मंथन – होमस्कूलिंग बंधमुक्त शिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ऋतुराज पत्की

एक दिवस मी आणि माझी पत्नी आमच्या मुलीच्या शाळेतील प्रवेशाबाबत चर्चा करत होतो. आम्ही अनेक शाळाही फिरून आलो. खरं तर मी आणि नीलिमा, आम्ही दोघंही आमच्या शालेय आयुष्यात एक उत्तम विद्यार्थीदशा जगलो होतो. मी पैठणला (जायकवाडी) तर नीलिमाने कोकणातील हेदवीला शालेय शिक्षणाचा श्रीगणेशा केला होता. आम्हाला आमच्या शालेय जीवनात मिळालं तेच जान्हवीलाही मिळावं अशी पालक म्हणून आमची मनापासून इच्छा होती आणि आम्ही पाहिल्यापैकी कुठलीही शाळा आमची ही इच्छा पूर्ण करू शकेल असं वाटत नव्हतं. किंबहुना, शाळेपेक्षाही प्रस्थापित ‘शालेय पध्दत’ आमच्या लहानपणी होती त्यापेक्षा खूप बदललेली आम्हाला दिसली. अनेक सुखसुविधांनी युक्त अशा या ‘स्कूल्स’ माझ्या मुलीला मूल्यवर्धित शिक्षण देऊ शकतील असं कुठलंही आशावादी दृश्य न दिसल्याने अखेर, आम्ही दोघांनी पालक म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा ठरवला ः ‘आपण जान्हवीला शाळेत पाठवायचं नाही; उलट तिला शाळेला समांतर असं मूल्यवर्धित शिक्षण द्यायचं.’

हा निर्णय अवघड होता, आव्हानात्मकही. पण आम्ही तो घेतला आणि त्यानंतर आज पहिली ते दहावी कधीही शाळेत न जाता 10 वर्षांचं होमस्कूलिंग पूर्ण करून मेन स्ट्रीम एज्युकेशन सिस्टममध्ये 11 वी – 12 वी उत्तम प्रावीण्याने पूर्ण करून डिग्री कॉलेजमध्ये मोठय़ा आत्मविश्वासाने प्रवेश करणारी जान्हवी पाहिली की मागे वळून पाहताना त्या दिवशी घेतलेल्या निर्णयाचं सार्थक झाल्याचा आनंद मन भरून राहतो आणि तिची प्रगती पाहून तिचा ‘होमस्कूलर बाबा’ या नात्याने खूप समाधान वाटतं.

कोविडकाळात इतर क्षेत्रांबरोबरच आणखी एका क्षेत्राचं फार मोठं नुकसान झालं, ते म्हणजे ‘शिक्षण.’ शाळा, कॉलेजेस बंद झाली. शाळेची सवय जडलेल्या मुलांना, पालकांना आणि शिक्षकांनाही ‘ऑनलाइन शिक्षण’ या एका नवीन माध्यमाशी जुळवत शिक्षणाचं चक्र फिरतं ठेवण्याचं आव्हान स्वीकारावं लागलं आणि अनेक पालकांच्या मनात ‘होमस्कूलिंग’बद्दल जिज्ञासा निर्माण झाली. अशा काही पालकांशी मला बोलण्याची संधी मिळाली, तेव्हा एक गोष्ट सतत जाणवत होती की या सगळ्यांच्या मनात ‘होमस्कूलिंग’ची एक भलतीच प्रतिमा, गैरसमज आहेत. अशामध्ये जर यांनी होमस्कूलिंग नामक शिवधनुष्य उचलण्याचा घाट घातला तर विपर्यास होईल. म्हणूनच या लेखाचं प्रयोजन!

कोविड काळातील ‘ऑनलाइन स्कूलिंग’मुळे अनेक पालकांना असं वाटू लागलंय की आपली मुलं आता घरातून ‘ऑनलाइन’ शिकण्यासाठी सरावली आहेत. याचा अर्थ आपण त्यांचं ‘होमस्कूलिंग’ नक्कीच करू शकतो. इथे एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की, ‘होमस्कूलिंग’ आणि ‘ऑनलाइन स्कूलिंग’ या दोन भिन्न संकल्पना आहेत. ‘होमस्कूलिंग’ म्हणजे ‘स्कूल-होम’ नाही. ‘होमस्कूलिंग’ म्हणजे ‘स्वयंशिक्षण.’ इथे ‘स्वयं’ म्हणजे ‘स्वयंस्फूर्ती’ आणि ‘शिक्षण’ म्हणजे ‘मूल्यवर्धित शिक्षण.’ होमस्कूलिंग हा एक बंधमुक्त शिक्षणाचा मार्ग आहे. या शिक्षणात शाळेत असतात तशी कुठलीही बंधनं अपेक्षित नाहीत. आमच्या होमस्कूलिंगच्या उदाहरणातून सांगायचं तर आम्ही जान्हवीला ती वयानुसार आठवीत येईपर्यंत कुठला विशिष्ट सिलॅबसदेखील ठरवून घेतला नव्हता. अमुक वेळात तमुक धडे पूर्ण करायचे असं कुठलंही बंधन नव्हतं आणि याबरोबरच ‘माका&ंची परीक्षा’ही नव्हती. जाह्नवीने तिच्या आयुष्यात फॉर्मल परीक्षा अशी जर कुठली दिली असेल तर ती केवळ पाचवीची आणि त्यानंतर थेट दहावी स्टेट बोर्डाची, तीदेखील कुठल्याही शाळेत प्रवेश न घेता. दरम्यानच्या वर्षांमध्ये आम्ही प्रात्यक्षिकांवर आधारित स्किल डेव्हलपमेण्ट एज्युकेशनवर भर दिला. एपंदर व्यक्तिमत्त्व विकास पेंद्रस्थानी ठेवून जिज्ञासेच्या प्रवाहात स्वतःला ‘बंधमुक्त’ प्रवाही करून शिकण्याचा आनंद घेत शिकत जाणं म्हणजे ‘होमस्कूलिंग.’ होमस्कूलिंगमध्ये एखादी गोष्ट मनापासून शिकण्यासाठी आवश्यक असा ठहराव आहे. इथे मुलांना एखाद्या विषयामध्ये रुची असल्यास त्या विषयाबरोबर अधिक काळ थांबण्याचं स्वातंत्र्य आहे.

कोविड काळातल्या ‘ऑनलाइन लार्ंनग’मध्ये खरं तर केवळ माध्यम बदललं. बाकी सगळी पध्दत, विचारसरणी आणि व्यवस्था नेहमीच्या शाळेचीच. त्यामुळे ‘ऑनलाइन लार्ंनग’ म्हणजे ‘होमस्कूलिंग’ नव्हे ही बाब एव्हाना आपल्या लक्षात आली असेल. तुम्हाला जर आमच्यासारखं शाळेला पूर्णतः नमस्कार ठोकून होमस्कूलिंग करायचं नसेल, पण या शालेय पद्धतीपेक्षा काहीतरी वेगळं हवं असेल, तर एक मध्यम मार्ग आहे, ज्याला ‘ओपन स्कूलिंग’ असं म्हणतात. इथे तुम्ही शाळेप्रमाणेच एक विशिष्ट सिलॅबसचं अनुसरण करत दरवर्षी परीक्षा देत पुढील वर्षात पदार्पण करता. मात्र, लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, यात मुलांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी ‘होमस्कूलिंग’ पध्दतीप्रमाणेच केवळ पालकांवर असते. ‘ऑनलाइन लार्ंनग’मध्ये शाळेतले शिक्षक व्हिडीओ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुलांना शिकवतात तसे इथे कुठलेही शिक्षक नाहीत. पालकांनी यासाठी काही विषयांसाठी टय़ुशन क्लासेस लावायचे ठरवल्यास तो पालकांचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो आणि असं करायला काहीच हरकतही नाही; मात्र यातून आपण पुन्हा शाळेचीच विचारसरणी जोपासत नाहीये ना याचाही पडताळा घ्यावा. स्वानुभवातून नक्कीच सांगेन की होमस्कूलिंग असो अथवा ओपन स्कूलिंग, पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वेळ देता येणं नितांत आवश्यक आहे यात शंकाच नाही. तेव्हा आपल्या मुलांसाठी होमस्कूलिंगचा विचार करताना आपल्या मुलांच्या शिक्षणावरून एक पालक म्हणून आपल्या असलेल्या अपेक्षा, आणि त्यासाठी आपण आपली शेडय़ुल्स सांभाळून काय आणि किती करू शकतो याबाबतच्या आपल्या क्षमता व मर्यादा जरूर तपासून पाहव्या आणि मगच निर्णय करावा.

आमच्या होमस्कूलिंगमध्ये मी माझ्या मुलीला, जान्हवीला माझ्या बिझनेस मीटिंग्जना घेऊन जात असे. हळूहळू तिला मीटिंगचे मिनीट्स कसे लिहायचे हे शिकवलं. याचा तिला तिच्या अभ्यासात नोट्स काढण्यासाठी फार मोठा उपयोग झाला. ती यातून ‘माणसं वाचायला’ शिकली. शाळेच्या वेळेचं बंधन नसल्याने अतिशय लहान वयात तिने रेडिओ जॉकीचा कोर्स केला आणि एका स्थानिक एफएम रेडिओवर त्या कोर्समधली सर्वात लहान वयाची आरजे होण्याचा मान आणि त्याहून कितीतरी मोठा आनंद तिने मिळवला. यातून तिच्या वत्तृत्वालाही पैलू पडले आणि विषयाची मुद्देसुद मांडणी करण्याचे संस्कारही घडले. चित्रकला, पॅलिग्राफी, विविधं ऐतिहासिक स्थळांना भेट देत तिथला भूगोल आणि इतिहास शिकणं हे सारं तिने तिच्या आवडीने केलं. केवळ एक एक इयत्ता पास करत जाणारी विद्यार्थिनी न बनता यातून तिचं एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व घडायला मदत झाली.

होमस्कूलिंगला पूर्णतः सरकार मान्यता आहे. आम्ही आमच्या मुलीला कधीही शाळेत न पाठवता दहावीच्या परीक्षेला बसवू शकलो हे याचंच उदाहरण. दहावी पूर्ण झाल्यावर जाह्नवीची 11वीची अॅडमिशन शाळा करून आलेल्या इतर विद्यार्थ्यांबरोबरच तिच्या मेरिटच्या जोरावर मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये झाली. होमस्कूलिंग करून मेन स्ट्रीम एज्युकेशन सिस्टममध्ये प्रवेश घेताना आम्हाला ती केवळ होमस्कूलर आहे म्हणून नियमांच्या चौकटीत कुठलाही अडथळा आला नाही. इथे तिने इंटरकॉलेज इव्हेंट्समध्ये कॉलेजला रिप्रेझेंट तर केलं आणि खूप कमी काळात होमस्कूलिंगमुळे ‘ग्रुपीजम’ माहीतच नसलेली निर्मळ मनाची जाह्नवी सगळ्यांचीच लाडकी झाली.

या लेखाचा समारोप करताना इतपंच म्हणेन की, होमस्कूलिंग असो अथवा ओपन स्कूलिंग असो, मुलांना मूल्यवर्धित शिक्षण मिळावं हीच एकमेव अपेक्षा; कारण आपल्या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षणातून केवळ डिग्रीचे विषय माहित असलेले साक्षर घडून उपयोगी नाही, तर स्वतःचा विचार करू शकणारे प्रज्ञावान विचारवंत घडण्याची आवश्यकता आहे. याच एका कारणासाठी आम्ही होमस्कूलिंगचा मार्ग स्वीकारला. होमस्कूलिंग ही शिकण्याची एक केवळ बंधमुक्त पध्दत नसून, होमस्कूलिंग ही एक विचारसरणी आहे; शिक्षणाच्या माध्यमातून उद्याचे उत्तम विचारवंत नागरिक घडवणारी एक स्वतंत्र विचारसरणी.

कोरोनाकाळात शिक्षणाचं चक्र फिरतं ठेवण्यासाठी ऑनलाईन माध्यमाचा वापर सुरू झाला आणि अनेक पालकांच्या मनात होमस्कूलिंगबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. दहा वर्ष आपल्या मुलीचं होमस्कूलिंग करतानाचा अनुभव मांडणाऱया या लेखातून या संकल्पनेची व्याप्ती आणि त्यासाठीची योग्य तयारी याबाबत निश्चितच मार्गदर्शन मिळेल.

होमस्कूलिंगचे अनेक फायदे आहेत, जे शालेय पध्दतीमध्ये नक्कीच नाहीत. मुलांना आपल्या आवडीनुसार शिकण्याची मुभा होमस्कूलिंगमध्ये आहे. खेळातील, कलेतील प्रावीण्यासाठी मुलं हवा तितका वेळ देऊ शकतात. शालेय अभ्यासक्रमाचं आणि वेळेचं कुठलंही अकारण बंधन नसल्याने आपली आवड मनसोक्त जोपासण्यापासून त्यांना थोपवू शकत नाही. याबरोबरच एक फायदा आहे जो केवळ होमस्कूलिंगमध्ये आहे तो म्हणजे मुलांच्या आकलनाच्या वेगानुसार ते एक एक विषय पादाक्रांत करत पुढे जाऊ शकतात. समजा एखाद्याला गणितात उत्तम प्रावीण्य असेल तर पाचवीचं गणित संपवून त्याच शैक्षणिक वर्षात सहावीच्या गणिताला सुरुवात करू शकतो आणि विज्ञानात काही गोष्टी समजायला अवघड वाटत असतील तर तो विद्यार्थी घाई न करता थोडा अधिक वेळ घेऊन तो विषय आपल्या आकलनाच्या गतीने पूर्ण करू शकतो. यात शिकण्यातली रंजकता टिकून राहते आणि जिज्ञासाही. मनात विषयाची अकारण भीती बसत नाही. शिवाय आपण पालक आपल्या मुलांना इतरही अनेक गोष्टी शिकवू शकतो; आणि हेच ते मूल्यवर्धित शिक्षण जे होमस्कूलिंगचा आत्मा आहे असं म्हणेन मी.

(लेखक सॉफ्टवेअर व्यावसायिक आणि
शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत)
n [email protected]