मोनेगिरी – साधासुधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>संजय मोने

सुखी माणसाचा सदरा अशी एक म्हण आहे. पण ‘साधासुधा’चं उदाहरण घ्यायचं झालं तर सुखी माणसाचा सदरा नसतो, तर त्याचा देह असतो किंवा विचार असतो, नाहीतर मन असतं. आमच्या ‘साधासुधा’च्या बाबतीत तीनही गोष्टी तंतोतंत खऱया आहेत.
त्याचं नाव काहीही असो, पण या लेखात ते मी सांगणार नाही शेवटपर्यंत. कारण आता तो फार मोठा माणूस झालाय. आपण त्याला ‘साधासुधा’ म्हणूनच संबोधूया. साधारणपणे आठवडय़ातून एकदा तरी त्याचा उल्लेख अनेक समाज माध्यमांतून केला जातो. इंग्रजी वर्तमानपत्रातसुद्धा तो झळकत असतो. साऊथ बॉम्बेची दक्षिण मुंबई झाली तरीही लाचार आणि लाळघोटय़ा लेखकांच्या लिहिण्यात अजूनही जिचा उल्लेख सोबो असा केला जातो (त्याबद्दल त्यांच्यावर खटला भरला पाहिजे. सोबो का? तर इंग्लंडमध्ये एक सोहो नावाचं ठिकाण आहे त्याची भ्रष्ट नक्कल.) तिथले लोकसुद्धा त्याचा उल्लेख फार मानाने करत असतात. अर्थात त्याबद्दल त्याचं काहीच म्हणणं नाही. तो अत्यंत साधेपणाने राहतो. सकाळ, संध्याकाळ नोकरीव्यतिरिक्त कायम अर्धी विजार जी साधारण तीनशे-पाचशे रुपयांत मिळते, वरती एक साधा टी-शर्ट, पायात देशी चपला वापरतो. सकाळी फिरायला येतो आणि साधारण तासाभरात पाच-सहा फेऱया मैदानाला मारतो. ते फिरताना वापरायचे शूजसुद्धा हजारभर रुपयांचे असतात. आजूबाजूला चालणारे, धावणारे बहुतेक जण आठ-दहा हजार किंवा त्याहून महाग शूज घालून जेमतेम दोन-तीन फेऱया मारतात, त्यात त्यांना पाच-सात वेळा फोन येतो. फिरणं थांबवून ते बोलत बसतात. फिरणं (?) झाल्यावर कट्टय़ावर बसून गैरहजर असलेल्या माणसाबद्दल काहीबाही पाठीमागे टीका करत राहतात. मग चहा किंवा कॉफी आणि काहीतरी खातात. थोडक्यात फिरल्यानंतर जे काही उष्मांक जाळले जातात त्याच्या दामदुप्पट भरपाई केली जाते. इतकंच कशाला मनगटावर पाच-सात लाख रुपयांचं घडय़ाळ विकत घेऊन बांधायचं म्हटलं तर त्याला सेकंदभरसुद्धा विचार करायला लागणार नाही. तो आठ-नऊशे रुपयांचं अस्सल देशी घडय़ाळ हातावर मिरवतो. त्याला त्याबद्दल छेडलं तर…
“किंमत काहीही असो वेळ तीच दिसते ना? आणि शूज कितीही किमतीचे असूदेत चाल महत्त्वाची नाही का? हे उत्तर तो तोंडावर मारतो.” आता साधासुधा पन्नाशी पार करून गेलाय, पण तो न ठरवता किंवा कसलाही विचार न करता पहिल्यापासून अत्यंत साधा राहतो. याचा अर्थ तो कंजूष आहे असा निष्कर्ष, म्हणजे चुकीचा निष्कर्ष काढायची चूक करू नका. त्याच्या कामाच्या संदर्भात कोणाला कुठे जेवायला घेऊन जायची वेळ आली किंवा कोणाचा पाहुणचार करायचा प्रसंग आला, तर तो महागातल्या महाग उपहारगृहात पाच-पंचवीस हजार रुपयांचे बिल सहज भरतो. मित्र मित्र म्हणून कुठे जेवायला गेला तर बिल आल्यानंतर पहिल्यांदा तो सगळे पैसे भरतो आणि उरलेले कमी असले तर काहीही न विचारता खिशात घालतो. पण वैयक्तिक आवड विचाराल तर, ‘च्यायला, पुरी आणि बटाटा भाजी किंवा वरणभात, बाजूला मस्त भजी, कोथिंबीर वडी. यापेक्षा जगात अजून भारी काय असतं?’
मांसाहारी बेत असेल तर वरच्या पदार्थांऐवजी कोंबडीवडे आणि बिर्याणी यांचा समावेश असतो. एकंदरीत त्याला मिळणारं वेतन लक्षात घेता एखादी पन्नास-साठ लाख किंवा त्याच्याहून जास्त किमतीचं वाहन तो कुठलंही कर्ज न घेता तो विकत घेऊ शकतो. पण त्याच्याकडे साधारण आठ-दहा लाख रुपयांचं वाहन आहे. घरचे आता त्याला त्याच्या वागण्याबद्दल जरा जास्तच त्रास द्यायला लागलेत म्हणून त्यांचा तो ससेमिरा टाळण्यासाठी त्याने एक मोठ्ठी महाग गाडी मध्यंतरी विकत घेतली, पण त्यात तो एकदाही बसलेला नाही. हा, माफ करा एकदाच बसला. ती गाडी दुकानातून आणताना आणि आणल्यावरही.
“बायकोला किती वेळा सांगितलं, तुला चालवता येत नाही तर कशाला हवी इतकी मोठी गाडी?”असं तो कुरकुरत म्हणाला.
“अरे साधासुधा, हौस असते.” आमच्यातला एक जण जो मिळणाऱया उत्पन्नातला बराचसा भाग छानछोकीवर खर्च करतो, नाराजीचा सूर काढता झाला. पण ‘साधासुधा’ला असल्या शेरेबाजीची सवय झालेय. वर्षातून एकदा परदेशात आणि एकदा हिंदुस्थानात तो सगळय़ा घरच्यांना घेऊन फिरायला जातो. तोही त्यांचा आग्रह असतो म्हणून. उत्कृष्ट ठिकाणी राहतो. अगदी पंचतारांकित ठिकाणी त्यावर त्याला कोणी छेडलं तर…
“च्यायला कशाला पाहिजे बिझिनेस क्लास आणि फाइव्हस्टार हॉटेल? विमानात थंड हवा असते. शिवाय त्या फाइव्हस्टारमध्ये आपण किती वेळ असतो? सकाळी दोन तास आणि रात्री झोपायला पाच-सहा तास. घरचे सगळीकडे फिरफिर फिरतात आणि रात्री थकूनभागून दहा मिनिटांत झोपतात. त्यापेक्षा आमच्या कुडाळला काय मस्त हवा असते. शिवाय पिठी आणि तांदळाची भाकरी जी जगात कुठेच मिळत नाही. सौंदळा नावाच्या माशाचं कालवण आणि हातसडीच्या तांदळाचा भात याहून कुठे अधिक चांगलं जेवण आहे का? पण आमचा ‘साधासुधा’ हे सगळे संवाद मनात गिळून घरच्यांचा आग्रह पुरवत असतो. “साले परदेशात पोहे मिळत नाहीत रे आणि भुर्जी नाही. ज्या जगाच्या भागात भुर्जी मिळत नाही तिथे जायचंच कशाला?” यावर काय बोलणार?

‘साधासुधा’ एकदा त्याच्या कामासाठी इंग्लंडमध्ये गेला होता. त्याच वेळेला त्याला तिथेच दुसरं एक काम होतं. सगळा खर्च कंपन्या करणार होत्या. त्याच्या बरोबर असणाऱया लोकांनी दोन्हीकडचा भत्ता वाढवून घेतला. दोन्हीकडे घेऊन जायला वाहनं होती. त्याचेही पैसे लोकांनी उपटले म्हणजे अगदी वसूल करून घेतले. याने आपल्या खर्चाचा दाखला दिला तो इतरांच्या खर्चाच्या दाखल्यापेक्षा निम्मा होता.

“अगोदर ज्या लोकांनी मला बोलावलं होतं त्यांनी माझा सगळा खर्च करणं अपेक्षित होतं उगाच दुसऱया लोकांना फुकटचा भार कशाला?”
बाकीच्या लोकांनी त्याच्यासमोर लोटांगण घातलं. दुप्पट खर्च दाखव अशी विनंती केली. “तुमचे सगळय़ांचे पैसे मी भरतो, पण खर्च एकच दाखवा.” खिशातून पैसे गेले तरी चालतील, पण उगाच वाईट प्रथा पडू नये इतकंच त्याचं म्हणणं होतं. अशी पदरमोड तो कैक वेळा आणि कैक वर्षे करत आलाय. का आणि कसं माहीत नाही, पण अत्यंत अनपेक्षित ठिकाणाहून त्याची भरपाई त्याला मिळत असते. तो थोडासा शेअर्समध्ये वगैरे गुंतवणूक करतो, त्याचा मेहुणा त्याला सल्ला देतो. कुठला तरी एक शेअर होता, त्याच्या मेहुण्याने त्याला तो घे असे सांगितले. कुठली तरी पेय बनवणारी कंपनी होती.
“ते पेय शरीराला घातक आहे मी त्या कंपनीचे शेअर घेणार नाही.” त्याने ठामपणे मेहुण्याला सांगितले. आपल्या बायकोच्या भावाला ठणकावून सांगणारे लोक त्या काळात नव्हते. आजही तुरळक असतील.
“मग तू काय करणार त्या वरकड पैशाचं? कर भरावा लागेल.”
“भरूया की, आपल्याच देशाला मिळणार ना ते पैसे?”
मेहुणा सावळा होता त्यामुळे रागाने निळा-जांभळा होऊन तो निघून गेला. ‘साधासुधा’ने त्याच्या ज्ञानानुसार एका स्वदेशी कंपनीचा शेअर शोधला त्यात पैसे गुंतवले. सहा महिन्यांत कुठल्या तरी परदेशी कंपनीने ती कंपनी विकत घेतली. त्याच्याकडे असलेल्या शेअर्सचा भाव बघता बघता सात किंवा आठपट झाला. त्याने सगळे शेअर्स विकून टाकले आणि आलेले पैसे एका वृद्धाश्रमाला देऊन टाकले. दोन-तीन कोटी रुपये.
“साधासुधा, इतके पैसे तू दान केलेस?”
“दान नाही रे. मदत. आपण सगळे सोडून तिथे जाऊन, राहून काम करू शकत नाही त्यामुळे त्याला दान नाही म्हणता येणार.”
“म्हणजे मदत?”
“नाही, सहाय्य. म्हणजे काम करणाऱया लोकांच्या मागे दोन पावले.” ‘साधासुधा’ त्याच्या नेहमीच्या स्वभावानुसार उत्तर देता झाला.
सुखी माणसाचा सदरा अशी एक म्हण आहे. पण ‘साधासुधा’चं उदाहरण घ्यायचं झालं तर सुखी माणसाचा सदरा नसतो, तर त्याचा देह असतो किंवा विचार असतो, नाहीतर मन असतं आणि आमच्या ‘साधासुधा’च्या बाबतीत तीनही गोष्टी तंतोतंत खऱया आहेत.
‘साधासुधा’सारखं आपल्याला राहता येईल का? बहुतेक नाही. कारण मग ‘साधासुधा’ लेखाचा विषय कसा होईल?