हक्काचं रंगपीठ ‘प्रबोधन प्रयोगघर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजश्री पोतदार

मुंबईसारख्या अवाढव्य शहरात हौशी रंगकर्मींसाठी रंगपीठ उभं करण्याचं स्वप्न पाहिलं जातं आणि ते प्रबाधन प्रयोगघरच्या रूपात प्रत्यक्षात येतं. रंगकर्मी व लेखक-दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर आणि पल्लवी फाऊंडेशनचे भाऊ कोरगावकर यांच्या संकल्पनेतून आकारास आलेला हा मंच प्रायोगिक, हौशी आणि धडपडणाऱ्या रंगकर्मींना हक्काचं व्यासपीठ आहे.

2020 सालचा जानेवारी महिना उजाडला तेव्हा कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की, आपली पुढली दोनेक वर्षे एका वेगळ्याच वातावरणात जाणार आहेत. वातावरण हळूहळू बदलत गेलं आणि म्हणता म्हणता 2022 सालचा जानेवारी महिनाही उजाडला. परिस्थिती नियंत्रणात आलीय, पण तरीही भीतीची टांगती तलवार आहेच आहे. गेल्या पावणेदोन वर्षांत आपण खूप उलथापालथ पाहिली, अनुभवली, तिचे चटके सोसले, त्यातून उभेही राहिलो. सर्वच क्षेत्रांना या काळाचा फटका बसला, तसाच नाटकवाल्यांनाही बसला.

ज्यांचं पोट नाटकावर होतं, त्यापैकी अनेक जण दुसरीकडे वळले. अनेक जण नव्या काळाची वाट पाहत राहिले. आज ना उद्या वातावरण पुन्हा बदलणार होतंच, पण ते नक्की कधी हे कोणालाच सांगता येत नव्हतं. अशा वातावरणात मराठी रंगभूमी दिनाच्या मुहूर्तावर नाटकवाल्यांसाठी – त्यातही प्रायोगिक, हौशी रंगभूमीवर काम करणाऱया नाटकवाल्यांसाठी कुर्ल्यात-नेहरूनगरमध्ये एक हक्काचं रंगपीठ उभं राहिलं ‘प्रबोधन प्रयोगघर’ या नावानं…

या ‘प्रयोगघरा’ची संकल्पना होती सातत्याने काही ना काही नव्याच्या शोधात असलेला रंगकर्मी व लेखक-दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर यांची आणि त्यांच्या सोबत उभे राहिले राजकारणात असूनही समाजकारणाकडे अधिक लक्ष देणारे व त्यासाठी सदैव साथ देणारे पल्लवी फाऊंडेशनचे भाऊ कोरगावकर… नेहरू नगरसारख्या ऐन मध्यवर्ती ठिकाणी असलेला पल्लवी फाऊंडेशनचा सुमारे साडेसहाशे चौरस फुटांचा हॉल ‘‘उत्तम असं काय करता येईल या जागेत ते बघ’’ असं म्हणत भाऊंनी मोठ्या विश्वासाने श्रीनिवासच्या ताब्यात दिला आणि जवळपास तीस वर्षे नाटकात आणि चळवळस्वरूप कामात बुडालेल्या श्रीनिवासने सर्व रंगकर्मींच्या मनातली भावना नेमकी ओळखून ही ‘प्रयोगघरा’ची संकल्पना मांडली आणि त्याला ‘प्रबोधन प्रयोगघर’ हे नाव दिलं. मार्गदर्शनपर सूचनांसाठी सोबत उभे राहिले ज्येष्ठ दिग्दर्शक व संकलक विवेक देशपांडे, ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद लिमये, ज्येष्ठ रंगधर्मी आणि पत्रकार मित्र रजनीश राणे. श्रीनिवासच्या संकल्पनेतल्या या ‘प्रयोगघरा’ला दृश्यरूप दिले प्रसिध्द नेपथ्यकार सुनील देवळेकर यांनी. सुप्रिया चव्हाण या ‘प्रयोगघरा’च्या प्रसिध्दीची बाजू सांभाळतायेत, तर प्रसाद सावर्डेकर, नीलेश कोरगावकर, श्रेयस गावडे उत्तम रीतीने व्यवस्थापन बघतायेत. व्यावसायिक विचार न करता देविदास शिगवण यांनी या ठिकाणी लागणारी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.

या सर्वांच्या प्रयत्नांतून आज मुंबईसारख्या अवाढव्य शहरात हौशी, प्रायोगिक रंगकर्मींसाठी अत्यंत आवश्यक असलेलं एक हक्काचं रंगपीठ उभं राहिलं आणि त्याला उत्तम प्रतिसादही मिळतो आहे. प्रसिध्द लेखक-दिग्दर्शक-अभिनेते अतुल पेठे, रंगकर्मी मंगेश भिडे, रुपारेल महाविद्यालयाच्या माजी विभागप्रमुख प्रा. रोहिणी गोविलकर यांच्यासारखी अनेक माणसं ‘प्रयोगघर’ स्वयंपूर्ण होण्यासाठी सोबत उभी आहेत. व्यावसायिक नफ्या-तोटय़ाचा विचार न करता नाटकासाठी असं काहीतरी करण्याला हात देणारी भाऊ कोरगावकरांसारखी माणसं सर्वत्र उभी राहायला हवीत.

नाटकासाठी म्हणून हे रंगपीठ उभं करताना सर्वात महत्त्वाचा विचार केला गेला, तो ऍकॉस्टिक्सचा. या रंगमंचावर काम करताना माईक्सची गरज लागत नाही, पण रंगमंचावरचा श्वासही शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचतो, अशा पध्दतीने ऍकॉस्टिक्स केलं आहे. 16 बाय 10 चा रंगमंच आणि 50 आसनांची क्षमता ही किमान गरज या रंगपीठाने पूर्ण केली आहे. शिवाय या ठिकाणी असलेल्या 75 इंची टीव्ही मॉनिटरमुळे क्रीनिंगचीही सोय झाली आहे. किमान गरजांचं रंगपीठ कसं असावं, याचं ‘प्रबोधन प्रयोगघर’ हे उत्तम उदाहरण आहे.

मुंबईबाहेरच्या रंगकर्मींसाठी प्रयोग पालक योजना, रसिकांना सातत्याने काही नवं देऊ पाहणारी प्रेक्षक सभासद योजना यांसारख्या अनेक संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा या मंडळींचा प्रयत्न आहे. जसजसा याचा व्याप वाढत जाईल, तसतशा अनेक गोष्टी होत जातील हे नक्कीच.
कोरोना काळात उभ्या राहिलेल्या ‘प्रबोधन प्रयोगघरा’च्या या प्रयत्नांचा ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी नाशिकच्या साहित्य संमेलनामध्ये आवर्जून उल्लेख केला. शफाअत खान यांनीही अशा रंगपीठाची आवश्यकता व्यक्त करून या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. अनेकांनी या रंगपीठामध्ये प्रयोग, कार्यक्रम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गेल्या महिन्यात अतुल पेठे यांनी आपल्या ‘शब्दांची रोजनिशी’चा प्रयोग या ‘प्रयोगघरा’मध्ये केला, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. याच प्रयोगाला आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहीणी हट्टंगडी यांची याबद्दलची प्रतिक्रिया मनाला स्पर्श करून जाणारी आहे. त्या श्रीनिवासला म्हणाल्या, ‘‘आज काकडे काका असते तर नक्कीच खुश झाले असते.’’

खरंच, हे ‘प्रबोधन प्रयोगघर’ अरुण काकडे काकांनी पाहिलं असतं तर नक्कीच खुश झाले असते. प्रायोगिक, हौशी आणि धडपडणाऱ्या रंगकर्मींना हक्काचं व्यासपीठ मिळण्यासाठी काकडे काका अनेक वर्षे झगडत राहिले. त्यांची आणि प्रायोगिक रंगभूमीसाठी झटणाऱ्या सर्वांचीच आठवण म्हणून ‘प्रयोगघरा’त असलेल्या खिडक्यांच्या चौकटीत अरुण काकडे, विजय तेंडूलकर, गिरीश कर्नाड, रत्नाकर मतकरी यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत, या सर्वांचेच आशीर्वाद ‘प्रयोगघरा’च्या पाठीशी राहणार आहेत हे नक्की.