खाऊच्या गोष्टी – ख मं ग वडापाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी वारंग

अगदी काहीच दिवसांपूर्वी वडापाव दिन साजरा झाला. महाराष्ट्रात अशी अनेक मंडळी असतील ज्यांचा रोजच ‘वडापाव डे’ असतो. कारण मुंबईसारख्या शहरात अनेकांच्या दुपारच्या भुकेची सोय वडापाव करतो. अस्सल मराठमोळ्या इंडियन बर्गर वडापावची ही तितकीच खमंग कहाणी.

‘रुचिरा’ फेम कमलाबाई ओगले यांचं या वडापावशी जवळचं नातं आहे. कमलाबाई स्वतः नवनव्या पाककृती करून पाहणाऱया उत्तम सुगरण गृहिणी. एकेदिवशी पाहुणे येणार म्हणून बटाटय़ाची भाजी, पुरणपोळी असा साग्रसंगीत बेत जेवायला असताना त्यांना बटाटय़ाच्या भाजीवर प्रयोग करून पाहवासा वाटला. कमलाबाईंनी बटाटय़ाच्या भाजीचा गोळा भजीच्या पिठात बुडवून तळला. पाहुण्यांना हा नवा पदार्थ बेहद्द आवडल्याने नंतर त्यावर काही प्रयोग करून कमलाबाई हा पदार्थ विकू लागल्या. हाच आपला लाडका बटाटेवडा.

या बटाटेवडय़ाला लोकप्रिय करण्याचं श्रेय मात्र अशोक वैद्य यांचं. 1966 चा तो काळ म्हणजे मुंबापुरी गिरण्यांनी गजबजण्याचा काळ. अशा गिरणी कामगारांसाठी नाश्त्याची सोय व्हावी म्हणून अशोक वैद्य यांनी दादर स्टेशनबाहेर पदार्थ विकायला सुरुवात केली. त्यात बटाटेवडादेखील होता. ऑमलेट पाव हा त्याकाळी देखील चवीने खाल्ला जाई. पावाची हीच साथ त्यांनी बटाटेवडय़ाला दिली आणि वडापावची सुपरहिट जोडी जन्माला आली.

या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचं योगदान तितकंच महत्त्वाचं. पण मुंबईची झणझणीत ओळख ठरलेल्या वडापावला गल्लोगल्ली पोहचवण्याचं श्रेय माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचंच.

गिरण्यांच्या संपामध्ये बेरोजगारीने हताश झालेल्या कामगाराला धीर देत वडापाव गाडी सुरू करून व्यवसायात उतरण्याची हिंमत बाळासाहेबांनी दिली. शिव वडापावच्या गाडय़ांनी फक्त मुंबईकरांच्या जिभेचे चोचले पुरवले नाहीत तर अनेकांचे संसार सावरले.

आपल्या देशात स्नॅक्सच्या सोज्वळ घरगुती संकल्पनेत झणझणीत वडापावची एन्ट्री खास आहे. मुळात वडापाव हा काही घरच्या घरी रोज होणारा पदार्थ नाही. अस्सल स्ट्रीट फूडचा किताब वडापाव दिमाखात मिरवतो. केवळ मुंबई, महाराष्ट्र, देशभरापुरता नाही तर वडापाव परदेशातही तितकाच लोकप्रिय आहे. जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरपासून अनेक नामवंत मंडळी त्यांच्या डाएटच्या चाकोरीतून बाहेर येत मुक्तपंठाने वडापावचं कौतुक करतात.

रस्त्यावर मिळणारा गाडीवरचा मस्त तिखटजाळ वडापाव ते घरी तयार होणार सोज्वळ वडापाव, मॉलच्या चकचकीत दुकानापासून रेल्वे स्टेशनपर्यंत कुठेही दिमाखात तो संचार करतो हे खास.

उकळलेल्या तेलातून सचैल न्हाऊन हा वडापाव तिखट-गोड चटणीने नटलेल्या पावाच्या गादीवर विराजमान होतो तेव्हा त्याला स्ट्रीट फूडचा राजा का म्हणतात ते उमगते. वडापावमधला मिरचीचा ठसका, लसणीचा तडका आपली कमाल दाखवत काही वेळा नाकातोंडातून पाणी काढतो. पण तरी जिभेवरच्या गरमागरम अग्नितांडवातही ते डोळ्यातलं पाणी आनंदाश्रूत बदलते. वडापाव खाऊन संपला तरी बराच काळ त्याचा स्वाद जिभेला पकडून राहतो. अगदी जीवलग दोस्तासारखा.