क्रिकेटनामा – आम्हाला हवेत स्टार्क आणि हेड!

>> संजय कऱ्हाडे

आज तब्बल एकशे अठ्ठेचाळीस वर्षांनंतर कसोटी क्रिकेटचा इतिहास अन् रिवाज बदलला गेला. उपाहाराआधी चहापान केलं गेलं! दोन तासांच्या खेळानंतर खर्च झालेल्या शक्तीची भरपाई करण्यासाठी प्रथम उपाहार आणि मग पुन्हा दोन तासांनंतर शरीर जडावू किंवा सुस्तावू नये म्हणून चहापान, असा शिरस्ता होता. जगभराची, आपली अन् आसामचीसुद्धा हीच दैनंदिनी होती, आहे. शिवाय सामना अर्धा तास लवकर सुरू होत असल्याने इतिहासाची मोडतोड करून नेमकं काय साधलं हे उमजलं नाही. आधी तीर्थ अन् मगच प्रसाद असाही काही नवा नियम कसोटी क्रिकेटमध्ये अस्तित्वात आलेला नव्हता! पण रीत, पद्धत, परंपरा, वहिवाट बदलण्याचं श्रेय आपण सर्वात आधी पटकावून दाखवलं!

आपला टॉस हरण्याचा दंडक मात्र कायम राहिला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी घेतली आणि आपल्याला दिवसभर मैदानावर पिदवलं. राहुलने स्लिपमध्ये सोप्पा झेल सोडण्याचा लोकाचार कायम राखला आणि मार्व्रमने रिकल्टनबरोबर छान भागीदारी केली. त्यानंतर बव्हुमाने स्टब्जबरोबर संयमी खेळी केली. अर्थात, सामना जिंकून बरोबरी साधण्याची आपली स्वप्नं मावळणार असं वाटत असतानाच यशस्वीने बव्हुमाचा झेल पुढे झेपावत घेतला अन् आशा जागवल्या. अप्रतिम झेल! मग स्टब्सचा झेल स्लिपमध्येच घेऊन राहुलने चुकीची भरपाई केली.

कालचा दिवस असो की आजचा. आफ्रिकन संघाचा पवित्रा वेळकाढू दिसला किंवा यापुढेही राहिला तर फारसं नाराज होण्याचं कारण नाही. त्यांच्याकडे मालिकेत अजिंक्य अशी आघाडी आहे. हा सामना जिंकण्याची त्यांना आवश्यकता नाही. अतिरिक्त धोका पत्करून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आफ्रिकन संघ आपल्याला देईल अशी आशा बाळगणं मूर्खपणाचं ठरेल. अधिकाधिक काळ पहिला डाव रेटायचा, एकूण सामन्याचा वेग संथायचा, मालिका चटकायची आणि भारताला जागतिक कसोटी स्पर्धेत गुण मिळू द्यायचे नाहीत, असाच त्यांचा हट्ट असेल.

म्हणूनच आपल्याला सक्रिय व्हावं लागणार आहे. ‘अॅशेस’ मालिकेच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात लडखडल्यानंतर जी तडफ स्टार्क, बोलंड, ट्रव्हिस हेड आणि मार्नस लबूशेनने दाखवली तीच आपल्याही फलंदाजांना, गोलंदाजांना दाखवावी लागेल. त्या चार बहाद्दरांनी ऑस्ट्रेलियाला दोन दिवसांत पहिली कसोटी जिंकून दिली. जणू वर्गामध्ये नजर चुकवून पळून गेलेल्या वांड पोराला मास्तरांनी कानाला पकडून पुन्हा वर्गात आणलेलं असावं अगदी तस्सं! अर्थात, अशा चमत्कारी अन् दमदार कामगिरीसाठी गरजेचे असतात आत्मविश्वासाने परिपूर्ण फलंदाज अन् गोलंदाज.

आता गौतम गंभीरच्या राज्यात तना-मनावरची दडपणं झुगारून कोण-कोण वेगाने धावा करणार, चटापट गडी बाद करणार असे यक्षप्रश्न आहेत! हेडने चौथ्या डावात सोळा चौकार आणि चार षटकार बडवत 83 चेंडूंत 123 धावा केल्या. लबूशेनने अर्धशतक झळकावलं. सामन्याचा मानकरी ठरलेल्या स्टार्कने सामन्यात दहा तर बोलंडने महत्त्वाच्या वेळी चार बळी घेतले.

आहेत का आपल्या संघात कुणी असे तरबेज स्टार्क, बोलंड, हेड किंवा लबूशेन!