रंगभूमी – ‘सवाई’ची जादू तेरी नजर’

>> संजय कुळकर्णी

सवाई एकांकिका स्पर्धेला एक वलयांकित स्पर्धा म्हणून पाहिलं जातं. या स्पर्धेने व्यावसायिक रंगभूमीला लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ दिले आहेत आणि आजही या व्यासपीठावर ते घडत आहेत. म्हणूनच रंगभूमी आणि नाटय़क्षेत्रात ही स्पर्धा अढळ स्थानी असणार आहे.

तरुण रंगकर्मींना आकर्षित करणारी स्पर्धा म्हणजे ‘सवाई एकांकिका’ स्पर्धा. महाराष्ट्रातील रंगकर्मी दरवर्षी या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. आम्ही ज्या वेळी एकांकिका, नाटकं करायचो त्या वेळेपासून या स्पर्धेबद्दल आकर्षण होतं. प्रायोगिक रंगभूमी ऐन बहरात असताना ‘सवाई’ स्पर्धा बघताना समाधान मिळत असे. ‘सवाई एकांकिका’ स्पर्धेला 1987 वर्षापासून सुरुवात झाली. साहित्य संघ मंदिरात अंतिम फेरीत सादर झालेली ‘ओनामा’ ही पोद्दार महाविद्यालयाची एकांकिका अजूनही आठवते. त्यानंतर ‘सती’ ही रुईया महाविद्यालयाची आणि त्यानंतरच्या अनेक एकांकिकांचे प्रयोग डोळय़ांसमोर येऊ लागले. त्या स्पर्धेसाठी असलेले परीक्षक हे जाणकार असायचे. दिलीप कोल्हटकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, आत्माराम भेंडे, विनय आपटे, नंदकुमार रावते, प्रभाकर पणशीकर, मोहन वाघ, अच्युत देशिंगकर, दिलीप प्रभावळकर, मोहन जोशी, वामन केंद्रे, लालन सारंग, सुलभा देशपांडे, रिमा, वंदना गुप्ते, सविता प्रभुणे अशा अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आपले योगदान दिलेले आहे. काळ बदलत गेला, सादरीकरणात नावीन्य येऊ लागले. कलाकारांची प्रयोग सादर करण्याची ऊर्जा दिसू लागली. महाराष्ट्रात एकांकिका स्पर्धेचं लोण दरम्यानच्या काळात पसरू लागले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यात स्पर्धा या घेतल्या जाऊ लागल्या. रंगकर्मी त्या त्या स्पर्धेत भाग घेऊ लागला. त्यांना आपली एकांकिका पहिल्या नंबरात हवी होती. कारण त्यांना ‘सवाई एकांकिका’ स्पर्धेत भाग घ्यायचा असतो. त्यांचं एकच लक्ष्य होतं आणि असायचं, आताही आहे ‘चतुरंग’ची ‘सवाई एकांकिका’ स्पर्धा.

आज या स्पर्धेने 36 वर्षे पूर्ण केली आहेत. एक वलयांकित स्पर्धा म्हणून त्याकडे पाहिलं जातं. इतकी वर्षे होऊनही या स्पर्धेचे आकर्षण अजूनही टिकून आहे. या स्पर्धेने व्यावसायिक रंगभूमीला लेखक , दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ दिलेत. त्यामुळे नाटय़ इतिहासात ‘चतुरंग’ स्पर्धेची नोंद इतिहासकारांना घ्यावीच लागेल. आजही ती मंडळी मुलाखतीत ‘सवाई’ स्पर्धेचा प्रामुख्यानं उल्लेख करताना दिसतात. गेल्या 25 वर्षांच्या ‘सवाई एकांकिकां’च्या निकालाकडे नजर फिरवली तर पुण्यातील रंगकर्मींनी या स्पर्धेत आपला ठसा उमटवलेला आहे. पुणेकरांच्या 9 एकांकिकांना ‘सवाई एकांकिका’ हा ‘किताब’ मिळालेला आहे आणि 15 वेळा त्यांनी या स्पर्धेत पारितोषिकांसाठी बाजी मारलेली आहे. ‘दुकान कोणी मांडू नये’, ‘पाषाणकर तुमचं काय चाललंय?’, ‘पार्टनर्स’, ‘डायरी ऑफ अण्णा फाटक’, ‘मनोमीलन’, ‘पोपटी चौकट’ इत्यादी पुण्याच्या एकांकिकांचा उल्लेख हा करावा लागेल. या स्पर्धेत नेहमी ‘मुंबई विरुद्ध पुणे’ हा एकांकिकांचा सामना पाहावा लागला. 5 जानेवारी रात्रौ 8 वाजता सुरू होणारी पहिली एकांकिका शेवटची 26 जानेवारीच्या पहाटे सादर होते. त्यानंतर निकाल. 26 जानेवारीचे औचित्य साधून ‘वंदे मातरम’ने ‘सवाई’ स्पर्धेची सांगता होताना 36 वर्षे पाहत आलोय.

‘सवाई’ स्पर्धा ‘चतुरंग’ घेत असल्यामुळे ‘चतुरंग’चे सर्वेसर्वा विद्याधर निमकर यांच्याशी या स्पर्धेबद्दल गप्पा मारताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या गळय़ातील ताईत बनलेले गणेश सोळंकी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘सवाई’ एकांकिका स्पर्धा घेतली जाते. निमकर म्हणाले, ‘चतुरंग’ अनेक उपक्रम घेते. नाटक क्षेत्रात काहीतरी उपक्रम असावा असं प्रकर्षानं वाटू लागलं होतं. जे काही कराल ते नवे असू दे, इतरांपेक्षा वेगळे असू दे, हा मास्तरांचा म्हणजेच गणेश सोळंकी यांचा मूलमंत्र कानामनांत गुंजत होता. मग एकांकिकाविषयक काही करावं का, असे वाटले. महाराष्ट्रात पाच-पन्नास एकांकिका स्पर्धा प्रतिवर्षी सुरू असतात. त्या स्पर्धेपेक्षा काही वेगळं असावं असं वाटत होतं. मास्तरांनी डोक्यात घुसवलेलं नावीन्यतेचे, वेगळेपणाचे, नव्या पायवाटेचे भूत खाली उतरायला तयार नव्हते. ‘एकांकिका’ हा विषयही डोक्यातून जात नव्हता. स्पर्धा घ्यायची तर ती सर्वसामान्य पद्धतीची न घेता सर्वत्र होत असलेल्या वेगवेगळय़ा एकांकिका स्पर्धांमधल्या केवळ पहिल्या आलेल्या एकांकिकांची स्पर्धा का घेऊ नये, हा विचार डोकावून गेला. पूर्ण रात्रभर ही स्पर्धा घेतली तर मुंबईसारख्या रंगलेल्या रंगभूमीमय नगरीत का होऊ शकणार नाही? तारीख ठरली 25 जानेवारी. आज स्पर्धेला 36 वर्षे झाली.

आज ‘सवाई’च्या आठवणीच्या हिंदोळय़ावर स्वार होताना ‘सवाई’ स्पर्धेच्या तिकिटांसाठी होणारी प्रेक्षकांची घालमेल, टेन्शन मी अनुभवलंय. नाटय़गृहाच्या बाहेर रात्रभर तिकिटांसाठी लागणारी रांग, त्यात होणारा पोलिसांचा हस्तक्षेप पाहिलाय. प्रेक्षक दोन-दोन दिवस रांग लावतानासुद्धा दिसलेत. नंबर जाऊ नये म्हणून आपला नंबर म्हणून दगड ठेवून आरक्षित करायचे. उन्हातान्हाची, थंडीची तमा न बाळगता ते तिकिटांसाठी तहानभूक विसरून नाटय़गृहाबाहेर उभे राहत. मला आठवतंय, शशांक सोळंकी यांनी रांगेतील प्रेक्षकांना भूक लागत असेल म्हणून त्यांनी शिवाजी मंदिरच्या आवारात वडापाव वाटलेले आठवतात. निमकर रांगेतील प्रेक्षकांना पोलिसांचा त्रास होऊ नये म्हणून ज्या ज्या नाटय़गृहात ‘सवाई’ची अंतिम फेरी असेल त्या हद्दीतील पोलीस स्टेशनला ‘चतुरंग’ संस्थेचे पत्र त्यासंबंधात देत असत. निमकर सांगतात की, तिकिटं मिळण्यासाठी प्रेक्षक फारच उतावीळ असत. 25 व्या ‘सवाई’ अंतिमला नाटय़गृहाच्या हॉलवर स्क्रीनची सोय केली, पण स्पर्धेची तरुणांत इतकी क्रेझ आहे की, काही जणांनी प्रसारित करणाऱया सिस्टीमलाच बाद करून आम्हाला तक्रार केली की, दिसत नाही. त्यामुळे आम्हाला नाटय़गृहात सोडा, पण नियमानुसार ते शक्य नव्हतं. आता ऑनलाइन तिकीट विक्री होत असल्यामुळे ती मजा आज पाहण्यास मिळत नाही. ऑनलाइन तिकिटं लगोलग संपतात. या स्पर्धेनं प्रेक्षकांत काय जादू केलीय ते आम्हालासुद्धा समजत नाही.

‘सवाई’ स्पर्धा राहिलेली नसून जो तरुण वर्ग नाटय़ चळवळीशी निगडित आहे अशा तरुणांचे एक स्वप्न बनले आहे. ‘सवाई’ अंतिम फेरीमध्ये निवड झाल्याचा आनंद ‘ऑस्कर’साठी नॉमिनेशन त्यांना मिळाल्यासारखा वाटतो. जर ‘सवाई’ पारितोषिक जिंकलं तर तो त्यांचा आनंद ‘ऑस्कर’ जिंकल्यासारखा असतो. या स्पर्धेच्या मागे ‘चतुरंग’ कार्यकर्त्यांची जिद्द, चिकाटी आणि अपार परिश्रम जोडलेले आहेत. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून ही स्पर्धा यशस्वी करताना दिसलेत आणि यापुढेही दिसणार यात शंकाच नाही. आज ‘सवाई एकांकिका’ स्पर्धा बघताना प्रकर्षाने जाणवलं की, ‘चतुरंग’ व्यावसायिक नाटकांची ‘सवाई नाटक’ अशी स्पर्धा का घेत नाही? गणेश सोळंकी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सवाई सुरू झाली. सुधीर दामले त्यांच्या ‘नाटय़दर्पण’तर्फे सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून त्या त्या वर्षातील नाटकांना पारितोषिक देत असत. 25 वर्षे त्यांनी तो उपक्रम राबविला. सुधीर दामले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘चतुरंग’ने ‘सवाई नाटक’ हा उपक्रम करण्यास काय हरकत आहे? वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटकाची निवड काही संस्था, माध्यमं करतात. ती नाटकं आणि ‘चतुरंग’ यांनी निवडलेली काही नाटकं यात ‘सवाई नाटक’ म्हणून स्पर्धाही घ्यावी. हो, विद्याधर निमकरांनी आणि त्यांच्या ‘चतुरंग’ संस्थेनं मनावर घेतलं तर ते सहज शक्य आहे. बॉल इन निमकर कोर्ट!
[email protected]