इतिहासाची आषाढवारी

70

>> संदीप विचारे

कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला याल तेव्हा करवीरनिवासिनीचा सिंह पन्हाळगड अवश्य पहायला हवा. या पन्हाळगडाच्या पायथ्यालाच शिवा काशीद यांची समाधी आहे. पन्हाळ्याचा सिद्दी जौहरचा वेढा भेदत महाराजांना सुरक्षित पोहोचवताना शिवा काशिदांनी प्राणांची बाजी लावली तर पावनखिंडी बाजी – फुलाजी यांनी बलिदान दिलं. विशाळगड, पन्हाळगडाच्या बाजी, फुलाजी, काशीदांच्या समाधीसमोर नतमस्तक व्हा. पावनखिंडीची माती मस्तकी लावा आणि पावन व्हा! मावळ्यांसाठी हीच खरी आषाढवारी!

आषाढ पौर्णिमा गुरुवार, 12 जुलै 1660, पन्हाळय़ाच्या राजदिंडीसमोर एक पालखी सज्ज होत होती. पालखीसोबत होते हिरडस मावळातील बांदल, शुभुंसिंग जाधव, फुलाजी, शिवा काशीद आणि सहाशे धारकरी. पालखीप्रमुख होते भोरच्या सिंदगावचे बाजीप्रभू देशपांडे. पालखीचा आणि आषाढवारीचा मार्ग ठरला. पन्हाळय़ाचा सिद्दी जौहरचा वेढा वेधायचा. मसाई पठार… पांढरपाणी मार्गे विशाळगड. वेळ रात्रीची. आषाढसरी कोसळत होत्या आणि स्वराज्याचा विठ्ठल साक्षात श्रीशिवाजीराजा पालखीत बसला. संताच्या पालख्या विठूरायाच्या भेटीला पंढरीकडे निघाल्या होत्या आषाढवारीसाठी आणि इकडे पन्हाळगडाहून निघाली एक अनोखी वारी सहाशे धारकऱयांच्या सोबत. स्वराज्याच्या विठ्ठलासवे पालखी निघाली… कीर्रर्र अंधार… वरून कोसळणाऱया आषाढसरी… सिद्दी जोहरचा वेढा भेदून पालखी मसाई पठाराच्या वाटेला लागली. मावळे चिखल तुडवीत विशाळगड जवळ करीत होते. इतक्यात मसूदच्या हेरांनी ही वारी हेरली आणि ते सिद्दी जोहरच्या छावणीकडे पळत सुटले. ‘‘सिवा भाग गया…’’ छावणीवर वीज कोसळली. सिद्दी जोहरचा जावई मसूद हेरांना घेऊन दौडत निघाला.

मसाई पठार ओलांडून पळणाऱया मावळय़ांना ‘‘दिन दिन’’च्या आरोळय़ा ऐकू येऊ लागल्या. आपला पाठलाग सुरू झालाय हे कळताच दुसरी पालखी पुढे आली. त्यात महाराजांसारखा वेश केलेला नेवापूरचा शिवा न्हावी बसला आणि ती पालखी मलकापूरच्या दिशेने निघाली. महाराजांची पालखी जंगलात शिरली आणि पांढरपाण्याकडे निघाली. पालखीच्या मागावर असलेल्या मसूदने शिवा काशीद यांची पालखी पकडली आणि ती तळावर आणली. सिद्दी जोहरचा आनंद गगनात मावेनासा झाला, पण त्याला जेव्हा कळले की, हा शिवाजी तोतया आहे तेव्हा तेच आभाळ त्याच्यावर पुन्हा कोसळले. पुन्हा सुरू झाला पाठलाग. त्याआधी शिवा काशीदांना ठार करण्यात आले. ऊर फुटेस्तोवर पळणारे मावळे गजापूरच्या खिंडीत पोहोचले. ‘‘दिन दिन’’च्या गर्जना करीत मसूदचे सैन्य खिंड चढू लागले. दोन्ही हातात पट्टे चढवत बाजीप्रभू राजांना म्हणाले, ‘‘राजे तुम्ही या, मी खिंड रोखून धरतो. लाख मेले तरी चालतील,’’ लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही विशाळगडी पोहोचा. तोफेची इशारत करा. तेव्हाच ही खिंड शत्रूला मोकळी होईल. धारकऱयांनो, मृत्यूला सांगा ‘‘तोफांची इशारत झाल्याशिवाय हा बाजी ही खिंड सोडणार नाही.’’ राजांनी बाजींना मिठी मारली. ‘‘बाजी तुमच्यासारख्या इमानी स्वामिनिष्ठ लोकांच्या जिवावर स्वराज्य उभे राहू शकते हे उद्या आलम दुनिया बघेल. येतो आम्ही. जय भवानी!’’

बाजी – फुलाजी बंधूंनी आणि बांदल मावळय़ांनी गजापूरची घोडखिंड रोखून धरली. विशाळगडाच्या पायथ्याला मोर्चे लावून बसलेल्या आदिलशाही सरदार जसवंतराव दळवी व सूर्यराव सुर्वे यांचे वेढे फोडीत महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. तोफांची इशारत झाली. बाजींच्या रक्ताने गजापूरची घोडखिंड पावन झाली, पावनखिंड! शिवा काशीदांच्या बलिदानाने पन्हाळय़ाचा पायथा शहारला!! ही अशी अनोखी आषाढवारी अनुभवून इतिहास थरारला!! 13 जुलै 1660, आषाढ.

पन्हाळगडाच्या पायथ्याला शिवा काशीद यांची समाधी आहे. विशाळगडावर बाजी – फुलाजी यांच्या समाध्या आहेत. कोल्हापूर – अंबामार्गे पावनखिंडीत जाता येते. सर्वत्र गाडी रस्ते आहेत. कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला याल तेव्हा करवीरनिवासिनीचा सिंह पन्हाळगड आवश्य पाहा. बाजी, फुलाजी, काशीदांच्या समाधीसमोर नतमस्तक व्हा. पावनखिंडीची माती मस्तकी लावा आणि पावन व्हा! इथेच फुटली छाती परी ना दिमाख हरला जातीचा हा मंत्र आहे इथल्या मातीचा.

पंढरपूरची वारी करणाऱया वारकऱयांनो, महाराष्ट्राच्या पुतांनो इतिहासाची ही आषाढवारी एकदा तरी कराच! कारण याच धारकऱयांमुळे आपल्या पूर्वजांचे जानवे आणि डोक्यावरील शेंडय़ा शाबूत राहिल्या. आपले हिंदुत्व अबाधित राहिले. म्हणूनच उत्तरेतून आलेला कविभूषण लिहितो –
काशीजी की कला जाती,
मथुरा में मस्जीद वसती
अगर न होते शिवाजी,
सुन्नत सबकी होती…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या