साहित्य जगत- आठवणींचा ओघ

 

>> रविप्रकाश काकर्णी 

 

स्मरणात खरोखर जग जगते 

म्हणूनच म्हटले जाते जोवर आहे स्मरण 

त्याला कसले आहे मरण? 

या स्मरणालाही किती अंगोपांग असतात. आता बघा ना, शोमॅन म्हणून ज्याचा गवगवा झाला त्या राज कपूरची आता जन्मशताब्दी आहे. (जन्म 14/12/1924) त्याची दखल त्यांच्या कुटुंबीयांपेक्षाही त्याच्या चाहत्यांनी जास्त घेतलेली दिसते. अशांपैकी एक म्हणजे स्वरमुग्धा आर्टस्चे प्राध्यापक कृष्णकुमार गावंड, श्रीकांत कुलकर्णी आणि आदित्य खेर. ही मंडळी ऑर्केस्ट्राच्या जगतात जानीमानी अशीच आहेत  आणि शंकर-जयकिशन यांच्या प्रेमात आकंठ बुडलेली आहेत. या-ना-त्या पद्धतीने ते त्यांचे स्मरण सदैव करत असतात. पण या मंडळींचे एक दुखरेपण होते की, एकेकाळचे हिंदी चित्रपट संगीताचे अनभिषिक्त सम्राट शंकर-जयकिशन यांच्या नावाने संगीताच्या दुनियेत एकही पुरस्कार नाही. त्या दृष्टीने त्यांनी तसा प्रयत्नही करून पाहिला. पण त्यांना हवे तसे यश आले नाही.  असे जरी असले तरी कृष्णकुमार गावंड आणि मंडळी त्यांच्या परीने प्रयत्न करत राहिले. त्याचेच फळ म्हणजे आता स्वरमुग्धा आर्टस्तर्फे त्यांनी शंकर-जयकिशन पुरस्कार सुरू केले असून त्याचे पहिले मानकरी शंकर-जयकिशनकडे सर्वात जास्त म्हणजे 514 गाणी लिहिणारे हसरत जयपुरी हे आहेत.

राज कपूर यांची टीम म्हणजे संगीतकार शंकर-जयकिशन, गीतकार हसरत जयपुरी व शैलेंद्र, गायक मुकेश, लता मंगेशकर आदी. यामध्ये सर्वात ज्येष्ठ हसरत जयपुरी (जन्म 15/4/1922) म्हणून त्यांना पहिला शंकर-जयकिशन पुरस्कार दिला जात आहे. मरणोत्तर म्हणून का होईना हसरत यांची बूज राखली जात आहे ही चांगलीच गोष्ट आहे. हसरत यांचे चिरंजीव अख्तर जयपुरी हा पुरस्कार स्वीकारतील.

अर्थात यानिमित्ताने स्वरमुग्धा आर्टस्तर्फे `तुम्हे याद करते करते’ हा दृकश्राव्य कार्पाम आणि त्याच्या जोडीला अर्थातच वाद्यवृंद असणार आहे.

राज कपूर टीममधील अनेक मंडळी कधी ना कधी पडद्यावर झळकलेली आहेत. उदाहरणार्थ जयकिशन `श्री 420’मध्ये आणि शैलेंद्र `बूट पॉलिश’मध्ये चक्क गाताना दिसले आहेत. पण संगीतकार शंकर आणि गीतकार हसरत जयपुरी चित्रपटाच्या पडद्यावर पाहिलेले आठवतात?

`आग’ चित्रपटात `देख चांद की ओर मुसाफिर…’ या गाण्यात शंकर दिसले, तर हसरत जयपुरी व्ही. शांताराम यांच्या `तुफान और दिया’ मधल्या एका दृश्यात डॉक्टरच्या भूमिकेत दिसले. यासंदर्भात कोणी सांगितलेले, लिहिलेले दिसत नाही.

`तुम्हे याद करते करते…’ या कार्पामात ही दृश्ये दाखवून वातावरण निर्मिती गहरी करता येईल. बाकी राज कपूर कॅम्प, हसरत, शैलेंद्र यांच्याबद्दल कृष्णकुमार गावंड यांना किती सांगू आणि किती नको असे होऊन जाणार आहे.

`तेरी प्यारी प्यारी सुरत को किसी की नजर ना लगे’ हे  `ससुराल’ चित्रपटातल्या गाण्याचा मुखडा हसरत यांना त्यांचा रांगता मुलगा अख्तरा पाहून सुचला होता. आता हाच मुलगा आर्किटेक्ट झालेला आहे आणि तोच हसरत यांना मिळालेला पहिला शंकर-जयकिशन पुरस्कार स्वीकारायला जातीने हजर राहणार आहे.

एक आठवण सांगतो. पुण्यात लक्ष्मीकांत प्यारेलाल नाईट होती. त्याच्या तिकीट पीसाठी अमीन सयानी, मोहम्मद रफीदेखील आले होते. शेवटचे तिकीट दहा रुपये होते. तरीदेखील मोठी रांग लागली होती. एका चाहत्याकडे त्याच्याकडे पैसे नव्हते. तो मोहम्मद रफीचा हात हातात घेण्यासाठी आला होता. तिथे असलेल्या रफीने त्या चाहत्याशी मनपूर्वक शेकहॅन्ड केल्यावर तो धीर एकवटून म्हणा, “रफी साहेब, एखादं गाणं म्हणून दाखवा ना?” तेव्हा रफी म्हणाले, “अरे इथे ना साथा संगीत ना हार्मोनियम. मी कसं म्हणणार गाणं?”

तेव्हा तो चाहता चिकाटीने म्हणाला, “तसंच म्हणा की…” तेव्हा रफी साहेबांनी कुठलेही आढेवेढे न घेता गाण्याचा मुखडा म्हटला. ते गाणे होते `बहारो फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है…’ चित्रपट “सूरज” गीतकार हसरत जयपुरी आणि शंकर-जयकिशन यांनी ते स्वरबद्ध केलेले होते.

हा चाहता म्हणजे म्हणजे पुढे चित्रपटविषयक भरपूर लिखाण करणारा, पुस्तक प्रकाशित करणारा लेखक सुभाषचंद्र जाधव. ज्याने हसरतच्या गाण्यासंबंधात स्वतंत्र पुस्तक लिहिले आहे. आठवणींचे असेच असते. `तुम्हे याद करते करते’ कार्पामाच्या वेळी असाच अनुभव येईल हे काय वेगळे सांगायला पाहिजे?