परीक्षण : झपाटणारी ‘शब्दाटकी’

>> साबीर सोलापुरी

नांदेड जिह्यातील तरोडा येथील हरहुन्नरी गझलकार जयराम धोंगडे हे त्यांचा ‘शब्दाटकी’ हा गझलसंग्रह घेऊन गझल रसिकांच्या दरबारात सामील होताहेत.
गझलकार जयराम धोंगडे यांच्या अनुभवविश्वाचा परीघ विस्तीर्ण आहे. त्यामुळेच त्यांनी गझल ही विधा पसंत केलीय हे स्पष्ट आहे. त्यांच्या बराचशा गझलांमधून ही बाब प्रकर्षानं समोर येते. शब्दांना मोजकेपणानं सूत्रात बांधणारा एक चांगला गझलकार गझलेला लाभला. ‘आपत्तीतून निर्मिती’ असा हा अनोखा प्रकार आहे. ज्याचं गणित पक्क असतं त्याला जीवनाचं गणित सहज सोडवता येतं. जयराम यांची ‘शब्दाटकी’ वाचकांना झपाटणारी अशीच आहे.
जीवनाच्या प्रवासात आलेल्या बऱया-वाईट अनुभूतींना प्रांजळपणे भिडता आलं की, गझल शब्दांना ऊर्जा पुरवायला तयारच असते. जयराम यांच्या गझला त्यांच्या जगण्याचा भाग बनूनच साकार झाल्यात. मुळात जीवनाकडं बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. जगण्यात चढ-उतार येतच असतात. आशानिराशेचा लपंडाव कधीच सरणारा नसतो, पण जगरहाटी नाही थांबत. ती नवनव्या रूपानं गजबजलेली असते तेव्हा नैराश्याला दूर लोटून मन ताजतवानं ठेवता आलं की, लिहिण्याची ऊर्मीही नव्याने दाटून येते. जगाला नव्याची नवलाई असते म्हणून सदैव नवंनवं देता आलं पाहिजे अशी त्यांची धारणा आहे.

लिहावे हमेशा नव्याने नव्याने
नवे देत जावे नव्याला नव्याने

हा लिहिणाऱयांसाठी त्यांनी जणू कानमंत्र दिलाय. पोळणं, सोसणं, वंचना, चिंता या गोष्टी तर माणसाच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात. यातून कुणाचीही सुटका नाही होत. तेव्हा दुसऱयांना दूषणं देत कटुता, वैरभाव मनात बाळगता कामा नये. विज्ञानाच्या नवनव्या शोधांमुळं, तंत्रज्ञानाच्या वाढत्या रेटय़ामुळं माणसाचं जगणं दिवसेंदिवस सुकर होत चाललंय, परंतु याच विज्ञानाचा गैरवापर करून आज माणूस अनेक संकटं ओढवून घेत आहे. पैक माणुसकीविहीन कृत्यं करत आहे. स्त्र्ााrभ्रूणहत्या हा त्यातलाच प्रकार आहे. ‘मुलगाच पाहिजे’ या हट्टापायी स्त्र्ााrभ्रूणहत्या करण्यात येताहेत. मुलीचं मायाळू विश्व, तिचं हळवं मन समजून घेण्याची आज खरी निकड आहे. मुलामुलींमध्ये भेदाभेद करणाऱया काळात पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारा शेर जयराम असा लिहितात…

मुलगीच देते, ममता जगाला
समजून घेना हळव्या मनाला

गझलकाराचं समाजभान तगडं असलं की, त्याला कोणत्याही विषयाचं वावडं नाही राहत. जगण्यातली मोहकता असो वा दाहकता, सगळेच विषय त्याचे होऊन जातात. जयराम यांनी अनेक विषयांवर उपदेशात्मक, प्रबोधनात्मक गझला लिहिल्यात. ‘सकळ जन शहाणे शहाणे करून सोडावे’ या उक्तीप्रमाणे त्यांनी शेर लिहिलेत.
ना भान राहते ते, ना ताण वाटतो तो
आले मनात जे जे, समजून सांगतो मी!
कुटुंब असो वा समाज, माणसाला अनेक प्रकारची नाती निभवावी लागतात. मानवी जीवनाला नात्यांचा भरभक्कम आधार असतो. नाती अनेक प्रकारची असतात. रक्ताची तसंच मानलेली नाती असतात. या पल्याड मैत्रीचं नातं तर आगळंवेगळं असतं. हे नातं जिवाला जीव देणाऱया जिवलगाचं असतं. आपण संकटात असताना सर्वप्रथम मित्र मदतीला धावून येतो. त्याच्या सोबतीनंच दुःख हद्दपार होतं, जगणं रुंदावत जातं. हे ऋणानुबंध जपता आले पाहिजेत, मजबूत करता आले पाहिजेत असं गझलकाराला वाटतं…

आहेत लाख नाती, नातीपल्याड मित्र
रक्तात काय आहे? रक्तापल्याड मित्र!

आईबाप जीव लावून लेकरांना फुलाप्रमाणं जपतात, लहानाचं मोठं करतात. त्यांच्या जिवावरच मुलं शिकून-सवरून मोठी होतात. मोठय़ा हुद्दय़ावर जाऊन बसतात, परंतु जन्मदात्यांकडं ढुंकूनही पाहायला राजी नसतात. आई-बापाला लाथाडून माझीच भक्ती करा, असं देव सांगत नाही. आईबापाच्या सेवेतच सर्व काही सामावलेलं असतं. साऱया धामाचं दर्शन त्यांच्या पायात घडतं याकडं मुलं कानाडोळा करतात. म्हातारपणी त्यांचं कुणीच नसतं तेव्हा त्यांना काय वाटत असेल याचा मुलं कधी विचारच नाही करत. आज वृद्धाश्रमात वाढणारी गर्दी काय सांगते? हे तमाम पोरांनी अंतर्मुख होऊन उघडय़ा कानांनी ऐकून समजून घेण्याची नितांत निकड आहे असं जयरामांना मनापासून वाटत राहतं. यावर ते असा शेर लिहून जातात…

त्या वृद्ध मायबापा विसरू नको कदापि
देवास शोधतो का? सारेच धाम येथे!

गझलकार वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांनी गझलेतील मराठीपण जपलंय. कुठंही इंग्रजी शब्दांचा भडिमार केलेला नाही. त्यांनी अधिकाधिक छंद वृत्ताचा निर्दोष वापर केलाय. पहिल्याच गझलसंग्रहातून त्यांचा गझलेचा बऱयापैकी अभ्यास दिसून येतो. ही जमेची बाजू आहे. अनुक्रमणिकेत त्यांनी वृत्तासह लगावली दिलीय. गझल लिहिणाऱयांना व नव्यानं व्यक्त होऊ पाहणाऱ्यांना तसंच गझलेच्या अभ्यासकांना ही यादी अतिशय उपयुक्त ठरेल. हे एक वैशिष्टय़पूर्ण काम जयराम यांनी केलंय. ते कौतुकास पात्र ठरावेत.

शब्दाटकी: गझलसंग्रह
गझलकार: जयराम धोंगडे
प्रकाशक: स्वयं प्रकाशन, सासवड, पुणे
पृष्ठे : 96 मूल्य: रुपये 150/-