गोडवा जिलेबीचा

>> रश्मी वारंग

देशाचा 75वा स्वातंत्र्यदिन दिमाखात साजरा होत असताना या दिवसाशी नकळत जोडलेल्या पदार्थाची, अर्थात जिलेबीची ही वळणदार गोष्ट.

इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात पामिरियन सम्राटाचा खून झाल्यावर त्याची पत्नी डोनोबिया सत्तेत आली. तिने अनेक नवी शहरं वसवली. त्यातील दोन जुळी शहरं म्हणजे हलिबिया आणि झलबिया. याच काळात युफ्रेटिस नदीकाठी एका खानसाम्याने नवा प्रयोग करत आंबवलेल्या मैद्यात अंडी मिसळून कुरकुरीत जाळीदार बिस्किटे तयार केलीत. गोडव्यासाठी त्याने मधाचा वापर केला. आपल्या शहराच्या नावावरून या पदार्थाला त्याने नाव दिले झलबिया. तीच ही आपली आद्य जिलेबी.

त्यानंतर पर्शियन व्यापाऱ्यांमार्फत झलबिया आपल्या देशात प्रवेशकरती झाली. जिलेबी हिंदुस्थानसह पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश या देशांमध्येही चवीने खाल्ली जाते. मात्र आपल्या देशात शाकाहारी परंपरेत तिच्या पाककृतीत बदल झाले.

अरबीत ती झलबिया आहे. उर्दूत जिल्फी, पंजाबीत पश्तो, फारसीत झुल्बिया, बंगालीत जिलापी, सिंधीत सिंहल आणि हिंदी तसेच मराठीत जिलेबी.

15 व्या शतकात जैन लेखक जिनासूर यांनी श्रीमंत व्यापाऱ्याकडच्या मेजवानीत जिलेबी सदृश पदार्थाचे वर्णन जलवल्लिका आणि कुंडलिका असे केले आहे. नावे कोणतीही असोत, पण खवय्यांसाठी जिलेबी म्हणजे मिट्ट गोडवा.

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन यांच्याशी जिलेबी वेगळ्या नात्याने जोडली गेली आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली भागात स्वातंत्र्यदिनी 3-4 टन जिलेबी सहज फस्त होते. ही परंपरा कशी सुरू झाली? तो इतिहासही रंजक आहे.

राजर्षी शाहू महाराज प्रत्येक शाही समारंभात, सणासमारंभात जिलेबी वाटत असत. पंचम जॉर्ज यांच्या कोल्हापूर भेटीच्या वेळीसुद्धा शाहू महाराजांनी जिलेबी वाटली होती. तीच परंपरा पुढे नेली कुस्ती शौकीन हलवाई रामचंद्र बाबाजी माळकर यांनी. कोल्हापूर म्हणजे कुस्त्यांचे शहर. कोणत्याही पैलवानाने कुस्ती मारली की माळकरबाबा त्याचं तोंड जिलबीने गोड करत. ती एक परंपराच निर्माण झाली. जी स्वातंत्र्यदिनाशी जोडली गेली.

आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा साताऱ्यातील कृष्णा सीताराम राऊत यांनी जिलेबी वाटून आनंद साजरा केला, असा उल्लेख आढळतो. मग दरवर्षी लोक स्वातंत्र्यदिनाआधी राऊत यांना विचारू लागले, यावर्षी पण जिलेबी देणार ना? त्यानंतर साताऱ्यात स्वातंत्र्यदिन आणि जिलेबी वाटप ही परंपराच झाली.

जिलेबीचा घाट तसा कठीणच. कोमट पाणी, दही, मैदा हे मिश्रण आठवडाभर भिजवून ठेवावे लागते. त्याला मराठीत खंबीर लावणे असे म्हणतात. खंबीर उठणे म्हणजे नीट भिजवणे, आणि खंबीर बसणे म्हणजे मिश्रण मुरणे. हे खंबीर नीट धरले तरच साखरेचा पाक जिलेबी नीट शोषून घेऊ शकते. एकूण काय, तर जिलेबीचा प्रवास तिच्या रूपाइतकाच वाटोळा, गुंतागुंतीचा आहे. रबडी जिलेबी असा मिट्ट बेत असो किंवा मठ्ठा आणि जिलेबी असा अडनिडा बेत, जिलेबी आपल्याला भावते. जिभेला भरगच्च जेवणानंतरच्या गोडव्याची ओढ लागते. जिलेबीचा तुकडा तोंडात पडतो. आतल्या साखरेच्या पाकाचा गोडवा मुखासह हृदयापर्यंत पसरत जातो. आणि सगळे जग गोड, मधुर भासू लागते.