचे तीव्र पडसाद जनमानसात उमटत असताना काकासाहेब माने यांनी पुढाकार घेत भव्य मशाल मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चामुळे सत्ताधाऱयांना आणि प्रशासनाला खडबडून जाग आली. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही हे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले.
पुढे 1980च्या दशकात शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिह्यातील सर्वेसर्वा प्रभाकर भाऊ पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले. गावागावात फिरून त्यांनी शेकापची कार्यालये सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.
नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा आदर्श वस्तुपाठच घालून दिला. त्यांच्या या कार्यामुळे नागोठणेकर जनता त्यांना ‘काकासाहेब माने’ या नावाने ओळखू लागली. आपल्या प्रभागातील मूलभूत सुविधा, जनतेच्या गरजा आणि समस्या यांकडे त्यांनी नेहमीच गांभीर्याने पाहिले. केवळ पदासाठी नव्हे, तर जबाबदारी म्हणून त्यांनी लोकसेवा केली.
सडेतोड, परखड आणि स्पष्टवत्तेपणा हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता. कोणत्याही प्रश्नावर त्यांनी कधीही तडजोड केली नाही. मात्र या कठोरतेमागे प्रामाणिकपणा, न्यायभावना आणि माणसांना आपलेसे करून घेण्याची विलक्षण ताकद होती. त्यामुळेच विरोधकही त्यांच्या स्पष्ट भूमिकेचा आदर करत.
पांढराशुभ्र झब्बा, डोक्यावर गांधी टोपी आणि पांढराढगळ लेंगा परिधान करून काकासाहेबांची स्वारी नागोठण्यात फेरफटका मारायला निघाली की, पाचपन्नास माणसांचा गोतावळा जमत असे. हीच बाब त्यांच्या लोकप्रियतेची आणि जनतेतील निखळ विश्वासाची साक्ष देणारी होती.
वयाच्या 89व्या वर्षापर्यंत दीर्घायुष्य लाभलेले काकासाहेब माने अत्यंत कृतार्थ, समाजाभिमुख आणि प्रेरणादायी जीवन जगले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी समाजाशी आपली नाळ घट्ट ठेवली. काकासाहेब माने यांचे सामाजिक कार्य त्यांचे पुत्र पत्रकार महेंद्र माने यांनी अंगीकारले, तर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या कन्या सुप्रिया जाधव यांनी पुढे नेला आहे. काकासाहेबांच्या निधनाने नागोठण्याच्या जुन्या राजकीय, सामाजिक घडामोडींचा एक साक्षीदार हरपला आहे.



























































