निसर्ग… कविता… विनोद!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रोहिणी निनावे

राजेश देशपांडे. लहानपणी निसर्गाच्या… सोबत कोणीही नसण्याच्या संस्कारातून अभिव्यक्ती… लेखणी तेव्हाच परिपक्व झाली!

दिग्दर्शकांना भेटून त्यांच्याशी बातचीत करून मला बऱ्याच गोष्टी कळताहेत, यावेळेस जरा वेगळ्या पठडीमध्ये काम करणाऱ्या दिग्दर्शकाची भेट घ्यायचं ठरवलं. ‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’ या मालिकेचे लेखक आणि दिग्दर्शक राजेश देशपांडे यांना भेटायचं ठरवलं.

राजेश देशपांडेला मी खूप वर्षांपासून ओळखते. सुरुवातीला जेव्हा ‘मृण्मयी’ ही मालिका लिहित होते, तेव्हा राजेश त्या मालिकेमध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. राजेशने अधिक लेखन विनोदी पठडीमध्ये केले आहे. इंडस्ट्रीमध्ये आम्ही खूपदा पार्टीजमध्ये वगैरे भेटतो, पण प्रत्यक्ष बोलणं क्वचित होतं. आज अशीच राजेशशी निवांत बोलायची संधी या सदरामुळे आली.

बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात राजेशच्या ‘होते कुरूप वेडे’ या नाटकाचा प्रयोग होता. आम्ही बोलायला सुरुवात केली. राजेश सांगायला लागला… आईवडील ध्येयवादी होते. गावा गावात फिरून शाळा काढायचे. अनुदान मिळत नव्हतं. पैशांची आवक नव्हती. बालपण संघर्षात गेलं. मजा नाही घेता आली. मी शेतीची काम करायचो. गुरं राखायला जायचो. निसर्गाच्या सानिध्यात मी आत्ममग्न व्हायचो. घरात टीव्ही नव्हता. वर्तमानपत्रही 10-15 दिवसांनी एकत्र यायची. त्यामुळे जगाची माहिती रोजच्या रोज कळायची नाही. पण रेडिओवर गाणी, बातम्या, कॉमेंट्री ऐकायचो. पण दिसत काही नव्हतं, त्यामुळे कल्पना करायचो की हे कसं असेल. मग मी इमॅजिन करायला लागलो. मग कवितांच्या स्वरूपात व्यक्त व्हायला लागलो. मला तेव्हा एक विचित्र छंद होता. मी दोन चमचे घेऊन त्यांना दोन माणसं समजून दोन व्यक्ती समजून तास न तास गप्पा मारत बसायचो. मी मनातलं कवितांच्या स्वरूपात उतरवायला लागलो.

वडील राष्ट्रीय कलापथकात काम करायचे. मोठमोठय़ा कलावंतांशी त्यांचा संबंध आला होता. ‘विच्छा माझी पुरी करा’च्या वेळेस दादा कोंडकेंनीच वडिलांना सांगितलं, की आधी शिक्षण पूर्ण कर मग या क्षेत्रात ये, वडील पुन्हा परत आले. नंतर मात्र त्यांना त्यांची आवड जपता आली नाही. मी म्हटलं ती आज तुझ्या रूपाने पूर्ण झाली. राजेश म्हणाला, मी या बेभरवशाच्या क्षेत्रात आलो, पण मला घरून आधी आईचा आणि नंतर बायकोचाही सपोर्ट मिळाला. मला आधीपासूनच या क्षेत्रात यायचं होतं. आई वडिलांनी मला सांगितलं होतं की स्वप्न बघायचीच असतील तर मोठी बघ. मुंबईमध्ये आलो. सुधा करमरकरांचं नाटय़ शिबीर केलं. त्यामुळे मला आत्मविश्वास आला. त्यानंतर मला पहिलं काम मिळालं ते ‘झुलवा’ या नाटकात गर्दीमध्ये उभं राहण्याचं. या क्षेत्रात प्रस्थापित होणं कठीण होतं. कारण कुठलंच पाठबळ नव्हतं. मग ‘कोपरखळी’, ‘पुन्हा पुन्हा प्रपंच’ वगैरे मालिकांसाठी लिहायची संधी मिळाली.

पण अभिनय सुरूच होता. नाटकामध्ये मला पहिली संधी मिळाली ‘हे वयच असं असतं’ या वीरेंद्र प्रधानच्या नाटकामध्ये! त्यांनतर ‘कमाल कसली धमाल’ हा फार्स केला. आत्माराम भेंडेंच्या दिग्दर्शनाखाली काम करायला मिळालं. नंतर देवेंद्र पेमच्या ‘ऑल द बेस्ट’मध्ये वर्षभर काम केलं. या नाटकाने मला खूप शिकवलं. मग ‘आम्ही आलो रे’ हे व्यावसायिक नाटक लिहिलं, त्यात कामही केलं.

त्याच दरम्यान विद्याधर पाठारेंचा फोन आला मला की एक मालिका करायची आहे. एक पुस्तक विकत घेऊ मग सांगतो. आम्ही आयडियलला जात होतो. वाटेत मी त्यांना ‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’ची आयडिया सांगितली. ती त्यांना एवढी आवडली की ते म्हणाले हेच करू या. पुस्तक आणायची गरज नाही. पुढे ही मालिका किती लोकप्रिय झाली, ते तुला माहीतच आहे. ही व्यक्तिरेखा खूप आधीपासूनच डोक्यात होती. त्याबरोबर मग ‘छू’पण आला. लोकांना या दोन्ही व्यक्तिरेखा खूप आवडल्या. या मालिकेमध्ये सामाजिक आणि राजकीय विषयावर खूपच ओपनली भाष्य केल्या जायचं. आजच्यासारखी लेखनावर तेव्हा बंदी नव्हती. अगदी नावासकट कोटय़ा करता यायच्या. अनेक प्रसिद्ध नेते मंडळी ही मालिका बघायचे. ही मालिका 6 वर्षे चालली.

आपल्यात विनोदाचं अंग आहे याची जाणीव कधी झाली? राजेश म्हणाला, उपजतच होती ती… स्वभावात एक प्रकारचा तिरकसपणा होता. बरेचदा अशा तिरकस विचार करण्याच्या वृत्तीतूनही विनोद निर्माण होतो. पुढे काम करायला लागल्यावर उपजतच असलेल्या या माझ्या विनोदबुद्धीची मला जाणीव झाली.

मी म्हटलं विनोदी नाटक बसवणं हे दिग्दर्शकासाठीही जिकिरीचं असणार. राजेश म्हणाला, हो एनर्जी हवी एकूणच वातावरणात. कलाकारांच्या हालचालीमध्ये. रंगमंचाचा पुरेपूर उपयोग हवा. सतत रंगमंचावर हालचाल हवी. कुठेही प्रयोग सैल पडता कामा नये. मराठी प्रेक्षकांची नस कळायला हवी. अनेकदा काही कलाकार अपेक्षित विनोदनिर्मिती करू शकत नाहीत किंवा मूळ संहितेमध्ये विनोद नसतो, अशावेळी दिग्दर्शकाची जबाबदारी वाढते. विनोद शोधून काढावा लागतो.

मी म्हटलं, विनोदाचं स्वरूप बदलत्या काळाप्रमाणे बदलत चाललं आहे असं तुला वाटतं का? की आज फक्त फार्सिकल हालचाली, पांचट विनोद, अंगविक्षेप यावरच विनोदी नाटकं चालतात असं वाटतं तुला? राजेश म्हणाला, नाही… मराठी प्रेक्षकांना दर्जेदार कलाकृतीचं बघायला आवडतात, त्यामुळे विनोद ही दर्जेदार असेल तरच तो रुचतो. दर्जा ही संकल्पना सापेक्ष आहे, त्यामुळे त्यावर भाष्य करता येत नाही. चांगलं तेच चालणार!

मी म्हटलं ‘धुडगूस’ चित्रपट कसा मिळाला? राजेश म्हणाला, गिरीश साळवीनी हे प्रपोजल आणलं.

सुदैवाने चांगला प्रोडय़ूसरही मिळाला. मी लेखन दिग्दर्शन केलं. संजय जाधवसारखा सिनेमॅटोग्राफर होता. मोठं मोठे कलाकार फक्त स्क्रिप्ट वाचून चार ओळी बोलायलाही तयार झाले. 21 नोव्हेंबरला सिनेमा प्रदर्शित झाला. चांगला चालू होता सिनेमा. पण नंतर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि चित्रपटावरही परिणाम झाला. मला बक्षिसं खूप मिळाली. पण चित्रपट न चालल्याने चित्रपट दिग्दर्शक म्हणून माझ्या कारकीर्दीला खीळ बसली.

मी विचारलं, येथे टिकून राहण्यासाठी तुला काही संघर्ष करावा लागला का मग? राजेश म्हणाला नाही, मला कुठल्याही राजकारणाचा त्रास झाला नाही. म्हणजे मी करूनच घेत नाही. मी सगळ्या गोष्टींकडे पॉझिटीव्हली बघतो. कुणी काही म्हटलं तरी त्यातून मला मोठं काम करण्याची ऊर्जा मिळते.

मी म्हटलं आणि काही चांगला अनुभव? राजेश म्हणाला, एकदा एक मुलगी स्ट्रेचरवर नाटक बघायला आली होती. ती अंध होती. तिला फक्त ऐकू येत होतं. तरी म्हणाली, मी तुमची मालिका रोज ऐकते. खूप मजा येते. म्हणून नाटक ऐकायला आले आहे. मला अगदी भरून आलं.

मी विचारलं, ब्लॅक कॉमेडीसाठी काही वेगळा विचार करावा लागतो का? तेव्हा राजेश म्हणाला, विषय गंभीरच असतो, पण त्याची मांडणी विनोदी पद्धतीने करावी लागते. काळजीपूर्वक… त्याचे हसे होणार नाही आणि ते हास्यास्पद होणार नाही! समतोल साधावा लागतो. खूप वेगळ्या पद्धतीने ते लोकांपुढे मांडावं लागतं, जे ‘धुडगुस’मध्ये केलं.

मी म्हटलं, एक उत्तम दिग्दर्शक होण्यासाठी त्याने लेखक असणंही गरजेचं असतं का? तेव्हा राजेश म्हणाला, प्रत्येक लेखकाला दिग्दर्शनाची आणि प्रत्येक दिग्दर्शकाला लेखनाची जाण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय तो कन्टेन्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूच शकत नाही.

विनोदाला हवा तसा दर्जा मिळत नाही असं वाटत का तुला? मी विचारलं, राजेश म्हणाला, निःसंशय! विनोदी नाटकांसाठी फार पुरस्कार नाहीत. विनोदी विषयावरच्या निर्मितीला फार कॅज्युअली घेतलं जातं. खरं तर विनोद निर्मिती करणं हे खूप कठीण असतं. विनोदी कलाकृतींना दर्जा आणि मान मिळायला हवा!

प्रयोगाची वेळ आली होती. दुसरी घंटा झाली होती. मला प्रयोगही बघायचा होता .. तेव्हा आम्ही आमची बातचीत आवरती घेतली. ‘होते कुरूप वेडे’ हे नाटकही खूप चांगल्या विषयावरचं आहे. त्यासाठी राजेशला शुभेच्छा दिल्या.

– [email protected]