क्रिकेटवारी – सिराजभाई, जीते रहो!

>> संजय कऱ्हाडे

‘सुबह मैं उठा तो आयने में खुद को देखा और बोला, मैं कर के दिखा दूंगा,’ आणि त्याने नेमकं तेच केलं! सोडलेल्या झेलाचं प्रायश्चित्त करून पाच बळी घेतले आणि हिंदुस्थानला अकल्पित असा विजय मिळवून दिला. मालिकेत 2-2 बरोबरी साधून दिली…

सिराजने अॅटकिन्सनचा शेवटचा अडथळा उडवला अन् समस्त क्रिकेटप्रेमींनी आपला बांध तोडत गर्जा केला…

सोडले मनीचे हत्ती घोडे,
समस्त वितरिता लाडू पेढे,
विजयाप्रत हरखुनी गेले,
धुंदीत दौडले क्रिकेटवेडे…

या सामन्यात नऊ बळी चटकवणाऱया ‘सामनावीर’ सिराजला साथ दिली ती प्रसिधने. त्याने या सामन्यात आठ बळी पटकावले. पूर्ण सामन्यादरम्यान एक मोहम्मदसारखा भासला, तर दुसरा कृष्णासारखा! दोघंही मार्गदर्शक, दोघंही तारणहार!!

ही अतिशय खडतर अशी मालिका आपण 2-2 अशा बरोबरीत सोडवून ताठ मानेने स्वगृही परतण्याचं स्वप्न शुभमनने नक्की पाहिलं असणार. त्याची कामगिरी छानच झाली. एका मालिकेत तीन शतपं अन् एक द्विशतक ठोकणं, साडेसातशेपार धावा करणं सोपं नसतं!

खरं सांगायचं तर, हे संपूर्ण संघाचं यश म्हणायला पाहिजे. एखाद् दुसरा अपवाद द्या सोडून. पण हिंदुस्थानने वेळोवेळी जमवलेल्या धावा असोत की घेतलेले बळी, परिस्थिती नेहमीच परीक्षा घेणारी होती. काही चुकलेल्या, सुटलेल्या संधी लक्षात घेतल्या तरी प्रत्येक वेळी संघातला कुणी न कुणी शिलेदार पुढे येऊन चमकदार कामगिरी करून गेल्याचं आपल्या लक्षात येईल. यशस्वी, राहुल, गिल, जाडेजा, वॉशिंग्टन, बुमरा, आकाशदीप, प्रसिध आणि अर्थातच सिराज! यापैकी प्रत्येकाचा या यशात मोठा वाटा आहे.

साई, करुण, कंबोज यांनी किंचित निराश केलं असेलही, पण त्यांना व्यवस्थापनाने किती आत्मविश्वास दिला हा प्रश्न आहेच. इतर काहींना तर आखाडय़ातच उतरवलं नाही, तर त्यांच्याबद्दल काय बोलावं!

आजचा दिन कौतुकाचा
नाही उण्या-दुण्याचा
असे सण हा विजया दशमीचा,
करू सीमोल्लंघन तिन्हीसांजा…

सिराजभाई, आप जिते रहो, आयना देखते रहो! आरशात पाहण्याची हिंमत नसणाऱयांना आम्ही आरसा दाखवू… लवकरच!