
>> समीर कोवळे
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामधील दळवटणे या ऐतिहासिक परिसरात आजपासून सुमारे 350 वर्षांपूर्वी साक्षात छत्रपती शिवरायांचे काही काळ वास्तव्य होते. त्याच वेळी म्हणजे 8 एप्रिल 1674 रोजी छत्रपती शिवरायांनी याच शौर्यभूमीवर स्वराज्याच्या सेनापतीपदी हंबीरराव मोहिते यांना नियुक्त केले. 350 वर्षांचा वारसा लाभलेल्या या सुवर्णाक्षर नोंदणीकृत घटनेचा वर्धापन दिन आज शिवगड, नलावडे वाडी, दळवटणे (ता. चिपळूण) येथे साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त…
मर्दुमकीची परंपरा व थोर ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मोहिते घराण्यामध्ये हंबीररावांचा जन्म इ.स. 1640 मध्ये झाला, असे इतिहासकार मानतात. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा हंबीरराव अंदाजे दहा वर्षांनी लहान होते. त्यांचे वडील संभाजी हे शहाजीराजेंसोबत अनेक वर्षे होते. त्यामुळे हंबीररावांचे बालपण, शिक्षण, प्रशिक्षण बंगळुरूमध्ये (कर्नाटक) झाले. नामांकित सरदार व राजघराण्यांपैकी असलेल्या हंबीररावांना सर्व प्रकारचे शिक्षण, ज्ञान ग्रहण करण्याची संधी मिळाली. त्यांना भौगोलिक व सामाजिक परिस्थितीचे ज्ञान व भान अतिशय उत्तम होते.
सेनापती प्रतापराव गुजरांच्या पश्चात योग्य सेनापती निवडण्याचा महत्त्वाचा प्रश्न छत्रपती शिवरायांसमोर होता. कारण त्यांचा राज्याभिषेक अगदी तोंडावर आला होता. शिवराय हे निपुण जाणते राजे होते. कुठल्याही राजाची शक्ती ही सेनापतीमध्ये एकवटलेली असते. तत्कालीन हिंदवी स्वराज्यात पायदळ, घोडदळ व नौदल अस्तित्वात होते. राज्याभिषेकापूर्वी हिंदवी स्वराज्याची संकल्पना वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचली होती. ती पुढे जाऊन संपूर्ण जगामध्ये वंदनीय ठरावी हे शिवराजमुद्रेमध्ये कोरले गेलेय. स्वराज्याकरिता अनेक राजकीय व लष्करी मोहिमा यशस्वी करून राज्यविस्तार, सैन्य नेतृत्व, राज्य व्यवस्थापन, दुर्ग व्यवस्थापन, राजकोष वृद्धी इ. धोरणात्मक जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या. त्या समर्थपणे पेलण्यासाठी तेवढय़ाच तोलामोलाचा सेनापती स्वराज्याकरिता आवश्यक होता.
शिवकाळातील सेनापती निवडीचे निकष अत्यंत कठीण होते. राजनीती धुरंधर शिवाजी महाराजांचे राजसंस्कारांनुसार सेनापती निवडण्याचे निकष पुढीलप्रमाणे होते – चारित्र्याने स्वच्छ, शीलसंपन्न, धनुर्विद्येमध्ये विशारद, हत्ती व घोडे यांच्या शिक्षणाविषयी कुशल, सुंदर आकर्षक रीतीने मृदू भाषण करणारा, ज्योतिष शकुन (पक्षीज्ञान, शुभशकुनांचे) ज्ञान असणारा वैद्यकशास्त्र पारंगत, कृतज्ञ, शुर, दुःख सहन करण्याची क्षमताधारक, नम्र, सरळमार्गी, सैन्याच्या व्यूहरचनेचे सिद्धांत आणि रचनाकाwशल्यात पटाईत, विशेषत्वाने मौल्यवान काय आणि हिणकस काय ते जाणणारा, स्वराज्याचे हित ओळखणारा, हिंदवी स्वराज्याची स्वप्ने आणि ध्येये यांची पूर्ण जाणीव असणारा… या निकषांत बसणारे व्यक्तिमत्त्व सेनापती पदासाठी शोधणे हे शिवरायांसमोर मोठे आव्हान होते. शिवरायांनी प्रत्येक मोहीम आणि विविध पदांवर वेळोवेळी सुयोग्य व्यक्तींची निवड केली होती, परंतु स्वराज्याचा सेनापती या अतिमहत्त्वाच्या पदावरील निवड यामध्ये मोठय़ा प्रमाणात फरक आणि अपेक्षा सामावल्या होत्या.
शिवरायांना हंबीरराव मोहिते यांचा पराक्रम, अंगभूत नेतृत्व गुण, आतापर्यंतचे योगदान यांची पूर्ण कल्पना व खात्री होती. भोसले आणि मोहिते घराण्यांचे परस्परांशी असलेले विविधदृष्टय़ा दृढ संबंध यांची शिवराय जाण ठेवून होते. या पार्श्वभूमीचा साकल्याने विचार करून हंबीरराव मोहिते यांनाच स्वराज्याचे सेनापतीपद बहाल करण्याचा निर्णय छत्रपती शिवरायांनी घेतला. 8 एप्रिल 1674 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचा लष्करी तळ मौजे दळवटणे गावी असताना तेथील लष्करी छावणीसमोर महाराजांनी स्वराज्याच्या सेनापतीपदी हंबीरराव मोहिते यांना सन्मानपूर्वक आरूढ केले. त्या शुभप्रसंगी दस्तुरखुद्द शिवरायांच्या शुभहस्ते हंबीररावांना सेनापती पदाची मंगल वस्त्रs, क्षात्रतेज गाजविणारी ढाल-तलवार, शस्त्रास्त्रs प्रदान करण्यात आली. स्वतः शिवराय हे स्वतःच्या राज्याभिषेकापूर्वी सुमारे महिनाभर अगोदर श्री क्षेत्र परशुराम, श्री क्षेत्र रामेश्वर व रामतीर्थ सरोवर, पाग, चिपळूण, दळवटणे आणि परिसरात स्वराज्याची घडी व्यवस्थित बांधण्याच्या हेतूने आले होते.
हंसाजी मोहिते असे मूळ नाव असलेल्या शिलेदारास ‘हंबीरराव’ हा किताब शिवरायांच्या शुभहस्ते दळवटणे तळावर विधीवत देण्यात आला. त्यांनी लागलीच जंगली जयगड जिंकून शिवरायांना राज्याभिषेकापूर्वीच पराक्रमाची भेट दिली. मराठी सैन्याला त्यावेळचे शिवरायांचे राजदर्शन अधिकच सुखद वाटत होते. कारण राजे लवकरच छत्रपती होणार होते. दळवटणे गावातील छावणीसमोर आणखी एक ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे स्वतः शिवरायांनी लष्करास उद्देशून लिहिलेल्या एका आज्ञापत्राचे अभिवाचन केले. हे आज्ञापत्र प्रजाहितदक्ष राजधर्म दर्शविणारे, विचाराभिमुख असे आहे.
चिपळूण तालुक्यातील दळवटणे गावाच्या ‘रेव्याचे तळे’ या विस्तीर्ण माळावर स्वराज्याच्या लष्कराची छावणी होती. या छावणीस उद्देशून सदरहू आज्ञापत्र शिवरायांनी लिहिले आहे. लष्कराने काटकसरीने व दक्षतेने कसे वागले पाहिजे, रयतेची काळजी कशी घेतली पाहिजे याविषयीचे हे आज्ञापत्र राज्यकारभातील शिवरायांची सूक्ष्म दूरदृष्टी दर्शविते. या आज्ञापत्रामुळे शिवरायांची लोककल्याणकारी व कार्यक्षम प्रशासकीय पद्धती आणि शिवशाहीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यास सहाय्यभूत ठरते. सदरहू आज्ञापत्राचे अभिवाचन 9 मे 1674 च्या सुमारास झाल्याचे इतिहासकारांचे मत आहे. वीरभूमी दळवटणे परिसरात महाराष्ट्राच्या साक्षीने या दोन अविस्मणीय घटना घडल्या.
आजपासून सुमारे 350 वर्षांपूर्वी म्हणजे 8 एप्रिल 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते हंबीरराव मोहिते यांना स्वराज्याच्या सरसेनापती पदावर सन्मानपूर्वक विराजमान केले गेले. ही देदीप्यमान ऐतिहासिक घटना दळवटणे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे घडली. सुमारे 350 वर्षांचा वारसा लाभलेल्या या सुवर्णाक्षर नोंदणीकृत घटनेचा आज वर्धापनदिन शिवगड, नलावडे वाडी, दळवटणे (ता. चिपळूण) येथे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास हंबीरराव मोहिते यांचे थेट वंशज, इतिहास संशोधक विक्रमसिंह मोहिते व ऐतिहासिक अश्व व अश्वदल संशोधक गुणेश पुरंदरे यांची विशेष उपस्थिती लाभली आहे.
(लेखक निसर्ग, इतिहास, पर्यटन अभ्यासक आहेत.)






























































